Manoj Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ काळाच्या पडद्याआड

Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
सर्वसाधारणपणे चित्रपटाचे जे संगीतकार असतात तेच चित्रपटाचे बॅकग्राऊंड म्युझिक देखील करत असतात. यात काही अपवाद नक्कीच आहेत. पण एक अध्याहृत असेच आहे की संगीतकारच चित्रपटाचे बॅकग्राऊंड म्युझिक देत असे. असे असताना देखील सत्तरच्या दशकामध्ये राहुल देव बर्मन यांनी संगीत दिलेल्या एका चित्रपटाचे बॅकग्राऊंड म्युझिक संगीतकार बप्पी लहिरी (Bappi Lahiri) यांनी केले होते! हा प्रकार कसा काय झाला होता? राहुल देव बर्मन यांनी आपल्या चित्रपटाचे बॅकग्राऊंड म्युझिक आपल्या इतर म्युझिशियन्सला सोडून थेट बप्पी लहरी यांना देण्याची परवानगी का दिली? मोठा इंटरेस्टिंग किस्सा आहे.
संगीतकार Bappi Lahiri यांनी भलेही ऐंशीच्या दशकामध्ये डिस्को किंग म्हणून प्रचंड लोकप्रियता हासील केली असली तरी त्यांची सुरुवात सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला झाली होती. त्यांचा पहिला चित्रपट नन्हा शिकारी. १९७३ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. पहिल्याच चित्रपटात त्यांनी चांगलं संगीत दिलं होतं. त्यावेळी बप्पी लहरी यांचं वय अवघं २२ वर्ष होतं. एवढ्या लहान वयात त्यांना संगीताची खूप चांगली समज होती.

घरात आई आणि वडील दोघेही संगीताच्या दुनियेत असल्यामुळे बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचा या क्षेत्रातील प्रवेश आणि संगीत विषयक ज्ञान खूप चांगलं होतं. यानंतर त्यांना पुढचा चित्रपट मिळाला ‘एक लडकी बदनाम सी’ यातील लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेले एक गाणं निर्माता दिग्दर्शक नासिर हुसैन यांना प्रचंड आवडलं. एवढ्या लहान वयातील संगीतकार इतकं चांगलं संगीत देऊ शकतो यावर त्यांचा विश्वास बसेना म्हणून ते थेट बप्पी लहरी यांना भेटायला त्यांच्या घरी गेले. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांनी त्यांचे कौतुक केलं.
बप्पी लहरीसाठी खूप मोठी गोष्ट होती कारण त्यावेळी नासिर हुसैन यांचं फार मोठं नाव चित्रपटाच्या दुनियेत होतं. त्यांचा ‘यादों की बारात’ हा चित्रपट त्याकाळी सुपर डुपर हिट झाला होता. या भेटीत नासिर हुसैन यांनी बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांना त्यांच्या आगामी चित्रपटाचे बॅकग्राऊंड म्युझिक करायला सांगितले. फक्त बॅकग्राऊंड म्युझिक म्हटल्यावर त्यांना आश्चर्य वाटले.

