भारतमाता चित्रपटगृह पुन्हा सुरु होतेय, वाजवा टाळ्या आणि शिट्ट्या
जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एक पडदा चित्रपटगृहात टाळ्या आणि शिट्ट्यांनी “पब्लिकने पिक्चर्स” डोक्यावर घेतले इतकेच नव्हे तर, त्या चित्रपटगृहाशीही कळत नकळत भावनिक नाते निर्माण झाले…
लालबागच्या नाक्यावरील भारतमाता चित्रपटगृह (Bharatmata Cinema) पुन्हा सुरु होत असल्याच्या बातमीला चित्रपट रसिकांकडून उत्साहात मिळालेल्या प्रतिसादावरुन तर ते मी हमखास सांगू शकतो. कारण माझीही काही आवडती सिंगल स्क्रीन थिएटर्स होती, त्यातील बरीच काळाच्या पडद्याआड गेली. पण आठवणी कायम आहेत. आजच्या ग्लोबल युगातील चित्रपट रसिक मल्टीप्लेक्स, यू ट्यूब, ओटीटीवर मुव्हीज पाहताहेत. ( ही पिढी चित्रपटाला मुव्हीज म्हणते). त्यांना अशा अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या वाटचाल आणि रसिकांच्या प्रेमाची कल्पना असेल अथवा कदाचित नसेलही.
मी पहिल्यांदा भारतमाता चित्रपटगृह (Bharatmata Cinema) पाहिले ते लहानपणी पालकांसोबत लालबागचे गणपती पाह्यला जायचो तेव्हा. गणेश गल्लीचा सार्वजनिक गणेशोत्सव हे त्या काळात विशेष आकर्षण असे. तो पाहून झाल्यावर जवळचे भारतमाता चित्रपटगृह दिसायचे. नजर जायचीच. तेथे हमखास मराठी चित्रपट लागल्याचे दिसे. गिरणगावातील अस्सल मराठमोळे चित्रपटगृह ही त्याची ओळख.
अनेक चाळी आणि कष्टकरी कामगार वर्ग हे या विभागाचे वैशिष्ट्य. गिरगावात लहानाचा मोठा होतानाच त्या काळातील अनेक चित्रपटगृहांची ओळख होत गेली. आमच्या खोताची वाडी आणि शेजारच्या आंबेवाडी, कुडाळेश्वर वाडीच्या समोरच मॅजेस्टिक थिएटर होते. आयुष्यात पाहिलेले हे पहिलेच सिनेमा थिएटर. मग जवळचे सेन्ट्रल मग राॅक्सी, त्यानंतर ऑपेरा हाऊस वगैरे.
काॅलेजमध्ये असताना दक्षिण मध्य मुंबईतील वरळी नाक्यावरील लोटस, नागपाड्यातील अलेक्झांड्रा, भायखळ्याचे पॅलेस असे एकेक करत अन्य चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहू लागलो आणि मराठी चित्रपट पाहण्यासाठी भारतमाता हुकमी ठरले. गिरगावातून ६१, ६५, ६६, ६९ यापैकी कोणतीही बेस्ट बस पकडून दहा पैशात भारतमाता चित्रपटगृहात पोहचवे. सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात तेथे मी चांदोबा चांदोबा भागलास का, लक्ष्मी, सासुरवाशीण, चोरीचा मामला हे चित्रपट पाहिले.
गिरगावातील मॅजेस्टिक थिएटर हे खरं तर मराठी चित्रपटाचे हुकमी. १९७३ साली ते पाडल्यावर सेन्ट्रलला मराठी चित्रपट प्रदर्शित होवू लागले. पण तेथे मनमोहन देसाई दिग्दर्शित चाचा भतीजा आणि परवरीश, सी. पी. दीक्षित दिग्दर्शित “फकिरा” अशा सुपर हिट चित्रपटांनी रौप्य महोत्सवी अर्थात पंचवीस आठवड्यांचा मुक्काम केल्याने अनेक मराठी चित्रपट आमच्या गिरगावात आलेच नाहीत. अष्टविनायक वगैरे सेन्ट्रलला मॅटीनी शोला आले. राॅक्सीलाही मराठी चित्रपट प्रदर्शित होत. पण भारतमाता, दादरचे प्लाझा व कोहिनूर (आताचे नक्षत्र) मराठीसाठी हुकमी.
मिडियात आल्यावर भारतमाता (Bharatmata Cinema)चे सर्वेसर्वा बाबासाहेब भोपटकर यांच्याशी अतिशय चांगले संबंध निर्माण झाले. अतिशय सज्जन माणूस. अनेक मराठी चित्रपटांचे मुहूर्त अथवा शूटिंग पूर्ण झाल्यावर निगेटिव्ह कटींग त्यांच्या शुभ हस्ते करण्यात येई. त्या काळात मराठी चित्रपटसृष्टीतील वातावरण अतिशय निकोप आणि आपलेपणाचे होते. अनेक मराठी चित्रपटांचे प्रीमियरही भारतमातामध्ये होत. महेश कोठारे दिग्दर्शित “धूम धडाका”चा जंगी प्रीमियर येथेच रंगला. भारतमाता चित्रपटगृहात आपला मराठी चित्रपट प्रदर्शित व्हावा म्हणून अनेक निर्माते बराच काळ वाटही पाहत याचे किस्सेही बरेच.
