‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
या ‘टॉपच्या’ वेबसीरिज आहेत लोकप्रिय पुस्तकांवर आधारित
पुस्तकं किंवा कादंबऱ्यांवर आधारित चित्रपट आणि मालिका बनतात हे तर सर्वानाच महिती आहे. परंतु आता यावर आधारित काही वेबसीरिजही आल्या आहेत आणि त्या प्रचंड लोकप्रियही झाल्या आहेत. अनेकांना या सीरिज कादंबरीवर आधारित आहेत हे माहिती देखील नसेल. चला तर जाणून घेऊया अशाच काही वेबसीरिजविषयी (Web Series Based On Novels) –
चोखेर बाली (Chokher Bali)
या नावाचा पूर्वी हिंदी चित्रपटही येऊन गेला आहे. ही सीरिज रवींद्रनाथ टागोरांच्या ‘चोखेर बाली’ या कादंबरीवर आधारित आहे. अनुराग बासू यांनी दिग्दर्शित ही सीरिज प्रेक्षकांना थेट एकोणिसाव्या शतकात घेऊन जाते. मालिकेच्या पहिल्या तीन भागांमध्ये ‘चोखेर बाली’, तर त्यानंतरच्या भागांमध्ये रवींद्रनाथ टागोरांच्याच ‘द ब्रोकन नेस्ट’ या कादंबरीचं कथानक व इतर लघुकथा दाखवण्यात आल्या आहेत.
या सीरिजमध्ये राधिका आपटे, तारा -अलिशा बेरी, सुमित व्यास, बिना बॅनर्जी, भानू उदय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध असून IMDB वर या सीरिजला ८.७ रेटिंग देण्यात आलं आहे.
सेक्रेड गेम्स (Sacred Games)
ही भारतातील प्रचंड लोकप्रिय झालेली वेबसीरिज विक्रम चन्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. एका पोलीस ऑफिसरची कुख्यात गुंडाळा पकडण्यासाठीची धडपड आणि त्या दोघांची ‘टॉम अँड जेरी’ सारखी पकडापकडीची कहाणी यामध्ये दाखवण्यात आली आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित या सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी, राधिका आपटे, सैफ अली खान, कल्की कोचलिन मुख्य भूमिकेत आहेत.
या सीरिजचे दोन सीझन्स प्रदर्शित झाले असून. प्रेक्षक तिसऱ्या सिझनची आतुरतेने वाट बघत आहेत. IMDB वर या सीरिजला ८.५ रेटिंग देण्यात आलं असून ही सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. (Web Series Based On Novels)
समांतर (Samantar)
समांतर ही वेबसीरिज सुहास शिरवरळकर यांच्या ‘समांतर’ या नावाच्या मराठी कादंबरीवर आधारित आहे. “एकाचा भूतकाळ असतो दुसऱ्याचा भविष्यकाळ..” असं अनोखं कथानक असणारी ही सीरिज मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. सुदर्शन चक्रपाणीचा भूतकाळ असतो, कुमार महाजनचा भविष्यकाळ. मग शोध सुरु होतो भविष्याचा आणि पर्यायाने सुदर्शन चक्रपाणीचा.. या सीरिजमध्ये स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित, नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर, जयंत सावकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या सीरिजचे एकूण दोन सिझन प्रदर्शित झाले असून सीरिज MX प्लेअरवर उपलब्ध आहे. सीरिजला IMDB वर ८.४ रेटिंग देण्यात आलं आहे.
स्टेट ऑफ सीज: 26/11 (State of Siege: 26/11)
२००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित ही सीरिज ‘संदीप उन्नीथन’ यांच्या ‘ब्लॅक टॉर्नेडो’ या पुस्तकावर आधारित आहे. यामध्ये २६/११ मध्ये जीवाची बाजी लावणाऱ्या पण सर्वसामान्यांना माहिती नसणाऱ्या अनेक वीरांच्या कथा दाखवण्यात आल्या आहेत. राजकारण, समाजकारण यासारख्या अनेक मुद्द्यावर यामध्ये भाष्य करण्यात आलं आहे. वेबसीरिज बघायची आवड असो किंवा नसो पण, ‘ब्लॅक टॉर्नेडो’ हे पुस्तक मात्र आवर्जून वाचा.
सीरिजमध्ये अर्जन बाजवा, अर्जन बिजलानी, मुकुल देव, विवेक दहिया, तारा -अलिशा बेरी आणि अविनाश वाधवान मुख्य भूमिकेत आहेत. सीरिज झी5 वर उपलब्ध असून IMDB वर या सीरिजला ८ रेटिंग देण्यात आलं आहे. (Web Series Based On Novels)
द मॅरीड वुमन (The Married Woman)
ही सीरिज मंजू कपूर यांच्या ‘अ मॅरीड वुमन’ या कादंबरीवर आधारित आहे. ही कहाणी आहे आस्था नावाच्या विवाहित स्त्रीची आणि तिच्या आत्म-शोधाच्या प्रवासाची. बाबरी मशीद संघर्षाच्या काळात, अशांततेने भरलेल्या सामाजिक जडणघडणीच्या पार्श्वभूमीवर ही कथा मांडण्यात आली आहे.
साहिर रझा दिग्दर्शित या सीरिजमध्ये रिधी डोंगरा, सुहास अहुजा, मोनिका डोग्रा, इमाज शहा, नादिरा बब्बर प्रमुख भूमिकेत आहेत. सीरिज झी5 आणि ALT बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून, IMDB वर या सीरिजला ६.३ रेटिंग देण्यात आलं आहे. (Web Series Based On Novels)
=======
हे देखील वाचा –आवर्जून पाहावेत असे ‘अंडररेटेड’ मराठी चित्रपट
=======
लैला (Leila)
लैला ही बहुचर्चित वेबसीरीज प्रयाग अख्तर यांच्या ‘लैला’ या पुस्तकावर आधारित आहे. शालिनी नावाची स्त्री आपल्या हरवलेल्या मुलीचा – लैलाचा शोध घेत असते. तिच्या शोधप्रवासाची कहाणी म्हणजे लैला. या सीरिजमध्ये हुमा कुरेशी प्रमुख भूमिकेत असून सिद्धार्थ, लेशा मांगे, सीमा बिस्वास, राहुल खन्ना, संजय सुरी, आरिफ झकेरिया लक्षवेधी भूमिकेमध्ये आहेत.
ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून IMDB वर याला ४.९ रेटिंग देण्यात आलं आहे.