व्हॅनिटी येण्यापूर्वी…
फार पूर्वी दूरवरच्या शेतमळ्यावर, डोंगरावर, कड्यावर एखादे दृश्य अथवा गाण्याचे शूटिंग असेल तर कलाकारांना लाॅज अथवा हाॅटेलवरुनच तयार होऊन जावे लागत असे. मग अंतर किती का असेना? पण त्यातच ‘दृश्याची गरज म्हणून’ एखादा ड्रेस चेंज असेल तर? तर प्रामुख्याने दोनच मार्ग होते. एक म्हणजे, जवळच्याच एकाद्या घरी जाऊन तशी विनंती करुन तयार व्हावे लागे आणि समजा हे शक्य नसेल तर शूटिंग स्पाॅटपासून बर्यापैकी दूर जाऊन मध्ये कोणीतरी मोठी चादर पकडे आणि त्या आड कपडे बदलावे लागत… जुन्या पिढीतील कलाकार आपल्या अशा आठवणी नक्कीच सांगतात, असा मला ऐंशीच्या दशकात सरला येवलेकरची मुलाखत घेताना अनुभव आला. त्या पिढीचे त्या काळातील हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. त्याच असुविधेला सुविधा मानून काम होत राहिले. आणि अशा पध्दतीने कपडे बदलावे लागणे एक प्रकारचा नाईलाज होता, पण तो विनातक्रार स्वीकारला गेला. त्याचा कामावर फार परिणाम झाला नाही.
आऊटडोअर्सला शूटिंग म्हणजे एकाच वेळेस अनेक प्रश्न. उन किती वाजेपर्यंत असेल? वीजेची सोय कशी आहे? जनरेटर किती अंतरावर असेल? बघण्यासाठी गर्दी किती आणि त्याचा काही त्रास वगैरे? आणि ड्रेस चेंज असेल तर काय? हे ठळक प्रश्न. जवळपास लाॅज अथवा हाॅटेल असेल तर ड्रेस चेंज आणि लंच ब्रेकमध्ये थोडं रिलॅक्स होण्याची संधी. तीही खूप वाटे.
अशी ‘पडद्यामागची अगदीच वेगळीच गोष्ट’ स्वीकारत देशभरातील सर्वच भाषेतील चित्रपटसृष्टीने चौफेर प्रवास केला.
स्टुडिओतील मेकअप रुमही साध्याच असत. जुन्या काळातील पंखे असत. काही मोजक्याच मेकअप रुम्सना वातानुकूलित व्यवस्था असे. आणि ती मेकअप रुम बड्या स्टारना मिळे. दोन तीन चरित्र कलाकार मिळून एकच मेकअप रुम शेअर करावी लागे. ज्युनियर आर्टिस्टना तर एकाच मेकअप रुममधून तयार होऊन सेटवर यावे लागे. एकूणच सिस्टीमचा तो भाग होता. वहिदा रेहमान यांनी एका मुलाखतीत नंदाशी त्यांचा परिचय कसा वाढला याची एक छान आठवण सांगितली आहे. विजय आनंद दिग्दर्शित ‘कालाबाजार’ ( १९६०) या चित्रपटात दोघी भूमिका साकारत असताना नंदाच्या मेकअप रुममध्ये टाॅयलेटची सुविधा नव्हती. नंदाजींचा तो सुरुवातीचा काळ होता. वहिदाजींनी नंदाजींना आपल्या मेकअप रुमचा त्यासाठी वापर करण्याचे आवर्जून सांगितले. या सुखद अनुभवाने नंदाजी अधिक मोकळेपणाने वावरु लागल्या. गोष्ट तशी छोटी वाटते पण खूपच महत्वाची.
