
ARANYA Movie Trailer: जंगलातील संघर्ष, नात्यांची गुंफण आणि थरारक सत्यकथा सांगणाऱ्या ‘अरण्य’चा ट्रेलर प्रदर्शित !
मराठी चित्रपटसृष्टी नेहमीच वास्तव आणि सामाजिक भान असलेली विषयवस्तू हाताळत आली आहे. त्याच परंपरेतून आता एक हृदयस्पर्शी आणि थरारक कथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सत्य घटनांनी प्रेरित ‘अरण्य’या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. या ट्रेलरमध्ये संघर्षमय जीवनाची झुंज, नक्षलवादाने उद्ध्वस्त होत चाललेले आयुष्य, नात्यांमधील गुंतागुंत आणि जंगलातील धडकी भरवणारा वास्तव संघर्ष प्रभावीपणे उलगडण्यात आला आहे. मात्र हा केवळ हिंसक किंवा थरारक सिनेमा नाही, तर बाप-लेकीच्या नात्याची भावनिक कहाणीही आहे जी प्रेक्षकांच्या काळजाला भिडेल.(ARANYA Movie Trailer)

‘अरण्य’ची खरी ताकद म्हणजे त्याला मिळालेला वास्तवाचा स्पर्श. हा चित्रपट गडचिरोलीच्या दाट जंगलात प्रत्यक्ष चित्रित करण्यात आला आहे. स्थानिक विदर्भी लहेजा, जंगलातील दृश्ये, स्थानिक वातावरण आणि ग्रामीण जीवनाचे तपशील यामुळे चित्रपटाला जिवंतपणा लाभला आहे. पडद्यावर प्रेक्षकांना केवळ एक सिनेमा पाहत असल्याची जाणीव न राहता, ते प्रत्यक्ष जंगलात त्या प्रवासाचा भाग झाल्यासारखे वाटते.

दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे म्हणतात,’अरण्य’ ही केवळ नक्षलवादावरची गोष्ट नाही. ही जंगलात जगणाऱ्या सामान्य माणसाची, त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या नात्यांची कथा आहे. या चित्रपटात आम्ही कोणतीही कृत्रिमता ठेवली नाही. गडचिरोलीच्या जंगलात प्रत्यक्ष शूटिंगमुळे या सिनेमाला अस्सल गंध मिळाला आहे. कलाकारांनीही या वातावरणाशी स्वतःला एकरूप केलं. ही कथा सत्य घटनांनी प्रेरित असल्यामुळे तिचा थरार आणि वेदना प्रेक्षकांना आतपर्यंत भिडेल.”(ARANYA Movie Trailer)
===============================
हे देखील वाचा: Kurla To Vengurla Trailer: ग्रामीण वास्तवाला विनोदी रंग देणारा कौटुंबिक सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लॉन्च!
===============================
एस. एस. स्टुडिओ आणि एक्स्पो प्रस्तुत, अदिक फिल्म्सच्या साहाय्याने, अमोल दिगांबर करंबे लिखित व दिग्दर्शित या चित्रपटात हार्दिक जोशी, वीणा जगताप, हिृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, चेतन चावडा आणि अमोल खापरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. निर्माते शरद पाटील आणि अंजली पाटील आहेत.‘अरण्य’चा ट्रेलर पाहूनच प्रेक्षकांना त्यातील थरार, भावनिक गुंफण आणि जंगलातील भीषण वास्तव अनुभवायला मिळालं आहे. १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी केवळ एक सिनेमा ठरणार नाही, तर संघर्ष, आशा आणि नात्यांचा थरारक प्रवास ठरणार आहे.