गीतकार आनंद बक्षी यांनी का नाकारले स्वत: लिहिलेल्या गाण्याचे पितृत्व?
त्रिमूर्ती फिल्मचे गुलशन रॉय यांनी सत्तरच्या दशकामध्ये अनेक सुपरहिट हिंदी सिनेमी रसिकांना दिले. त्यांचा मुलगा राजीव रॉय ऐंशीच्या दशकात त्यांच्यासोबत आला. १९८५ प्रदर्शित झालेल्या ‘युद्ध’ या चित्रपटापासून त्याने दिग्दर्शनाला सुरुवात केली. १९८९ साली आलेल्या ‘त्रिदेव’ या चित्रपटापासून त्यांचे मोठे नाव झाले.एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून त्यांचा बोलबाला झाला. त्रिदेव हा चित्रपट त्याकाळचा हा बिग बजेट सिनेमा होता. नसरुद्दीन शाह सनी देओल, जॅकी श्रॉफ, संगीता बिजलानी, माधुरी दीक्षित, सोनम, अनुपम खेर, अमरीश पुरी असे मोठे स्टार्स या सिनेमात होते. या सिनेमातील एका लोकप्रिय गाण्याचा किस्सा खूप मजेदार आहे. या चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती तर संगीत कल्याणजी आनंदजी विजू शहा यांचे होते. या सिनेमातील एक गाणे जे पुढील काळामध्ये प्रचंड लोकप्रिय झाले होते त्याच गाण्याचा हा किस्सा आहे. खरं तर हे गाणे आनंद बक्षी यांनी लिहिले होते परंतु आनंद बक्षी यांनी हे गाणे लोकप्रिय झाल्यानंतर ‘हे गाणे मी लिहिलेच नाही’ असे सुरुवातीला सर्वांना सांगत होते. आनंद बक्षी यांनी का नाकारले स्वत: लिहिलेल्या गाण्याचे पितृत्व? त्याचाच हा किस्सा आहे.
या चित्रपटाच्या एका सिच्युएशन मध्ये नसरुद्दीन शहा एका फिल्म शूटिंगमध्ये जातो आणि तिथे एक गाणे सादर करतो असा एक शॉट होता. हा शॉट ज्यावेळी राजीव रॉय यांनी आनंद बक्षी यांना समजावून सांगितला; त्यावेळी आनंद बक्षी म्हणाले ,”आपल्या सिनेमात बऱ्याच काळापासून ‘टोपी’ या शब्दावरील गाणे आलेले नाही.” त्यामुळे आनंद बक्षी यांनी ‘टोपी’ हा शब्द केंद्रस्थानी ठेवून गाणे लिहायचे ठरवले आणि त्यांनी लगेच दिग्दर्शक राजीव रॉय यांना गाणे लिहून दिले. ते गाणे होते ‘तिरछी टोपी वाले…’
गाण्याचे रेकॉर्डिंग ठरले परंतु त्याच्या दोन दिवस आधी विजू शहा यांना यांच्या एका आफ्रिकेतील मित्राने ग्लेरीया अस्तफा यांची ‘साऊंड मशीन’ ही कॅसेट त्यांच्याकडे पाठवली. या कॅसेट मधील एका गाण्यात वारंवार ‘ओये ओये’ असा शब्द आला होता. त्यांना हा शब्द खूप आवडला. हा शब्द त्यांना बऱ्यापैकी इंडियन कल्चर ला कोरिलेट करणारा वाटला. त्यामुळे त्यांनी हा शब्द आपल्या गाण्यांमध्ये घ्यायचे ठरवले. रेकॉर्डिंगच्या वेळेला दिग्दर्शक राजीव रॉय यांनी विजू शहा यांना यासाठी सहमती दर्शवली. त्या दिवशी रेकॉर्डिंगला आनंद बक्षी काही उपस्थित नव्हते त्यामुळे त्यांना न विचारता त्यांनी या गाण्यात हा शब्द टाकला. आता या गाण्यांमध्ये ‘तिरछी टोपी वाले…’ या वाक्याच्या आधी आणि नंतर ‘ओये ओये’ हा शब्द वाढवून बदल केला गेला. मीटरमध्ये तो मस्त बसला. त्यामुळे या गाण्यात आता प्रामुख्याने ‘ओये ओये’ हेच ऐकायला मिळू लागले!
