‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
कॉमिक्स बुक मधील अमिताभ बच्चन आठवतो का?
सहस्त्रकातील महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुपरस्टार पदाच्या कालखंडात या नावाची लोकप्रियता कॅश करून घेण्यासाठी अनेक उपक्रम राबविले गेले. बच्चे कंपनीला आवडणाऱ्या कॉमिक्स बुक्सचा नायक अमिताभ बच्चन होता, हे तुम्हाला आठवतंय का?
दोन-तीन वर्ष चाललेल्या या कॉमिक्स बुक सिरीजचा नायक अमिताभ बच्चन होता. परंतु, पुढे काही कारणाने हे लोकप्रिय कॉमिक्स बंद झाले आणि आज तर असे काही कॉमिक्स होते, हेच लोकांना आठवत नाही. काय होती या कॉमिक्स जन्मकथा?
याची सुरुवात ऐंशीच्या दशकाच्या प्रारंभी झाली. त्यावेळी अमिताभ बच्चन रमेश बहल यांच्या ‘पुकार’ या चित्रपटात प्रमुख भूमिका करत होते. या सिनेमात त्यांचे सहनायक होते रणधीर कपूर. या सिनेमाचे चित्रीकरण गोव्याला चालू होते.
अमिताभ बच्चन या नावाची जबरदस्त क्रेझ त्याकाळात निर्माण झाली होती. त्यामुळे या सिनेमाचे शूटिंग पाहिला प्रचंड गर्दी होत असे. कित्येकदा तर पोलिसांना बोलावून गर्दीवर नियंत्रण आणावे लागेल. त्यावेळी अमिताभ बच्चनचे फॅन फॉलोइंग लहान मुले देखील होते. लहान मुलांची प्रचंड मोठी गर्दी अमिताभला पाहण्यासाठी होत होती. अमिताभ देखील या लहान मुलांसोबत गप्पा मारण्यात रमून जात असे.
त्यावेळी रणधीर कपूर अमिताभला ‘सुप्रीमो’ या नावाने बोलवत असत. लहान मुले शूटिंग पाहायला आली की तो लगेच मुलांना “बुलाता हूं तुम्हारे सुप्रीमो को!” असं म्हणत असत. लहान मुलांचा अमिताभ जणू सुप्रीमो झाला होता. जगातील कुठलीही अशक्य गोष्ट अमिताभ बच्चन करू शकतो; अशी धारणा लहान मुलांची झाली होती.
या शूटिंगच्या दरम्यान तिथे ‘मुव्ही’ या सिने नियतकालिकाची संपादिका पम्मी चोप्रा आली होती. तिला हा प्रकार खूप अद्भुत वाटला. तिच्या डोक्यात त्याच वेळी अमिताभ बच्चनची ही लहाम मुलांमधील क्रेझ कॉमिक्स बुक मधून आणावी अशी कल्पना सुचली.
तिने तिथेच सेटवर अमिताभला याबाबतीत विचारणा केली. अमिताभने ही फारसे आढेवेढे न घेता या कल्पनेला दुजोरा दिला. पम्मी चोप्रा हिने तिच्या प्रकाशन संस्थेची बोलून या कॉमिक्स बुक बाबत तयारी सुरू केली यातूनच पुढे मग अमिताभच्या कॉमिक्स बुक्स जन्म झाला.
इंडिया बुक हाऊस तर्फे याचे प्रकाशन होत असे. या कॉमिक्स सिरीजचे सल्लागार ख्यातनाम गीतकार गुलजार होते आणि यातील चित्रे ‘अमर चित्र कथा’चे प्रताप मलिक यांनी काढली होती. यातील कथा सुधा चोप्रा यांनी लिहिल्या होत्या.
वाचकांकडून आलेल्या कथावर देखील काही भाग तयार झाले. इंग्रजीत ‘ॲडवेंचर ऑफ अमिताभ बच्चन’ आणि हिंदीत ‘किस्से अमिताभ बच्चन के’ या नावाने या कथा प्रसृत होत.
या कॉमिक्स सिरीज मधून अमिताभला सुपर हिरो दाखवण्यात आले होते. टाईट कपडे, वेल्डिंग करताना वापरतात तसा मोठ्ठा गॉगल, गळ्यात पेंडंट, तसेच या कॅरेक्टरला म्युझिकची आवड असल्याने कानात वॉकमन अशा अवतारात त्याचे कॅरिकेचर ठरले.
====
हे देखील वाचा – जेव्हा अशोककुमार यांनी त्यांच्या पहिल्या नायिकेला ओळखले नाही…
====
अशाच अवतारात तो पुस्तकातून दिसायचा आणि अशक्य ते शक्य करून दाखवायचा! मग विमान अपहरण असेल, डाकूंच्या गॅंग सोबतचा हैदोस असेल किंवा देश द्रोह्यांचा खात्मा असेल, अमिताभ बच्चेकंपनीला खुश करून जायचा. यात त्याचे दोन साथीदार होते त्यांची नावे विजय आणि अँथनी होते. तसेच सोनाली नावाची एक डॉल्फिन त्याची मैत्रीण असायची. ‘कुली’ चित्रपटातील पक्षी बाज (बहिरी ससाणा) शाहीन देखील त्याच्या मदतीला असायचा. दोन वर्ष चांगले चाललेले हे कॉमिक्स मॅगझीन नंतर अचानक पणे बंद पडले.