बिग बी ते मनमोहन सिंग सगळेच याचे फॅन
अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, लेखक, संगीतकार, गीतकार, गायक, पटकथा लेखक… असं ऑल इन वन पॅकेज म्हणजे धनुष… वाय दिस कोलावरी डी म्हणत आलेल्या धनुषचा 28 जुलै रोजी वाढदिवस… सुपरस्टार रजनीकांतचा जावई असलेल्या या अभिनेत्यानं आपला स्वतःचा फॅनक्लब साऊथमध्ये तयार केला आहे.
राऊडी…..
गोल फ्रेमचा गॉगल… पिळदार मिशा… पिवळ्या रंगाचा टीशर्ट त्यावर फुलां फुलांचा शर्ट… गळ्यात दोन चार सोन्याच्या जाड्या चैन… असा मारी जेव्हा पडद्यावर आला तेव्हा शिट्यांनी अवघं थेअटर दणाणून गेलं… या मारीची फिलोसॉपीपण त्याच्यासारखीच भारी… जो मौत से ना डरे उसे मारना मुश्किल है…. शिवाय खास डायलॉग… इफ यु आर बॅड आय अॅम युवर डॅड…. बस्स या डायलॉगवर अख्खं थेअटर शिट्यांनी दणाणून जातं… एवढं कमी की काय, या मारीचे मित्र लगेच, आपुनका मारी लोहे की यारी…. हा डायलॉग मारतात… पुन्हा त्याच शिट्या… दाक्षिणात्य अभिनेता धनुषच्या जवळपास सर्वच चित्रपटाच्यावेळी असंच दृष्य थेअटरमध्ये असतं…
वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा… म्हणजेच धनुष… दाक्षिणात्य या स्टारची आपली खरी ओळख झाली ती, कोरावरी या भन्नाट गाण्याच्या माध्यामातून… वाय धिस कोरावरी डी… हे धनुषनं लिहिलेलं आणि गायलेलं गाणं 16 नोव्हेंबर 2011 रोजी रिलीज झालं…. आणि काही क्षणातंच या गाण्यानं भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात लोकप्रियतेचा विक्रम केला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या गाण्यानी धनुषला कल्पनातीत प्रसिद्धी दिली. अगदी बीग बी अमिताभ सुद्धा या गाण्याचा दिवाणा झाला. धनुषचे सासरे सुपरस्टार रजनीकांतनं हे गाणं असलेल्या चित्रपटात थोडावेळ का होईना, पण भूमिका करायची तयारी दर्शवली. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी धनुषला गेस्ट ऑफ ऑनर म्हणून बोलावलं. एका गाण्यामुळे मिळालेल्या या प्रसिद्धीने धनुषही भारावला होता.
एका सामान्य घरातून आलेला तरुण म्हणून त्याची ओळख आहे. अभिनेता, गायक, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, कथालेखक म्हणून चौफेर कामगिरी करणारा धनुष, सुरुवातीला चित्रपटात येण्यासाठी फारसा उत्सुक नव्हता. दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून ओळख असलेल्या कस्तुरी राजा हे धनुषचे वडील. अतिशय प्रतिकुल परिस्थितीमधून कस्तुरी राजा यांनी सुरुवात केली. धुनषचा भाऊ सेलवा राघवन, दिग्दर्शक आहे. भावांनी प्रोत्साहन दिल्यामुळेच धनुष चित्रपटाकडे वळला. थुल्लोवदो इलीमाई या धनुषचा पहिला चित्रपट. यातील त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले. पण आदुकलम हा त्याचा चित्रपट पहिला ब्लॉक बास्टर ठरला. या चित्रपटासाठी त्याला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.
