भूषण प्रधानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अनुषा दांडेकरने लिहिले खास पोस्ट
भूषण प्रधानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अनुषा दांडेकरने लिहिले खास पोस्ट
मनोरंजनविश्वातील कलाकार आणि त्यांचे प्रेम प्रकरणं हे प्रेक्षक आणि मीडियासाठी नवीन नाही. अनेकदा बऱ्याच कलाकारांचे नाव दुसऱ्याशी जोडले जाते. कधी कधी कलाकार स्वतःहून त्यांचे नाते जगासमोर जाहीर करतात. कधी कधी प्रेक्षक स्वतःहून त्यांच्या पोस्टमधून, बोलण्यातून योग्य अर्थ काढतात. असेच काहीसे सध्या मराठी मनोरंजनविश्वात सुरु आहे.
मराठी सिनेसृष्टीला अतिशय हँडसम, प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जाणारा भूषण प्रधान यावर्षी खूपच गाजत आहे. यंदा त्याने ‘घरत गणपती’ आणि ‘जुनं फर्निचर’ हे दोन्ही सुपरहिट सिनेमे दिले. त्यामुळे २०२४ हे वर्ष त्याच्यासाठी खूपच चांगले गेले. त्याच्या करियरच्यादृष्टीने हे वर्ष खूपच खास गेले. शिवाय त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील सध्या खूपच गाजत आहे. त्याचे वैयक्तिक आयुष्य चांगलेच चर्चेत असून, तो आणि अभिनेत्री अनुषा दांडेकरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या तुफान चर्चा आहे.
भूषण आणि अनुषा मधल्या काही काळापासून ते दोघं सतत सोबत दिसत असून, सोशल मीडियावर देखील ते नेहमीच त्यांचे एकत्र फोटो, व्हिडिओ शेअर करताना दिसतात. यावरून ते दोघं नात्यात असल्याचे चर्चा सतत होत आहे. नुकताच भूषण प्रधानने त्याचा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने अनुष्ठाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून ते दोघं नक्कीच नात्यात आहे असे सांगितले जात आहे.
अनुषाने भूषणला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सोशल मीडियावर लिहिले, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भुशी! येणारे प्रत्येक वर्ष तुझ्यासाठी अविश्वसनीय आणि भरभराटीचे जावो. तू खूप हुशार आहेस आणि तुझ्या या हुशारीची झलक संपूर्ण जगाने पाहावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. मला नेहमी खुश ठेवल्याबद्दल थँक्यू, मला छोट्या-छोट्या गोष्टी देऊन सरप्राइज दिल्याबद्दल थँक्यू. तुझं मन खरंच खूप मोठं आहे.
तू एक खरा माणूस, चांगला मुलगा, भाऊ, एक खूप छान मित्र आणि तुझ्यातल्या याच गोष्टी मला खूप आवडतात. तू सर्वांवर मनापासून प्रेम करतोस. आपले स्वभाव एकदम जुळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझा स्वभाव खूप खरा आहे… हा खरेपणा कायम जपून ठेव. मी तुला फक्त वर्षभर ओळखतेय पण, आता हे वर्ष शंभर वर्षांइतकं वाटतंय… ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे ना? लव्ह यू! भूषण प्रधान”
अनुषाने या पोस्टबरोबर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आतापर्यंत जेवढा एकत्र प्रवास करून नवनवीन ठिकाणी पहिली आहेत तिथले त्यांचे व्हिडिओ आहेत. अनुषाची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकप्रकारे त्यांच्या लोकांच्या मनात या दोघांबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल शिक्कमोर्तब झाले आहे. अनेकांनी तर ‘तुम्ही आता लवकर लग्न करा’ असा थेट सल्लाच देऊन टाकला आहे. मात्र अधिकृतरीत्या या दोघांपैकी अजून कोणीही त्यांचे नाते जाहीर केलेले नाही. आता कधी ते त्यांचे नाते जाहीर करतात याची त्यांच्या फॅन्सला उत्सुकता आहे.