काही दिवसातच या चित्रपटाच्या कॅसेट्स मार्केटमध्ये आल्या आणि रसिकांच्या त्याच्यांवर प्रचंड उड्या पडल्या. या कॅसेटचा जबरदस्त खप झाला . देशभरात या गाण्याने प्रचंड धूम मचवली. सारा देश त्या काळात ‘ओये ओये’ हेच संबोधन वापरत होता. हा संपूर्ण करिश्मा ‘ओये ओये’ या शब्दांचा होता! हे गाणे ऐकल्यानंतर आनंद बक्षी यांच्या काही मित्रांनी त्यांना फोन करून सांगितले ,” ‘त्रिदेव’ चित्रपटातील तुम्ही लिहिलेले ‘ओये ओये’ गाणे खूपच जबरदस्त आहे!” त्यावर आनंद बक्षी म्हणाले , ‘ओये ओये’?” असे कुठलेही गाणे तर मी लिहिलेलंच नाही. या गाण्याशी माझा काही संबंधच नाही!” त्यावर त्यांचे मित्र म्हणाले,” अहो कॅसेटवर तर गीतकार म्हणून तुमचेच नाव आहे.” आता चकीत व्हायची पाळी आनंद बक्षी यांची होती. हा काय प्रकार म्हणून त्यांनी ती कॅसेट मागवली आणि ते गाणे ऐकलं. त्यांनी कपाळाला हात मारून घेतला कारण त्यांनी लिहिलेल्या ‘तिरछी टोपी वाले…’ या शब्दांना आता फारसे महत्त्व राहिलंच नव्हतं आता महत्त्व प्राप्त झालं होतं ‘ओये ओये’ या शब्दांना! अशाप्रकारे “ज्या शब्दांमुळे लोकप्रियता या गाण्याला मिळाली ते शब्द मूळात मी लिहिलेच नाहीत” असे म्हणत आनंद बक्षी यांनी सुरुवातीला या गाण्याचे पितृत्व टाळले होते! परंतु काळ बदलला हळूहळू त्यांनी देखील मान्य केले असे बदल संगीतकारांकडून होतच असतात आणि हे गाणे आज देखील प्रचंड लोकप्रिय आहे.
======
हे देखील वाचा : महागड्या कॅमेऱ्याची लेन्स फुटली पण शॉट झाला एकदम ओक्के!
======
‘ओये ओये’ या शब्दांची जादू इतकी जबरदस्त होती की, या चित्रपटातील एका आणखी दुसऱ्या गाण्यात देखील हे शब्द घालण्यात आले. ते गाणं होतं ‘गजर ने किया है इशारा…’ मूळ गाण्यात हे शब्द नव्हते परंतु या गाण्यात देखील ‘ओये ओये’ हे शब्द वापरण्यात आले. थोडक्यात या ‘त्रिदेव’ चित्रपटाला यश मिळवण्यासाठी या शब्दांचा मोठा उपयोग झाला. या चित्रपटातील इतर सर्व गाणी देखील खूप गाजली होती. ती गाणी होती ‘मै तेरी मोहब्बत में पागल हो जाउंगा’ , ‘रात भर जाम से जाम टकरायेगा’ ही गाणी प्रचंड गाजली. ‘तिरछी टोपी वाले…’ हे गाणे नंतर ‘डबल धमाल ‘ आणि ‘अजहर’ या सिनेमात देखील घेतले गेले तर ‘गजर ने किया है इशारा ‘ हे गाणे कन्नड सुपर हिट मुव्ही के जी एफ मध्ये वापरले गेले.
‘तिरछी टोपी वाले…’ हे गाणे सिनेमात नासीर आणि सोनम वर चित्रित झाले होते, तर अमित कुमार आणि सपना मुखर्जी ने गायले होते. या गाण्या साठी सपनाला फिल्मफेयर चे अवार्ड मिळाले होते!