असा घडला बाल कलाकार ते संगीतकार आशिष गाडे…
बालपणापासून एखाद्या गोष्टीची आवड निर्माण होते आणि मग जीवनात अशी अनेक वळणं येत जातात, की जिथे तुमचं करिअर घडू लागतं. तुमची मेहनत, तुमचं ध्येय, घरून मिळणारा पाठिंबा तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायला मदत करतो. असंच घडलं ते आशिष गाडे या युवा कलाकाराच्या बाबतीत. त्याच्या बालपणीपासून अभिनय क्षेत्रातला त्याचा आजपर्यंतचा प्रवास आपल्याला प्रेरणा देणारा आहे. आशिषची आई पार्ले टिळक विद्यालयात आधी शिक्षिका आणि मग मुख्याध्यापिका आणि त्याचे बाबा महानगरपालिकेत नोकरी करणारे. त्याची आई उत्तम नाटक लिहायची, तर त्याच्या बाबांना संगीत कलेची आवड. गाण्याच्या कॅसेट्स गोळा करून त्या सातत्याने ऐकण्याचा बाबांना छंद होता. त्यांच्या घरात रेडिओ सतत चालू असायचा. या गोष्टींचे संस्कार सहाजिकच आशिषवर होत गेले.
त्याने वामन केंद्रे आणि गौरी केंद्रे यांचे अभिनय प्रशिक्षण शिबीर बालपणीच केले होते. तसेच अशोक आणि चित्रा पावसकर यांच्या शिबिरातही तो आवडीने जायचा आणि मग शिबिरातील विद्यार्थ्यांची जी नाटकं बसवली जायची आणि त्याचे प्रयोग व्हायचे, त्यातही आशिष असायचा. अशाच एका “चिनी चेटकीण” नावाच्या बालनाट्यातील त्याचे काम निर्माते मोहन वाघ यांनी पाहिले आणि त्यांनी त्यांच्या “चंद्रलेखा” निर्मित “रिमोट कंट्रोल” या नाटकासाठी आशिषची निवड केली. स्वाती चिटणीस, राजन भिसे या कलाकारांसोबत काम करताना आशिषला खूप काही शिकता आले. मग “सोनपंखी”, “चंद्रलेखा” च्या नाटकात अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांच्याबरोबर त्याची भूमिका होती. आशिष तेव्हा शाळेत होता. तो डबिंग देखील करू लागला. उपेंद्र दाते यांच्या “रंगमंच” साठी “तरुण तुर्क म्हातारे अर्क” मधील ‘कुंदा’ सुद्धा त्याने साकारला. आशिषची बहीण आकांक्षा ही देखील अभिनेत्री आहे. त्यामुळे नाट्यकलेचे वेड हे आपल्या बहिणीकडून आले आहे, असेही तो सांगतो.
हे हि वाचा : ‘हरहुन्नरी’ असा आपला तुषार साळी सगळ्यातच भारी !
कॉलेजमध्ये जायचं तर ते साठ्ये कॉलेजलाच आणि तिथे एकांकिका, नाट्यपर्व हे सर्व करायचं असं त्याने तेव्हाच निश्चित केलं. साठ्ये कॉलेजला तो एकांकिकेत काम करू लागला. “बंदे में था दम” साठी त्याला आय एन टी एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हे पारितोषिक मिळाले. “मी मराठी” वरील “वरचा क्लास” आणि “स्टार प्रवाह” वरील “ओळख” या त्याच्या गाजलेल्या मालिका.
आशिषला संगीत कलेची उत्तम आवड आहे. सेटवर जाताना तो आजही गिटार घेऊन जातो. “अरे वेड्या मना” च्या सेटवर आशिष, अविनाश नारकर आणि अभिजित आमकर यांची संगीत कलेची आवड जपली जात होती, हे सर्वांना माहित आहे. युथ फेस्टिव्हलमध्ये आशिषने मूक अभिनय, स्किट, एकांकिका, वाद्यवृन्द या सर्व स्पर्धात यश मिळवले. अशा युवा कलावंतांना घेऊन ‘पार्लेकर’ हा ग्रुप स्थापन झाला आणि या गटाने “झी मराठी” वरील “मराठी पाऊल पडते पुढे” मध्ये आपली कला सादर केली. तिथे मकरंद देशपांडे हे परीक्षक होते. त्यांनी आशिषची कला लक्षात ठेवली. त्यांचा महत्वाचा प्रोजेक्ट होता “व्हॉट अ लोटा” हे नाट्य. त्या प्रयोगात संगीतकलेच्या संदर्भातील कामासाठी आशिषला संधी मिळाली. त्या नाट्यप्रयोगासाठी प्रमुख संगीतकार म्हणून शैलेंद्र बर्वे होते . त्यांच्याकडूनही आशिषला खूप काही शिकता आले.
पुढे मग “कृष्णा”, “हनुमानजी आ रहे हैं” यासाठी आशिषने संगीतकार म्हणून स्वतंत्रपणे जबाबदारी पेलली. “मेरी मॉं के हाथ”, “मदर करेज” या अतिशय महत्वाच्या नाट्यकृतींना त्याने संगीत दिलं. दरम्यान अनेक एपिसोडिक मालिका सुद्धा त्याने केल्या. “रुंजी”, “कु कु च कु”, “लक्ष्य” या काही त्यातील मालिका. “यारी दोस्ती”, “कॉल फॉर फन” या चित्रपटात देखील त्याच्या भूमिका होत्या. “गोंद्या आला रे” या वेब सिरीज मधील त्याची थोडीशी नकारात्मक छटा असलेली भूमिका अनेकांना आवडली. त्यासाठी त्याने टक्कल केले होते. सध्या आशिष आपल्याला “सोनीमराठी” वरील “सावित्री ज्योती” मध्ये “नारायण” या नकारात्मक भूमिकेत दिसतो. लॉकडाऊनच्या काळात त्याने “आशिष गाडे एन्टरटेनमेन्ट चॅनल” या त्याच्या स्वतःच्या यु ट्यूब चॅनल वर लक्ष केंद्रित केलं. असा हा अभिनेता, संगीतकार आशिष लवकरच आणखी काही प्रोजेक्ट मध्ये आपल्याला दिसणार आहे.