अभिनयात चमकणा-या धनुषला संगिताची उत्तम जाण आहे. काही चित्रपटातील तामिळ गाणी त्यांनी लिहीली आणि गायली आहे. याच गाण्यामध्ये कोलावरी डी या तुफान लोकप्रिय झालेल्या गाण्याचा समावेश आहे. कोलावरी गाण्याचा व्हिडीओ 100 मिलीयन व्हू मिळवणारा पहिला भारतीय व्हिडीओ झाला होता. धनुषनं हे गाणं अवघ्या 6 मिनिटात लिहीलं आणि त्याला गाण्याच्या रुपात बांधलं होतं. सुपरस्टार रजनीकांतची मुलगी, ऐश्वर्या ही धनुषची पत्नी आहे. आपल्या पत्नीच्या चित्रपटासाठी धनुषनं कोलावरी डी गाणं तयार केलं. ऐश्वर्यानं दिग्दर्शित केलेल्या 3 या थ्रिलर चित्रपटात हे गाणं आहे. या गाण्याला ऐवढं यश मिळालं की, खुद्द सुपरस्टार रजनीकांलाही या 3 मध्ये भूमिका करण्याचा मोह झाला. यासाठी त्यांनं आपल्या मुलीला, ऐश्वर्याला विनंती केल्याची चर्चा होती.
कदाल कोदेन… या चित्रटापासून धनुष दाक्षिणात्य चित्रपटात यशाची पायरी चढत गेला. 2013 मध्ये रांझणा या हिंदी चित्रपटात तो सोनम कपूरसह झळकला. शमिताभ या त्याच्या अमिताभ बच्चनसह केलेल्या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. त्यानंतर धनुष हिंदीकडे फार कमी आला… पण दाक्षिणात्य चित्रपटात मात्र धनुष म्हणजे यशाचा हुकमी एक्का ठरलाय.
धनुषला काही वादांनाही सामोरं जावं लागलंय… त्यातला प्रमुख वाद तर त्याच्या जन्माचा होता. तामिळनाडूमधील एका पती-पत्नींनी धनुष हा आपला मुलगा असल्याचा चक्क दावा केला होता. त्यासाठी त्यांनी पोलीस ठाण्यात आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली होती. पण चौकशीनंतर हा या दाम्पंत्याचा बनाव असल्याचं सिद्ध झालं. कोलावरी डी या गाण्यातून धनुषनं मिळवेल्या यशाचा हा असाही एक परिणाम होता… असे काही वाद असले तरी धनुष अत्यंत धार्मिक स्वभावाचा आहे. भगवान शंकराचा तो भक्त आहे. यात्रा आणि लिंगा ही त्याच्या मुलांची नावंही त्यांनी भगवान शंकराच्या नावावरुनच ठेवली आहेत. शंकरभक्ती करणारा धनुष कट्टर शाकाहरी आहे. यासाठी PETA तर्फे त्याचा विशेष पुरस्कार देऊन सत्कारही करण्यात आला आहे.
अतरंगी रे… या आगामी चित्रपटात सारा अली खान बरोबर धनुष झळकणार आहे. अक्षय कुमारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. त्यापूर्वी धनुषच्या मारी 2 या चित्रपटानी रसिकांच्या मनावर चांगलीच भूरळ घातली आहे…. त्याने रावडी बेबी या गाण्यामध्ये साई पल्लवी सोबत केलेला फाडू डान्स… जोरदार चर्चेचा विषय ठरला… प्रभुदेवानं या गाण्याची कोरीओग्राफी केली आहे. त्यानंही डान्ससाठी धनुष हा आपला लाडका असल्याचं मान्य केलं…
एकूण काय, इलाका आपूनका… कानून आपूनका… या धनुषचा डायलॉग त्यानं प्रत्यक्षातही खरा करुन दाखवला आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला धनुष दरवर्षी त्याचा वाढदिवस चाहत्यांबरोबर साजरा करतो… आता यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर बंधने येणार असली तरी… धनुषच्या मागे त्याच्या लाखो चाहत्यांचे प्रेम कायम रहाणार आहे.