‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
संजीव कुमारमुळेच अनिल कपूरचा सिनेमा बनू शकला!
अभिनेता संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांच्या बाबतचा एक भावस्पर्शी किस्सा बोनी कपूर यांनी शेअर केला होता. यात त्यांनी सांगितले, ”जर अभिनेता संजीव कुमार यांनी त्यावेळी मला वेळीच मदत केली नसती तर कदाचित अनिल कपूरला लॉन्च करण्यासाठी केलेला चित्रपट ‘वो सात दिन’ कधीच पडद्यावर आला नसता. संजीव कुमारच्या दर्या दिलीचा प्रत्यय देणारा हा किस्सा आहे. काय होता हा नेमका किस्सा?
अनिल कपूर आणि बोनी कपूर यांचे वडील म्हणजे सुरेंद्र कपूर त्यांनी १९७८ साली एक चित्रपट बनवला होता ‘फुल खिले है गुलशन गुलशन’ हा चित्रपट सुपरफ्लॉप झाल्यामुळे त्यांना त्या काळात तब्बल २२ लाख रुपयांचं नुकसान झालं होतं. हे नुकसान जर भरून काढायचा असेल तर पुन्हा एक चित्रपट बनवावा लागणार होता. बोनी कपूर यांनी आता स्वतः निर्माता व्हायचं ठरवलं आणि चित्रपटाची निर्मिती सुरू केली.
चित्रपटाचे नाव ठेवले ‘हम पांच’. या चित्रपटात संजीव कुमार यांनी एक वेगळा रोल केला होता. या मध्यवर्ती भूमिकेसाठी संजीव कुमारला घ्यायचं त्यांच्या डोक्यात होतं पण त्या काळातला संजीव कुमार यांचा मानधन त्यांना परवडणारा नव्हते. तरी धीर एकवटून ते संजीव कुमारकडे गेले आणि त्यांना सांगितले की, ”सोलो निर्माता म्हणून हा माझा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात आपण काम करावे ही माझी इच्छा आहे.” संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांनी कथानक ऐकले त्यांना कथानक आवडले, त्यातली भूमिका देखील आवडली. नंतर बोनी कपूर म्हणाले, ”परंतु तुमचे मानधन आम्हाला परवडणारे नाही.” त्यावर संजीव कुमार म्हणाले, ”प्रश्न तो नाहीये. तुम्ही मला किती पैसे देऊ शकता?” त्यावर बोनी कपूर म्हणाले, ”सॉरी. पण फार फार तर मी तुम्हाला सात लाख रुपये देऊ शकतो.” संजीव कुमार म्हणाले, ”ठीक आहे. मी तुमच्या चित्रपटात काम करेन.”
याच काळात बोनी कपूर यांच्या बहिणीचे लग्न देखील होते. सायनिंग अमाऊंट म्हणून बोनी कपूर यांनी संजीव कुमार यांना पन्नास हजार रुपये कॅश आणि पाच हजार रुपयांचा चेक द्यायचे ठरवले. बोनी कपूर यांच्या बहिणीचे लग्न आहे ही बातमी संजीव कुमार यांना कळाली होती. त्यांनी बोनीला सांगितले, ”मी फक्त पाच हजार रुपयांचा चेक आता घेतो. ते पन्नास हजार रुपये तुमच्याकडेच राहू द्या. घरात लग्न आहे. पैसे लागतील. हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर मला तुम्ही पैसे द्या.” संजीव कुमार (Sanjeev Kumar)ने केवळ पाच हजार रुपयांमध्ये हा सिनेमा साइन केला. चित्रपट तयार झाला आणि सुपरहिट झाला. सिनेमा रिलीज झाल्या नंतर संजीव कुमारचे मानधन त्यांना प्रदान करण्यात आले!
या निमित्ताने संजीव कुमार आणि बोनी कपूर यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री झाली. ‘हम पांच’ हिट झाल्यानंतर बोनी कपूरने आता आपला धाकटा भाऊ अनिल कपूर याला लॉन्च करण्यासाठी एक चित्रपट निर्माण करायचे ठरवले. अनिल कपूर तसा ‘हमारे तुम्हारे’ या चित्रपटात संजीव कुमारसोबत छोटी भूमिका केली होतीच. तसेच मनी रत्नम यांच्या एका कन्नड सिनेमात देखील त्याने एक रोल केला होता. पण त्याच्यासाठी एक स्वतंत्र चित्रपट तयार करणे गरजेचे होते. दरम्यान बोनी कपूर यांनी ‘आंधा सात नाटकल’ हा एक तमिळ चित्रपट पहिला. त्यांना तो चित्रपट खूप आवडला. या चित्रपटाचा हिंदी रीमेक करायचे त्यांनी ठरवले त्यासाठी त्यांनी या तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शक के भाग्यराज यांना जाऊन मद्रासला ते भेटले.