मुंबईतील चित्रपट स्टुडिओत कमालीस्तान स्टुडिओतील मेकअप रुम जणू एक छोटीशी शानदार टुमदार रुमच. अतिशय कन्फर्ट. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वास्तव’ पाहिल्यावर भूमिका आवडली हे सांगण्यासाठी नम्रता शिरोडकरला फोन करताच तिने पटकन म्हटले, कमालीस्तान स्टुडिओत उद्या शूटिंग करतेय. तीन नंबरच्या मेकअप रुममध्ये मी असेन. तिकडे सवडीने गप्पा करुयात. कमालीस्तान स्टुडिओतील मेकअप रुममध्ये वर्षा उसगावकर, अश्विनी भावे, शिल्पा शिरोडकर इत्यादींच्या मुलाखतींचा योग आल्याने या टुमदार मेकअप रुम चांगल्याच माहीत झाल्या होत्या. राजकमल कलामंदिर स्टुडिओतील मेकअप रुमही अतिशय टापटीप व सुरेख. मेहबूब स्टुडिओतील मेकअप रुम पहिल्या मजल्यावर आहेत. त्याही प्रशस्त आहेत. मुकुल आनंद दिग्दर्शित ‘खुदा गवाह ‘च्या शूटिंगच्या दिवसांत याच मेकअप रुममध्ये मी अमिताभ बच्चनची मुलाखत घेतली तेव्हा माझ्यासोबत असलेल्या प्रदीप म्हापसेकर याने आपल्या ‘ओला कॅनव्हास’ या पुस्तकात आमच्या या भेटीवर एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे. आर. के. स्टुडिओतील मेकअप रुम पहिल्या मजल्यावर होत्या आणि मेकअप करुन खाली उतरताना समोरच भला मोठा उभा आरसा होता. आर. के. फिल्मच्या रणधीर कपूर दिग्दर्शित ‘हीना’मध्ये भूमिका साकारताना अश्विनी भावेने या आरशाचा अनुभव सतत घेतला आणि या आरशाच्या अनुभवावर तिने एक लेखही लिहिला.
चित्रपती व्ही. शांताराम यांचा राजकमल कलामंदिर स्टुडिओ, राज कपूरचा आर. के. स्टुडिओ, कमाल अमरोही यांचा कमालीस्तान स्टुडिओ, शशधर मुखर्जी यांचा फिल्मीस्थान स्टुडिओ, मग फिल्मालय स्टुडिओ हे असे खुद्द चित्रपट निर्माता व दिग्दर्शकांचे हे स्टुडिओ असल्याने त्यांनी जणू फिल्म मेकिंगमधील एक महत्वाचा घटक म्हणून मेकअप रुमचा विचार केलेला दिसतोय. याबाबत आणखीन काही उदाहरणे देता येतील. कालांतराने अंधेरीत सेठ स्टुडिओ मुंबईतील पहिला वातानुकूलित स्टुडिओ सुरु झाला. चेतन आनंद दिग्दर्शित ‘कुदरत ‘चे तेथे सर्वप्रथम शूटिंग झाले. अनेक चित्रपटांच्या शूटिंग रिपोर्टींगसाठी येथे जाण्याचा योग येताना लक्षात आले, या स्टुडिओत एकच मोठा शूटिंग फ्लोअर असला तरी येथे रोजच शूटिंग असते. कारण एकच, प्रशस्त मेकअप रुमपासून सर्वच प्रशस्त होते.
स्टुडिओतील मेकअप रुमच्या गोष्टी अशा बहुस्तरीय. एकाद्या स्टुडिओत एकाच वेळेस तीन चार शूटिंग असतील तर मेकअप रुमचे रेशनिंग करावे लागे. त्यात पुन्हा एकाद्या स्टारकडे काही किंमती सामान असेल तर त्याच मेकअप रुममधील कपाटात ते लाॅक करुन ठेवा. हेच मेकअप रुम गाॅसिप्सलाही जन्म देत. एकाद्या अभिनेत्रीच्या मेकअप रुममध्ये एकादा हीरो अधिक काळ टाईमपास करीत असेल तर त्यांच्यात ‘कुछ तो खिचडी पक रही है’ असा सूर उमटलाच समजा. अशा गोष्टी एक प्रकारच्या यलो सिग्नल असतात. गाॅसिप्समुळे यलो शब्द वापरला.
गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या मुख्य इमारतीत असलेल्या मेकअप रुमवर आतील स्टारच्या नावाची प्लेट असे हे मला आठवतय. ‘स्वाती ‘ या चित्रपटाच्या सेटवर माधुरी दीक्षितच्या मुलाखतीसाठी गेलो असता त्याच मजल्यावर या चित्रपटाचे शूटिंग असल्याने ती एकेक दृश्य देत मेकअप रुममध्ये यायची आणि आमची मुलाखत पुढे सुरु राह्यची. त्या काळात अशा पध्दतीनेही मुलाखती रंगत. नायक अथवा नायिका म्हणून सद्दी संपल्यावर सहाय्यक भूमिका, चरित्र भूमिका असाच पर्याय असतो. तेव्हा स्वतंत्र मेकअप रुमचा आग्रह धरता येत नाही. काॅमन मेकअप रुम स्वीकारायची मानसिक तयारी करावी लागते. सुरुवातीस ते जड जाते पण एका गोष्टीची जाणीव होत जाते, आता नवीन कोणी स्टार असून त्याला अथवा तिला स्वतंत्र मेकअप रुम मिळालाय. स्टारच्या कारकिर्दीतील हा बदल थोडा अवघड असतो. पण अब हालात बदल चुके है हे वास्तव स्वीकारुन चेहऱ्यावर आनंदी भाव आणावेच लागतात. ते मेकअपने येत नाहीत.
