
आवर्जून पाहावेत असे, थरकाप उडवणारे दक्षिणेतील ‘सायकॉलिजिकल थ्रिलर’ चित्रपट
माणसाचं मन म्हणजे एक अजब रसायन आहे. मनाची ताकद एखाद्याचं आयुष्य घडवू शकते. पण याच मनामध्ये निर्माण झालेल्या चुकीच्या विचारांमुळे माणूस विकृत स्वरूप धारण करू शकतो. बहुतांश शारीरिक आजारांची लक्षणं सहज दिसून येतात, पण मानसिक आजार ओळखणं मात्र तितकंसं सोपं नसतं. वरवर शांत दिसणाऱ्या माणसाच्या मनात नक्की काय चाललेलं असेल, याचा अंदाजही येत नाही. अशाच वरवर शांत ‘नॉर्मल’ वाटणाऱ्या मानसिक रुग्णांनी केलेल्या ‘सीरिअल किलिंग’च्या घटना ऐकून/वाचून अंगावर शहरे येतात. अशाच अंगावर शहारे आणणाऱ्या दक्षिणेतील काही ‘सायको थ्रिलर’ चित्रपटांबद्दल माहिती घेऊया. हे चित्रपट हिंदीत डब केलेले असल्यामुळे सहज पाहता येतील. (Psychological Thriller South Indian Movies)
१. अथिरन -प्यार का कर्म (Athiran)
‘अथिरन’ या २०१९ साली आलेल्या मल्याळम चित्रपट हिंदीमध्ये ‘अथिरन – प्यार का कर्म’ या नावाने डब करण्यात आला आहे. या चित्रपटात फहाद फासिल आणि साई पल्लवी आणि मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अथिरन ‘स्टोनहर्स्ट असायलम’ आणि ‘शटर आयलंड’ या चित्रपटांवरून प्रेरित होता.

मेंटल असायलम मधली नित्या एका ‘श्रीमंत रॉयल’ कुटुंबामधली मुलगी असते. असायलमचे डॉ. बेंजामिन यांची उपचारपद्धती काहीशी वेगळी असते. असायलममध्ये नव्याने आलेले डॉ. नायर यांचे आल्या आल्या डॉ बेंजामिनशी वाद सुरू होतात. त्यांच्या मनात पुढे नित्याबद्दल सहानुभूती निर्माण होते. बस! स्पॉईलर टाळायचा असेल तर, यापेक्षा जास्त काही सांगता येणार नाही. चित्रपटामध्ये अनेक घटना अशा घडत जातात ज्यांची कल्पनाही आपण केलेली नसते. (Psychological Thriller South Indian Movies)
२. रत्सासन (Ratsasan)
२०१८ साली आलेला रत्सासन हा तामिळ चित्रपट याच नावाने हिंदीमध्ये डब करण्यात आला आहे. रत्सासन एक जबरदस्त सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट असून सीरिअल किलिंग या संकल्पनेवर आधारित आहे. भयंकर पद्धतीने होणारे शाळकरी मुलींचे मृत्यू थरपाक उडवणारे आहेत.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच एका शाळकरी मुलीचा खून होतो. या मृत्यूचा तपास करणारा इन्स्पेक्टर अरुण कुमारला सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट बनवायचा असतो. परंतु कुटुंबाच्या दबावामुळे त्याने पोलिसांची नोकरी स्वीकारलेली असते. एकामागून एक घडणाऱ्या खुनाच्या घटना पाहून चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेवर संशयाची सुई फिरत राहते. पण प्रत्यक्षात जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा कळतं, हा तर विचारही आपण केला नव्हता. चित्रपटामध्ये विष्णू विशाल, अमला पौल आणि सर्वानन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट सीरिअल किलिंगवर आधारित असणाऱ्या चित्रपटांमधला मास्टरपीस आहे. (Psychological Thriller South Indian Movies)
३. लव्ह (Love)
तामिळ, तेलगूच्या जोडीने मल्याळम चित्रपटही आता ‘फुल फॉर्म’मध्ये आलेले आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘लव्ह’ हा मल्याळी चित्रपट. हा चित्रपट एका जोडप्याच्या विक्षिप्त वागणुकीवर आधारित आहे. कथानकाबद्दल अधिक काही सांगितल्यास तो ‘स्पॉईलर’ ठरेल.

ऑक्टोबर २०२० मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटामध्ये राजीषा विजयन आणि शाईन टॉम चाको यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ‘लव्ह’ याच नावाने हिंदीमध्ये डब करण्यात आलेला आहे.
४. अन्नियान (Anniyan)
‘अन्नियान’ २००५ साली आलेला तामिळ चित्रपट आहे. एक सर्वोत्कृष्ट ‘सायकॉलॉजिकल थ्रिलर’ बघायचा असेल, तर हा चित्रपट आवर्जून बघा. समाजातील भ्रष्टाचार, अनीती, अन्याय याबद्दल सामान्य माणसाच्या मनात असणारी चीड जेव्हा एक वेगळंच रूप धारण करते तेव्हा काय होतं, हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. चित्रपटात एकामागून एक घडणाऱ्या रहस्यमय घटना प्रेक्षकांना अचंबित करतात.

चित्रपटामध्ये केनेडी जॉन व्हिक्टर उर्फ विक्रम आणि सदफ मोहम्मद सय्यद मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ‘अपरिचित – द स्ट्रेंजर’ या नावाने हिंदीमध्ये डब करण्यात आला आहे. (Psychological Thriller South Indian Movies)
=======
हे देखील वाचा – आवर्जून पाहाव्यात अशा सामाजिक घटनांवर आधारित या टॉप 5 वेबसिरीज
=======
५. विक्रम वेधा (Vikram Vedha)
२०१७ साली आलेला ‘विक्रम वेधा’ हा तामिळ चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा ‘वेताळ पंचविशी’ या लोककथेवरुन प्रेरित आहे. वेधा नावाचा गुन्हेगार आणि त्याचा शोध घेऊन त्याला मारण्यासाठी निघालेला पोलिस इन्स्पेक्टर विक्रम या दोघांमधली ही कथा आहे. वेधा जेव्हा स्वेच्छेने आत्मसमर्पण करतो तेव्हा तो विक्रमला अशा तीन गोष्टी सांगतो ज्यामुळे त्याच्या चांगलं आणि आणि वाईट याबद्दलचे विचार बदलतात. मानसिकतेचं वाचून वर्णन यामध्ये केलेलं आहे. या तीन गोष्टी कुठल्या हे मात्र चित्रपटातच बघणं रंजक ठरेल.

या चित्रपटामध्ये आर माधवन, विजय सेतुपती, श्रद्धा श्रीनाथ, कथीर आणि वरलक्ष्मी सरथकुमार यांच्या भूमिका असून हिंदीमध्ये हा चित्रपट ‘विक्रम वेधा’ याच नावाने प्रदर्शित झाला आहे. याच नावाने चित्रपटाचा हिंदी रिमेकही तयार होतोय. यामध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खान प्रमुख भूमिकेत आहेत. (Psychological Thriller South Indian Movies)