त्या निर्मात्यांनी परवानगी दिली पण त्यासाठी त्यांनी सव्वा लाख रुपये मागितले. एवढी मोठी रक्कम मद्रासमध्ये उभे करणे अवघड होते. बोनी कपूर यांना आठवले की संजीव कुमार यांच्या एका चित्रपटाचे शूटिंग मद्रासला चालू आहे. ते लगेच संजीव कुमार यांना जाऊन भेटले. संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांनी बोनीचा चेहरा पाहिला आणि लक्षात आले की काहीतरी टेन्शन आहे. हॉटेलवर आल्यानंतर त्यांनी विचारले “काय प्रॉब्लेम आहे?” त्यावर बोनीने सर्व स्टोरी सांगितली. संजीव कुमार काही बोलले नाहीत. “ठीक आहे. बघुयात.” असं म्हणाले. बोनी कपूर निघून गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी बोनी कपूर यांना संजीव कुमारच्या असिस्टंटचा फोन आला आणि म्हणाले, ”साहेबांनी तुम्हाला हॉटेलवर बोलावले आहे.” बोनी कपूर हॉटेलला पोहोचले. मॅनेजरने त्यांना रूममध्ये जाण्यासाठी सांगितले. संजीव कुमार आले आणि म्हणाले, ”त्या उशीखाली एक पाकीट आहे. ते घ्या.” बोनी कपूर पाहिले तर त्यात दीड लाख रुपये होते! एवढी मोठी रक्कम संजीव कुमारने त्यांच्यासाठी एका रात्रीत उभी केली होती. संजीव कुमार बोनी कपूरला म्हणाले, ”हे पैसे घेऊन ताबडतोब त्या तामिळ निर्मात्याकडे जा आणि सिनेमाच्या रिमेकचे राईट घेतल्याचे लेटर मला आणून दाखवा.” बोनी कपूर यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
संजीव कुमारने त्यांच्या मनावरचं मोठं ओझं तर उतरवलं होतच शिवाय अनिल कपूरला लाँच करण्याचे जे स्वप्न बोनी कपूर यांनी पाहिले होते ते आता प्रत्यक्ष उतरण्याचा मार्ग प्रशस्त झाला होता. ताबडतोब बोनी कपूर तमिळ निर्मात्याकडे गेले. त्यांच्याकडून राईट विकत घेतले आणि संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांना ते लेटर दाखवले. संजीव कुमार खूप आनंदी झाले आणि ते म्हणाले, ”गो अहेड. बेस्ट लक.” बोनी कपूर म्हणाले, ”पण हे पैसे मी तुम्हाला कधी परत करायचे?” तेव्हा संजीव कुमार म्हणाले, ”तुम्ही मुंबईत आहात. मी मुंबई मध्येच आहे. तेव्हा काळजी कशाची?” ‘वो सात दिन’ हा चित्रपट देखील बापू यांनीच दिग्दर्शित केला होता.
==========
हे देखील वाचा : किशोर कुमार आणि बप्पी लहरीच्या गाण्याची झाली अदलाबदल!
==========
अनिल कपूर, पद्मिनी कोल्हापुरे ,नसरुद्दीन शहा यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट सुपरहिट झाला. अनिल कपूर हिरो म्हणून या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आला. संजीव कुमार (Sanjeev Kumar)ने त्यावेळी सव्वा लाख रुपयांची जी मदत केली त्यामुळे अनिल कपूरचे करिअर उभे राहण्यासाठी खूप मदत झाली. चित्रपट हिट झाल्यानंतर बोनी कपूर यांनी आणि संजीव कुमार यांचे पैसे परत केले. संजीव कुमारला घेऊन बोनी कपूर चित्रपट बनवायचा होता पण ते स्वप्न अर्धवटच राहिले कारण ६ नोव्हेंबर १९८५ या दिवशी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने संजीव कुमार यांचे निधन झाले!