ऐंंशीच्या दशकाच्या अखेरीस व्हॅनिटी (Vanity)आली आणि एक नवीन पर्व सुरु झाले. तरी व्हॅनिटीचे जणू अफाट पीक यायला वेळ लागला. तोपर्यंत मेकअप रुम हुकमी होत्या. अगदी सुरुवातीला श्रीदेवी व्हॅनिटी वापरु लागली. एक प्रकारची ही ब्रेकिंग न्यूजच. संपूर्ण चित्रपटसृष्टीत तेव्हा ही एकच व्हॅनिटी व्हॅन होती आणि त्या जोडीला एक विशेष गोष्ट आली. आमचे गिरगावकर दिग्दर्शक मनमोहन देसाई आणि अमिताभ बच्चन यांची अगदी सेम टू सेम व्हॅनिटी (Vanity) होती. एकाद्या स्टुडिओत दोन्ही दिसल्या की लक्षात येई ‘गंगा जमुना सरस्वती ‘चे शूटिंग सुरु आहे. गिरगावात खेतवाडीत व्हॅनिटी दिसली की मनजी घरी आहेत हे नक्कीच. आपल्या पाठदुखीला आराम मिळावा या पध्दतीने त्यांनी आपली व्हॅनिटी बनवून घेतली होती. अमिताभने मिडियावरचा बॅन हटवून मिडियाशी ‘दोस्ताना’ केला तेव्हा तो आम्हा सिनेपत्रकारांना स्वतंत्रपणे म्हणजे एकेकाला मुलाखत देई तेव्हा कधी एकाद्याला आपल्या व्हॅनिटी (Vanity) व्हॅनमध्ये प्रवेश देई.
शक्ती कपूरची व्हॅनिटी (Vanity) व्हॅन ग्लॅमरस बहुचर्चित होती. त्यात बार होता आणि इंडिया टुडेने यावर फोटोसह स्पेशल रिपोर्ट दिला होता. हळूहळू व्हॅनिटी (Vanity) व्हॅनची संख्या फार फार वाढत गेली. त्यासह चित्रपट, मालिका, गेम शो, रिॲलिटी शो , जाहिरातपट वगैरे वगैरेचा सुकाळ झाला. वेबसिरिजची त्यात भर पडली. दोन डोअरच्या व्हॅनिटीपेक्षा आपल्याला सिंगल डोअर व्हॅनिटी हवी(च) असे काही सेलिब्रिटीज पिक्चर साईन करतानाच निक्षून सांगतात यात गैर ते काय? सिंगल डोअर व्हॅनिटीने (Vanity) प्रायव्हसी राहते, कोणीही गपशप करताना आवाज पलिकडे जाण्याची भीती नसते. शूटिंग स्टुडिओत असो, बंगल्यात असो, गार्डनमध्ये असो अथवा शेतात, माळरानावर कुठेही असो पण व्हॅनिटीशिवाय (Vanity) आज शूटिंग शक्यच नाही. पडदा छोटा असो वा मोठा आपण त्यावर प्रेझेंटेबल दिसण्यासाठी व्हॅनिटीची आरामदायक सुविधा हवीच. तो आजच्या मनोरंजन क्षेत्रातील सिस्टीमचा भाग आहे.
======
हे देखील वाचा : पु ल देशपांडेचा १९५० सालचा सिनेमा पंचवीस वर्षानंतर चालला!
======
कधी काळी साधे मेकअप रुम असत. पण त्याबद्दल तक्रार नसे. अशा अनेक गैरसोयी स्वीकारत, कधी दुर्लक्ष करीत चित्रपटसृष्टीने गुणवत्ता, मेहनत, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकी आणि कलेसाठी कला या भावनेतून अजरामर कलाकृती निर्माण केल्या. तो इतिहासाचा एक भाग झाला. काळ बदलत राहतोय. काही स्टुडिओतील मेकअप रुम आता एक तर ज्युनियर आर्टिस्टसाठी वापरात येतात अथवा काही सामान ठेवायला. तसा तरी उपयोग होतोय… आता कोणी म्हणेल मेकअप रुमची आधुनिक एडिशन व्हॅनिटी (Vanity) व्हॅन आहे असा दृष्टीकोनातून जरी बदल स्वीकारला तरी बरेच होईल. फोटो सेशनसाठीही अनेकदा व्हॅनिटी (Vanity) व्हॅन उपयोगी पडते आणि इव्हेन्टसभोवतीची व्हॅनिटी व्हॅनची (Vanity) गर्दी एका वेगळ्याच मूडमध्ये नेते तो रंग मेकअप रुम संस्कृतीत नव्हता तरी त्याचीही एक ओळख होतीच.