
Avkarika Movie Trailer: पथनाट्याने रंगला ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा !
स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या आणि त्या संदर्भातील जनजागृतीची प्रभावी मांडणी रविंद्र नाट्यमंदिरात झालेल्या पथनाट्य सादरीकरणातून करण्यात आली. ‘अवकारीका’ या आगामी मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचे हे अनोखे अनावरण रसिकांच्या विशेष पसंतीस उतरले. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सादर करण्यात आलेल्या या पथनाट्यातून सामाजिक संदेश देत स्वच्छतेचा गंभीर मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आला. या वेळी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस महासंचालक मा. श्री. कृष्णप्रकाश यांनी उपस्थित राहून संपूर्ण टीमच्या उपक्रमशीलतेचं कौतुक करत चित्रपटासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.(Avkarika Marathi Movie Trailer)

रेडबड मोशन पिक्चर्स निर्मित ‘अवकारीका‘ हा चित्रपट १ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. अरविंद भोसले यांनी चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन केलं आहे. निर्मिती भारत टिळेकर आणि अरुण जाधव यांची असून सहनिर्माते मनोज गायकवाड, मृणाल कानडे, गीता सिंग आणि अरविंद भोसले आहेत.

“स्वच्छतेसंदर्भातील बेपर्वाईमुळे समाजात गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सफाई कामगारांच्या दैनंदिन संघर्षाकडे समाजानं दुर्लक्ष केलं आहे. त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडावा, यासाठी ‘अवकारीका’ची निर्मिती केली,” असं दिग्दर्शक अरविंद भोसले यांनी सांगितलं. अभिनेता विराट मडके यांनीही, “समाजप्रबोधनाचं साधन असलेल्या या चित्रपटाचा भाग होण्याचा मला आनंद आहे. दिग्दर्शक भोसले यांनी घेतलेली जबाबदारी महत्त्वाची वाटली,” असं सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या.(Avkarika Marathi Movie Trailer)
====================================
====================================
चित्रपटात विराट मडके सफाई कामगाराच्या भूमिकेत दिसणार असून त्यांच्यासोबत राहुल फलटणकर, रोहित पवार, विनोद खुरंगळे, पिया कोसुम्बकर, नितीन लोंढे, प्रफुल्ल कांबळे, स्नेहा बालपांडे आणि बालकलाकार वैभवी कुटे, उन्नती माने, कार्तिकी बट्टे आदींच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते स्वतः दिग्दर्शक अरविंद भोसले यांनी लिहिलेली असून छायांकन करण तांदळे, संकलन अथर्व मुळे यांचं आहे. सहदिग्दर्शक रेहमान पठाण, कार्यकारी निर्माते चेतन परदेशी असून संगीत श्रेयस देशपांडे यांचं आहे. गीतांना कैलास खेर, सुनिधी चौहान आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांचे स्वर लाभले आहेत. कलादिग्दर्शन शैलेश रणदिवे यांचे आहे. दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचा विषय मांडणारा ‘अवकारीका‘ हा चित्रपट समाजाला नवा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करत असून प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.