कोर्ट रूम ड्रामावर आधारित ‘हे’ ८ चित्रपट आवर्जून पाहायलाच हवेत
चित्रपट, वेबसिरीज किंवा मालिका असोत ‘कोर्ट रूम ड्रामा’ बघायला सर्वांनाच आवडतो. परंतु, बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट होऊन गेले आहेत जे चित्रपट संपूर्णपणे ‘कोर्ट रूम ड्रामा’वरच आधारित होते. ज्यांना कोर्ट रूम ड्रामा बघायला आवडतो त्यांना हे चित्रपट नक्की आवडतील. (Bollywood Courtroom Dramas)
१. कानून (१९६०)
बी.आर. चोप्रा दिग्दर्शित ‘कानून’ हा १९६० सालचा हिंदी चित्रपट फाशीच्या शिक्षेविरुद्धच्या एका खटल्याभोवती फिरतो. खोट्या साक्षीदारांच्या आधारावर खटला चालवून ही शिक्षा सुनावण्यात आल्याच्या खात्रीमुळे सुरू झालेला हा कोर्ट रूम ड्रामा पाहताना नजर एक सेकंदासाठीही स्क्रीनवरून हलत नाही.
या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकही गाणं नाहीये. या चित्रपटात अशोक कुमार न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत, तर राजेंद्र कुमार बचाव पक्षाचा वकिल आणि न्यायाधीश साहेबांचा जावईही असतो. (Bollywood Courtroom Dramas)
२. बात एक रात की (१९६२)
१९६२ सालच्या शंकर मुखर्जी दिग्दर्शित ‘बात एक रात कि’ या चित्रपटात देव आनंद आणि वहिदा रहमान मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची सुरुवात नीलासोबत होते जिला एका खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली असते. या खुनाची कबुलीही ती देते. तथापि, प्रसिद्ध वकील राजेश्वर (देव आनंद) यांना या प्रकरणाचा संशय येतो आणि नीलाचा बचाव करण्याचा निर्णय घेतात.
३. अंधा कानून (१९८३)
भारतीय कायद्याच्या पळवाटा स्पष्ट करणारा चित्रपट म्हणजे ‘अंधा कानून’. टी. रामाराव दिग्दर्शित या चित्रपटात भारतातील कायद्याच्या त्रुटी आणि कमकुवतपणा आणि न्याय मिळवून देण्यात असणारी असमर्थता अधोरेखित करत, कायद्याच्या अनेक पैलूंबद्दल चर्चा करण्यात आली आहे.
चित्रपटात अमिताभ बच्चन, रजनीकांत, हेमा मालिनी, अमरीश पुरी, रीना रॉय, प्रेम चोप्रा, प्राण, डॅनी, मदन पुरी आणि असरानी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटातून साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (Bollywood Courtroom Dramas)
४. मेरी जंग (१९८५)
सुभाष घई दिग्दर्शित, ‘मेरी जंग’ हा एक प्रेरणादायी चित्रपट आहे. अरुण कुमार नावाच्या एका वकिलाची कथा यामध्ये मांडण्यात आली आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी वकील अरुण कुमार याने न्यायव्यवस्थेतील भ्रष्ट व्यक्तींशी दिलेला लढा त्यामध्ये दाखविण्यात आला आहे.
या चित्रपटात अनिल कपूर, मीनाक्षी शेषाद्री, नूतन, जावेद जाफरी, परीक्षित साहनी इत्यादी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
५. एक रुका हुआ फैसला (१९८६)
‘एक रुका हुआ फैसला’ हा बासू चटर्जी दिग्दर्शित चित्रपट १९५७ साली प्रदर्शित झालेल्या गोल्डन बेअर पुरस्कार विजेत्या ‘12 अँग्री मेन’ या चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट पूर्णपणे न्यायालयीन खटल्यावर आधारित आहे. यामध्ये एक किशोरवयीन मुलगा आरोपी असून त्याने स्वतःच्या वडिलांवर चाकूने वार केल्याबद्दल अटक करण्यात आलेली असते.
या चित्रपटामध्ये पडद्यामागच्या कोर्टरूममध्ये काय चालते, ज्युरी वेगवेगळ्या कारणांसाठी कसे वाद घालतात, अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. (Bollywood Courtroom Dramas)
६. OMG – ओह माय गॉड (२०१२)
कोर्टरूम ड्रामाची यादी या चित्रपटाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. नीरज पांडे दिग्दर्शित, हा चित्रपट ‘कांजी विरुध कांजी’ या लोकप्रिय गुजराती नाटकावर आधारित आहे.
मुळात, हा चित्रपट कांजी लालजी मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्याची भूमिका परेश रावल यांनी केली आहे. कांजी मेहतांचं दुकान भूकंपामध्ये उद्ध्वस्त झालेलं असतं त्याचा दावा विमा कंपनीकडून नाकारला जातो कारण आपत्ती दाव्यांमध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे कोणतेही नुकसान ‘देवाची कृती’ म्हणून ग्राह्य धरण्यात येत नाही तेव्हा कांजी चक्क देवाविरुद्ध खटला दाखल करण्याचा निर्णय घेतो.त्यानंतर अक्षय कुमारने साकारलेला ‘कृष्ण वासुदेव यादव’ कांजीच्या आयुष्यात प्रवेश करतो.
या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, गोविंद नामदेव, पूनम झावर, महेश मांजरेकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. (Bollywood Courtroom Dramas)
७. रुस्तम (२०१६)
टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित रुस्तम हा चित्रपट नौदल अधिकारी के.एम. नानावटी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून इलियाना डिक्रूझ, पवन मल्होत्रा, ईशा गुप्ता, सचिन खेडेकर, परमीत सेठी, कुमुद मिश्रा आदींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
८. सेक्शन ३७५ (२०१९)
कोर्टरूम ट्रायल्सवरील सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटांच्या यादीमध्ये अलीकडच्या काळात दाखल झालेला ‘सेक्शन ३७५’ हा चित्रपट एका सेलिब्रेटीवर झालेल्या बलात्काराच्या आरोपाची कथा आहे. चित्रपटाचा विषय भारतीय कायद्याच्या सेक्शन ३७५ वर आधारित आहे. (Bollywood Courtroom Dramas)
=====
हे देखील वाचा – मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या आयुष्यावर आधारित टॉप ५ बायोपिक
=====
या चित्रपटात अक्षय खन्ना, रिचा चड्ढा आणि राहुल भट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याव्यतिरिक्त ‘जॉनी एलएलबी’, ‘जॉनी एलएलबी २’, ‘दामिनी’, ‘पिंक’ इ. अजूनही काही चित्रपट आहेत. ज्यामध्ये कोर्ट रूम ड्रामा दाखवण्यात आला आहे. तुमच्या आवडीचा कोर्ट रूम ड्रामा (Bollywood Courtroom Dramas) कोणता, हे कमेंट करून नक्की कळवा.