बप्पी लहरी (Bappi Lahiri) आणि त्यांच्या आई-वडिलांनी विचारले, ”चित्रपटाचे नाव काय आहे आणि संगीत कोण देत आहे?” तेव्हा नासीर हुसैन यांनी सांगितलं, ”चित्रपटाचं नाव आहे मदहोश आहे आणि संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.” सर्वजण चकित झाले. बप्पी लहरी यांचे वडील म्हणाले, ”जर संगीतकार आर डी बर्मन असतील तर बप्पी कसं काय बॅकग्राऊंड म्युझिक देऊ शकेल? आणि मुख्य म्हणजे आर डी बर्मन यांना ते कसे मान्य होईल?” त्यावर नासिर हुसैन म्हणाले, ”आर डी बर्मन यांना कसे समजवायचे ते माझ्यावर सोडा. तुम्ही या सिनेमाचं पार्श्वसंगीत करा.” पण बप्पीचे वडील म्हणाले, ”तसं नको. बप्पी या क्षेत्रात नवीन आहे. कुणाची नाराजी घेऊन त्याचं नुकतंच सुरू होत असलेले करिअर अचानक बंद पडायला नको. तुम्ही राहुल देव बर्मन यांच्याकडून जर एनओसी आणली तरच बप्पी तुमच्या चित्रपटाचे बॅकग्राऊंड म्युझिक करेल.”
नासिर यांना देखील तो मुद्दा पटला. ते आर डी बर्मन यांना भेटले आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. R D Burman त्यावेळी प्रचंड बिझी होते. त्यामुळे बॅकग्राऊंडसाठी त्यांना कुणी तरी माणूस हवाच होता. बप्पी लहरीच्या संगीताची त्यांना देखील जाणीव होती. त्यांनी आनंदाने परवानगी दिली. एका लेटर हेडवर एनओसी लिहून दिली. हा कागद घेऊन नासिर हुसैन बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांच्याकडे आले आणि अशा पद्धतीने बप्पी लहरी यांनी मदहोश या चित्रपटाला बॅकग्राऊंड म्युझिक दिले! त्यांनी दिलेले बॅकग्राऊंड म्युझिक त्या काळात चांगलेच लोकप्रिय झाले होते.

नासिर हुसैन यांना देखील ते प्रचंड आवडले होते. त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी बप्पी लहरी यांच्यावर दिली. हा चित्रपट होता ‘जख्मी’ या सिनेमावर मात्र बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांनी प्रचंड मेहनत घेतली. यातील सर्वच गाणी आज देखील लोकप्रिय आहेत. जलता है जिया मेरा भीगी भीगी रातो मे, अभी अभी थी दुष्मनी, जख्मी दिलो का बदला चुकाने, आओ तुम्ही चाँद पे ले जाये… सिनेमा सुपर हिट झाला. बप्पी लहरी हे नाव आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय होऊ लागलं.
१९७६ साली त्यांनी संगीत दिलेला ‘चलते चलते’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यातील सर्व गाण्यांन पुन्हा एकदा प्रचंड लोकप्रियता मिळवली. ‘प्यार में कभी कभी ऐसा हो जाता है, चलते चलते मेरे ये गीत याद रखना, जाना कहां है प्यार यहां है.. बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचे संगीत कॅची म्युझिक होतं. त्यामुळे तरुणाईला ते खूप आवडू लागलं. ‘बंबई से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो’ हे गाणं आखरी खत या चित्रपटातील होतं. चित्रपट चालला नाही गाणं मात्र प्रचंड चालले.
===========
हे देखील वाचा : Shahu Modak : या खिश्चन कलावंताने २९ वेळा श्रीकृष्णाची भूमिका साकारली!
===========
१९७८ साली दिग्दर्शक रविकांत नगाईच जेम्स बॉण्ड धर्तीवर भारतात बॉण्डपट तयार करणार होते त्यातील पहिला चित्रपट होता ‘सुरक्षा’. नायक होता मिथुन चक्रवर्ती आणि संगीत होते बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचं. दिग्दर्शकाने बप्पीला वेस्टर्न स्टाईलचे म्युझिक द्यायला सांगितले. यातील ‘देखा है मैने तुम्हे फिर से पलट के’ हे गाणं प्रचंड गाजलं. ऐंशीच्या दशकात तर बप्पी लहरी टॉपचा संगीतकार बनला. १९८३ चा ‘डिस्को डान्सर’ त्यांचा सर्वाधिक हिट सिनेमा. बप्पी लहरी यांना डिस्को किंग म्हणून ओळखले जात असले तरी अत्यंत क्लासिकल गाणी देखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वरबद्ध केली होती पण जास्त गाणी डिस्को गाजल्यामुळे त्यांच्यावर डिस्को किंगचा शिक्का बसला.