Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

भोपाल एक्स्प्रेस चित्रपटाची पंचवीशी
सत्य घटनेवर आधारित चित्रपट निर्माण करताना अनेक अवधाने सांभाळावी लागतात. ती घटनेबाबतचे अधिकाधिक तपशील मिळवणे, ते रुपेरी पडद्यावर मांडताना त्याचा माहितीपट होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते (मग त्याला चित्रपटाची ओळख कशी मिळणार ?) आणि त्याला मनोरंजनाचा मुलामा द्यायचा तर मूळ घटनेतील गांभीर्य कायम रहायला हवे. (अशा चित्रपटाला मनोरंजनाची सपोर्ट सिस्टीम असेल तर त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळू शकतो अन्यथा तो चित्रपट फक्त महोत्सवातून दाखवला जात राहील). (Bhopal Express)

आणि जर तो चित्रपट एखाद्या मोठ्याच सामाजिक शोकांतिका असेल तर?
महेश मथाई दिग्दर्शित “भोपाल एक्स्प्रेस” (Bhopal Express) हा चित्रपट अगदी अस्साच. या चित्रपटाच्या प्रदर्शनास पंचवीस वर्ष पूर्ण झाली.
२ डिसेंबर, १९८४ या दिवशी मध्यप्रदेश येथील भोपाळ या शहरात घडली. युनियन कार्बाइड (इंडिया) लिमिटेड या कंपनीच्या ६१० नंबरच्या जमिनीखालील टँकमधून अत्यंत विषारी असा पेस्टिसाईड मिथाईल आयसोसायनाईट (एम. आय. सी.) वायुच्या ४० टन गळतीमुळे ही दुर्घटना घडली. जवळपास २०,००० लोकांना या दुर्घटनेशी निगडित आजारांमुळे अनेकांचा मृत्यू ओढवला तर ५००,०००हून जास्त जण जखमी अथवा अपंग झाले. संपूर्ण शहरात एकच हाहाकार उडाला. अनेकांना त्यात श्वास घेणे मुश्किल झाले आणि हे होत असतानाच शहरात दिल्लीतील हझरत निजामुद्दीन स्टेशनवरून सुटलेली भोपाल एक्स्प्रेस शहरातील कमलपथी स्टेशनमध्ये प्रवेश करते. या गॅस गळतीचा समाजातील विविध स्तरावरील नागरिकांना कसा त्रास होत जातो, त्याचा फटका बसतो याचे दर्शन म्हणजे हा चित्रपट. विशेष उल्लेखनीय गोष्ट, कसलाही फाफट पसारा न लावता शंभर मिनिटाच्या चित्रपटात हे सगळेच गीत संगीतासह मांडले आहे. ते वरवरचे ठरले तरी या चित्रपट निर्मितीमागचा हेतू चांगला होता. त्याचेही कौतुक हवेच. (Untold stories)

या चित्रपटाचे विशेष म्हणजे सत्तरच्या दशकातील आपल्या पाश्चात्य स्टाईलच्या व्यक्तीमत्व आणि धाडसी अदाकारी यामुळेच गाजलेल्या झीनत अमानने रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले. फरक इतकाच की, आपल्या कमबॅकचा तिने कसलाही डंका पिटला नाही. (तोपर्यंत उठसूठ कोणत्याही कारणास्तव मुलाखत देण्याचा सुकाळ आला नव्हता.) विजय राज याचा हा पहिला चित्रपट. याचाच अर्थ विजय राज याच्या कारकिर्दीला पंचवीस वर्ष पूर्ण झाली देखील.
याशिवाय या चित्रपटात के. के. मेनन, नसिरुद्दीन शाह, नेत्रा रघुरामन, तसेच विदेशी कलाकार बर्ट शाॅमस, डोरिना कॅझट्स, ख्राईस सिल्वान इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. नसिरुद्दीन शाह वेगळ्या विषयावरील चित्रपटात आवर्जून भूमिका साकारणाऱ्यास तत्पर असल्याचे दिसून येई. प्रसून पांडे आणि पियूष पांडे यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. तर प्रिया रघुरामन यांचे संकलन आहे.
या चित्रपटात तीन संगीतकारांची सहा गाणी हे विशेषच. लकी अली व जगजीत सिंह यांनी संगीतबद्ध केलेले एकेक गाणे आहे. शंकर एहसान लाॅय यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यातील डिसेंबर २, १९८४ हे गाणे अमिताभ बच्चनने गायले आहे.. तर उडन खटोला (पार्श्वगायक इला अरुण), हम कैसे लोग है ( सागरिका) या गाण्यांचा समावेश आहे. या चित्रपटाची निर्मिती दीपक नायर व नबरोझ नूरानी यांची आहे. अशा मध्यम बजेटच्या चित्रपटांसाठी निर्माते बरेच असतात पण ते वेगळ्या विषयावरील चित्रपट निर्मितीचे धाडस करीत नाहीत. ते या दोघांनी केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक. (Bhopal Express)

पंचवीस वर्षांपूर्वी मल्टीप्लेक्स कल्चर नव्हते, त्याच्या आगमनाची चाहूल लागली होती. सिंगल स्क्रीन थिएटर्समधून असे वेगळे चित्रपट प्रदर्शित करताना इराॅस, जेमिनी (वांद्रे) अशा चित्रपटगृहात असे चित्रपट प्रदर्शित होत. त्यातूनच अशा चित्रपटांभोवती विशेष वलय निर्माण होते आणि असे वेगळे चित्रपट पाहू इच्छिणारा रसिक आवर्जून असे चित्रपट पाहत असे. सत्तरच्या दशकात वेगळ्या प्रवाहातील चित्रपटांचे असे वेगळ्या पध्दतीनुसार प्रदर्शन ही गोष्ट रुजली. मल्टीप्लेक्स युगात अशा मध्यम व छोट्या चित्रपटांना अधिकाधिक स्क्रीनमध्ये संधी मिळू लागलीय.
=============
हे देखील वाचा : फक्त दोन हजार रुपयाचे तिकीटही हाऊसफुल्ल
=============
पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त “भोपाल एक्स्प्रेस” (Bhopal Express) आता मल्टीप्लेक्समध्ये रिपीट रनला प्रदर्शित करायला हवा. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीसमोर एक शोकांतिका येईल. पूर्वी काय घडले याची माहिती मिळेल. त्याचीही आवश्यकता आहे. चित्रपट माध्यम त्यासाठी उपयुक्त आहे आणि आजच्या सोशल मिडियात या चित्रपटाची बरीच चर्चा देखील होईल.