===========
हे देखील वाचा : रजनीगंधा @ ५० वर्ष
===========
भारतमाता (Bharatmata Cinema) जुन्या वळणाचे असले तरी तेथील मराठी ठसा आपलासा वाटे. १९८२ साली गिरणी संप सुरु झाल्यावर भारतमातामधील गर्दी कमी झाल्याच्या बातम्या होत्या. याच वर्षी देशात रंगीत दूरदर्शन व व्हिडिओचे आगमन झाले. सत्यनारायणाची पूजा असो, वाढदिवस असो, बारसं असो, चाळीचाळीतून भाड्याने व्हीसीआर आणून तब्बल चार चित्रपट पाहता येवू लागल्याने चित्रपटगृहात जाणे एकूणच कमी होत गेले. त्यात दादा कोंडके, अशोक सराफ, सुषमा शिरोमणी, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, सचिन पिळगावकर यांनी मराठी चित्रपटाचा हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण केला. त्यात राज्यातील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स हाऊसफुल्ल गर्दीत वाटचाल करत करत मराठी चित्रपटाची वैशिष्ट्य अधोरेखित करत राहिले ( आज त्याचीच गोड फळे मिळताहेत).
कालांतराने कपिल भोपटकरशी चांगले संबंध निर्माण झाल्यावर भारतमाता (Bharatmata Cinema) अधिकच आपलेसे झाले. मल्टीप्लेक्स युगात मुंबईसह देशातील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद होत गेली, नवीन पिढीला चकाचकपणाची सवय लागत गेली, त्यात जुनी चित्रपटगृह चालवणे, टिकवणे, सांभाळणे अवघड होत गेले. काही चित्रपटगृहांनी कात टाकली. ( भायखळ्याचे जयहिंद तसेच बदलले) भारतमाता आता अशाच काही नवीन गोष्टींसह सुरु होतेय. मुक्ता ए २ यांच्या वतीने ते काही महिन्यातच कार्यरत होईल.
भारतमाता (Bharatmata Cinema) १९४१ साली सुरु झाले. त्या काळातील मराठी व हिंदी चित्रपटांनी ते वाटचाल करत राहिले. तेथे प्रदर्शित झालेले काही मराठी चित्रपट, सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, मुंबईचा फौजदार, जावई विकत घेणे आहे, तुच माझी राणी, आंधळा मारतो डोळा, असला नवरा नको ग बाई, जिद्द, सर्वसाक्षी, शूरा मी वंदिले, धरतीची लेकरं, ज्योतिबाचा नवस, पांडू हवालदार, गल्ली ते दिल्ली, गंमत जंमत, अष्टविनायक, पुढचं पाऊल, दगा, सगेसोयरे, मला देव भटाला, नाव मोठं लक्षण खोटं, चुडा तुझा सावित्रीचा, बायानों नवरे सांभाळा वगैरे अनेक.
============
हे देखील वाचा : जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित, हा खेळ खूपच जुना
============
भारतमाता (Bharatmata Cinema)च्या अनेक वैशिष्ट्यांतील आणखीन एक विशेष, अनेक वर्ष तेथे दादा कोंडके यांचे सर्वकालीन सुपर हिट चित्रपट रिपीट रनला प्रदर्शित होत राहिले आणि मागील व पुढील पिढीतील रसिकांनी ते एकत्र एन्जाॅय केले. तुमचं आमचं जमलं, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार इत्यादी दादा कोंडकेपटांना पुन्हा पुन्हा मोठ्या पडद्यावर पाह्यचा आनंद भारतमाताने दिला.
चित्रपती व्ही.शांताराम दिग्दर्शित “पिंजरा” देखिल काही वर्षांनी येथेच रिपीट रनला प्रदर्शित झाला आणि पूर्वीसारखीच गर्दी…
भारतमाता (Bharatmata Cinema) जुन्या मुंबईची ओळख तसेच मराठी चित्रपटाच्या इतिहासाची साक्षीदार, साथीदार वास्तू. ती पुन्हा कार्यरत होतेय तर मलाही पुन्हा जायलाच हवे. मी तर जाणार. मी या चित्रपटगृहाशी “एक सामान्य प्रेक्षक” म्हणून जोडला गेलो आणि तेच घट्ट नाते आजही कायम आहे. सत्तरच्या दशकापासून माझा या वास्तूशी परिचय आहे, तो अधिक महत्त्वाचा वाटतो.