Marathi Movie Review : ‘गोंधळ’ बघून तुमच्या डोक्याच्या तारा हलतील;

Web Series Review Baai Tujhyapayi: वयात आलेल्या प्रत्येक मुलीची करुण कहाणी!
मुलीला पाळी आली की तिचं स्वातंत्र्य हिरावलं जातं असं जरा का मी तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसेल का? काही जण म्हणतील अरे असं कसं? आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर Periods आले म्हणजे मुलगी मोठी झाली आणि त्याचा आनंद हा सेलिब्रेट केला जातो… पण बाई तुझ्यापायी या वेब सीरीजमध्ये चक्क पाळी आल्यानंतर मुलींची सगळी स्वप्न एका क्षणात तुटतात आणि तिचा तिला नको असलेला एक वेगळाच प्रवास कसा सुरु होतो यावर भाष्य करणारा आहे.. खरं तर पाळी आणि शिक्षण यावर आधारित ही सीरीज प्रत्येकाला एक नवी दिशा देणारी आहे… चला तर मग जाणून घेऊयात निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बाई तुझ्यापायी’ ही सीरीज आहे तरी कशी?

आधी थोडक्यात कथानक जाणून घेऊयात… अगदी ४००-५०० वर्षांपूर्वींची गोष्ट आहे… एका गावात वेसाई देवीचं मंदिर आहे आणि त्या देवीला फक्त कुमारीका पुजू शकतात आणि केवळ त्यांनाच तिच्या मंदिरात प्रवेश करण्याची मुभा आहे… थोडक्यात सासुरवासीण होण्याआधी वेसाईचं मंदिर हे त्या कुमारीकांचं हक्काचं माहेर आहे… वेसाईच्या देवळात पाळी आलेल्या मुलीला किंवा स्त्रीला प्रवेश करता येत नाही आणि जर का एखाद्या मुलीने चूकून किंवा मुद्दामहुन मंदिराच्या गाभाऱ्या प्रवेश केलाच तर तिचा मृत्यू होतो आणि त्याचे दुष्परिणाम अख्ख्या गावाला भोगावे लागतात… बरीच वर्ष गावकरी ही प्रथा नित्यनियमाने पाळत होते… पण एकदा ही प्रथा मोडली जाते आणि वेसाई देवी कोपते… कालांतराने पुन्हा गाव नव्याने आपलं जीवन सुरु करतं आणि त्या गावाचं नाव असतं वेसाईचं वडगाव… या वेसाईच्या वडगावात अहिल्या ही मुलगी उराशी डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगत असते… पण प्रथेप्रमाणे पाळी आलीच तर पुढे काय? या प्रश्नाचं उत्तर सुटतं की नाही? यासाठी झी ५ वर ही सीरीज एकदा तरी नक्की पाहायला हवीच….

सगळ्यात आधी वळूयात दिग्दर्शन आणि कथेच्या निवड आणि मांडणीकडे… आजही महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या खेड्यापाड्यातील स्त्रीयांचं जीवन चुल-मूल यातच अडकलं आहे हे आपण जाणतोच… आणि तीच परिस्थिती दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी अचुकपणे मांडली आहे…. पिढ्या न् पिढ्या सुरु असणारी परंपरा, गावातील पुरुष मंडळी यांनी आपल्या शिक्षणावर किंवा मुलभूत हक्कावर देवाच्या नावाखाली घातलेली बंदी हे सारं काय यात आपल्यापा पाहायला मिळतं…. खरं तर मुलगी वयात येणं हा प्रत्येक कुटुंबाचा एक वैयक्तिक आनंदाचा सोहळा आहे… पण या सीरीजमध्ये गावातील मुली वयात येणं म्हणजे गावाचा उद्धार आहे असं मानलं जातं आणि त्यासाठी मुलींच्या शिक्षणावरही बंदी कशी घातली जाते याचं चित्रण फार अभ्यासपुर्वक सादर केलं आहे… शिवाय, गावातील जमीनी हडपण्यासाठी लेकी-बाळांचा कसा वापर केला जातो हे देखील यात दाखवलं गेलंय हे विशेष

आता तांत्रिक गोष्टींकडे वळूयात… गावातील सर्वसामान्य जीवन, गावातील एकच शाळा आणि सहसा शाळेत आणि एकूणच गावात असणारं पुरुषांचं वर्चस्व फार उत्तमपणे सादर करण्यात मेकर्सना यश आलं आहे… कथेचा मुळ गाभा लक्षात घेता प्रत्येकवेळी नायिकेच्या भोवती कथानक फिरवत ठेवण्याचं कौशल्य आणि त्यानुसार कॅमेरा अॅंग्ल्सचा केलेला वापर नक्कीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आहे… मुळात कथेतून तर स्त्री किंवा मुलींचं जीवन, त्यांच्या अडचणी यात मांडल्या आहेतच पण त्यासोबतच टॅक्नीक्स किंवा कॅमेऱ्याच्या माध्यमातून कुठलाही संवाद नसतानाही आपल्याला त्या ठराविक पात्राला काय बोलायचं आहे हे समजतं आणि त्याचं संपूर्ण श्रेय टॅक्नीकल टीमला नक्कीच द्यावं लागेल….

उत्कृष्ट लिखाण, दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू असली की पुढची जबाबदारी येते ती म्हणजे अभिनय सादरीकरणाची आणि ती अभिनेत्री साजिरी जोशी हिने इतकी लिलया सांभाळली आहे की सांगता सोय नाही… तर, खेडेगावतली कमी शिकलेली आई; जिचं जग म्हणजे तिचा नवरा आणि मुलगी आहे हे परफेक्ट पोट्रे करण्याचं काम अभिनेत्री क्षिती जोग हिने केलं आहे…. याव्यतिरिक्त सीरीजमधल्या प्रत्येक पात्राने आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे….
================================
हे देखील वाचा : चक्क Salman Khan याला ऑफर केली होती ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका!
================================
आता एक प्रश्न तरी डोक्यात येतो तो म्हणजे या सीरीजचं नाव बाई तुझ्यापायी असं का आहे? तर याचा उलगडा नायिकेची आई फार थोडक्यात आपल्याला सीजीरमध्ये सांगून जाते पण त्याचा इम्पॅक्ट हा फार खोलवर आपल्या काळजात घर करेल यात शंकाच नाही…. त्यामुळे बाईपणाची ही निराळी पण प्रत्येक स्त्रीला आपलीशी वाटणारी गोष्ट एकदा तरी नक्की पाहा…
कलाकृती मीडिया ‘बाई तुझ्यापायी’ वेब सीरीजला देत आहे पाच पैकी चार स्टार्स !
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi