‘या’ गाण्याच्या शूट वेळी अमिताभ बच्चन होते नाराज !
अमिताभ बच्चन यांच्या सत्तरच्या दशकातील सिनेमांचे गारुड आजच्या युवा पिढीवर देखील आहे. त्याच्या सिनेमातील ॲक्शन, इमोशन, ड्रामा, म्युझिक आणि डायलॉग यावर मागच्या तीन पिढ्या फिदा आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या चित्रपटाशी निगडीत छोटीशी गोष्ट देखील रसिकांना ऐकायला आवडते. आज अमिताभच्या एका चित्रपटातील गाण्याचा किस्सा तुमच्या सोबत शेअर करत आहे.
हा किस्सा आहे राकेश कुमार दिग्दर्शित १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘याराना’ या चित्रपटातील. या चित्रपटात अमिताभ बच्चन, नीतू सिंग, अमजद खान, तनुजा, कादर खान, रणजीत आणि भारत भूषण यांच्या प्रमुख भूमिका होत्या. लालजी पांडे ‘अंजान’ यांनी चित्रपटाची गाणी लिहिली होती. तर संगीत राजेश रोशन यांचे होते. या चित्रपटाची एक महत्वपूर्ण बाब म्हणजे यात एकही फिमेल सिंगरने गायलेले गाणे नव्हते.
सर्व गाणी ही किशोर कुमार आणि रफी यांनी गायलेली होती. कदाचित त्या काळातील हा विक्रम असावा. किशोर कुमार यांनी या चित्रपटात ‘छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा’, भोले ओ भोले, तेरे जैसा यार कहा, तू रुठा दिल टूटा, सारा जमाना हसीनो का दिवाना, बिशन चाचा ही गाणी होती. यातील सर्वात गाजलेल्या ‘छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा’ या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळेसचा आहे.
या गाण्याच्या बाबत जेव्हा सुरुवातीला मीटिंग झाली तेव्हा हे गाणे किशोर कुमार त्याच्या सॉफ्ट व्हॉइसमध्ये संथ गतीमध्ये गातील असे ठरले होते. (या गाण्याची चाल एका रवींद्र संगीतातील गाण्यावरून घेतली होती.) परंतु रेकॉर्डिंगच्या वेळेला किशोर कुमारने असे सजेस्ट केले की, ”या चित्रपटातील इतर गाणी ही द्रुत लयीतील आहेत. त्यामुळे हे गाणेसुद्धा आपण द्रुत लयीतच स्वरबद्ध केले पाहिजे!”
यावर संगीतकार राजेश रोशन यांचे म्हणणे होते की, “आपण अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना तसे सांगितले आहे.” त्यावर किशोर कुमारने सांगितले की, “अमिताभने सांगितल्याप्रमाणे गाण्याची सुरुवात आपण सॉफ्ट टोनमध्ये करू आणि अंतराच्या वेळेला आपण गाण्याचा वेग थोडासा वाढवत नेऊ.” किशोर कुमारसारखा सीनियर सिंगर असे सजेशन देतो त्यावेळेला ते ऐकणे सर्वांना क्रमप्राप्त असते. त्या पद्धतीने गाणे रेकॉर्ड झाले. या गाण्याचे चित्रीकरण कलकत्त्याला नेताजी सुभाष चंद्र बोस स्टेडियममध्ये होणार होते. सर्व टीम आपल्या क्रू सहित कलकत्त्याला दाखल झाले.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावर या गाण्याचे चित्रीकरण सुरू झाले. गाण्याचा मुखडा तर व्यवस्थित चित्रित झाला पण जेव्हा अंतऱ्याची वेळ आली त्यावेळेला अमिताभने सांगितल्याप्रमाणे गाणे हे संथ लयीमध्ये न जाता हाय पीच मध्ये जाऊ लागले. तेव्हा अमिताभला या गाण्यावर लिप सिंकिंग करणे अवघड होऊ लागले. त्याने संगीतकार राजेश रोशन यांना विचारले की, ”हा बदल कसा काय झाला?” त्यावर राजेश रोशन यांनी किशोर कुमारने सांगितल्याप्रमाणे आम्ही गाणे रेकॉर्ड केले असेच सांगितले. अमिताभला या गाण्यात जेव्हा वारंवार लिप सिंकिंगचा व्यत्यय येऊ लागला तेव्हा त्याने हे गाणे पुन्हा एकदा रेकॉर्ड करायला सांगितले.
त्यावर निर्मात्याने सांगितले, ”आता ते शक्य नाही. आपल्याला यातच काहीतरी पर्याय काढला पाहिजे.” मग पर्याय काय काढायचा? तेव्हा अमिताभ बच्चन सुचवले की, ”या गाण्याच्या मुखड्यामध्ये फक्त मी लिप सिंकींग करेल. अंतऱ्याच्या वेळेला हे गाणे पार्श्वभूमीवर वाजवले जाईल!” तुम्ही हे गाणे पहा या गाण्यात फक्त सुरुवातीच्या दोन ते तीन ओळी अमिताभने (Amitabh Bachchan) लिप सिंकिंग केले आहे उरलेले सर्व गाणे पार्श्वभागी वाजवले गेलेले आहे. या सिनेमाच्या शूटच्या वेळी नीतू सिंग कायम उदास असायची कारण तिची नुकतीच एंगेजमेंट ऋषी कपूर सोबत झाली होती आणि त्याचा विरह तिला सहन होत नव्हता. त्यामुळे तिने या सिनेमाचे डबिंग देखील व्यवस्थित केले नाही. तिचे डबिंग बऱ्यापैकी रेखानेच केले होते.
========
हे देखील वाचा : किशोर कुमार स्वत: प्रचंड मोठा फॅन होता या हॉलीवुड मूव्हीचा!
========
जाता जाता: थोडंसं ‘याराना’ या चित्रपटाबद्दल. खरंतर हा चित्रपट १९७७ सालीच फ्लोअर गेला होता परंतु काही ना काही कारणाने हा चित्रपट रखडत गेला. या चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्ड्स दोन वर्षांपूर्वीच म्हणजे १९७९ सालीच मार्केटमध्ये आल्या होत्या. चित्रपट मात्र २३ ऑक्टोबर १९८१ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश कुमार यांनी यापूर्वी अमिताभच्या ‘खून पसीना’ ‘मिस्टर नटवरलाल’ आणि ‘दो और दो पांच’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
‘याराना’ या चित्रपटानंतर ‘चार्ली’ नावाच्या एका चित्रपटाची घोषणा राकेश कुमार यांनी केली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नायिका चक्क पद्मिनी कोल्हापुरे होती. पण ‘कुली’ या चित्रपटाच्या वेळचा अपघात आणि त्यानंतर अमिताभ बच्चन यांचा राजकारणातला प्रवेश यामुळे हा चित्रपट बनलाच नाही! १९८८ साली राकेश कुमार यांनी ‘कौन जीता कौन हारा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी गेस्ट अपियन्स केला होता!