
Bigg Boss 19 मधला अवेज दरबार नगमा मिरजकरची प्रेमात फसवणूक करतोय?
‘बिग बॉस 19’ च्या अलिकडच्या भागात प्रेक्षकांना एक जबरदस्त कॅप्टन्सी टास्क पाहायला मिळाला. या टास्कदरम्यान केवळ स्पर्धाच नव्हती, तर संपूर्ण घरात चांगलाच गोंधळ, वाद आणि आरोप-प्रत्यारोप झाले. विशेषतः बसीर अली, अभिषेक बजाज आणि अवेज दरबार यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं. टास्क दरम्यान बसीर (Baseer Ali) आणि अभिषेक यांच्यात सुरुवातीला वाद झाला. हे भांडण एवढं वाढलं की, त्यात अवेज दरबारही ओढला गेला. दोघेही बसीर आणि अभिषेक सतत आक्रमक आणि थोडक्यात हिंसक वागू लागले. अवेजने त्यांच्या वागणुकीवर टीका करत स्पष्ट मत मांडलं, ज्यामुळे बसीर आणि त्याच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. (Bigg Boss 19)

बसीरने अवेजवर पक्षपाती असल्याचा आरोप करत त्याच्यावर चांगलाच ताशेरे ओढला. सुरुवातीला अवेजने शांत राहण्याचा प्रयत्न केला आणि बसीरला हळू आवाजात बोलण्यास सांगितले. मात्र बसीरने ऐकायला तयार नसल्याने भांडण अधिक चिघळले. पुढे बसीरने अवेजवर वैयक्तिक टीका करत म्हटलं की, “तू नेहमी तुझ्या गर्लफ्रेंडच्या मागे लपतोस.” यावर अवेजचा संयम सुटला. अवेजनेही बसीरवर पलटवार करत आरोप केला की, “तुझा संपूर्ण गेम मुलीभोवती फिरतो. कधी तू नतालिया, कधी फरहाना, तर कधी नेहलसोबत अँगल तयार करतोस.” यामुळे चिडलेल्या बसीरने त्याच्या वैयक्तिक आयुष्याचे ‘गुपितं’ उघड करण्याचा इशारा दिला.

पुढे झीशन आणि अमालसोबत गप्पा मारताना, बसीरने दावा केला की, अवेजचं बाहेर वेगळंच रूप आहे. तो म्हणाला, “जरी अवेजच्या गर्लफ्रेंड आहे, तरी तो अनेक मुलींशी चांगलं नातं ठेवतो.” यावर अमाल मलिकनेही उघडपणे आरोप केला की, “आमचे 15-16 कॉमन मित्र आहेत. अवेज 10 वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगतो, पण तरीही तो रोज कोणालातरी डीएम करत असतो.” (Bigg Boss 19)
============================
हे देखील वाचा: Big Boss 19: सलमान खानशिवाय होणार वीकेंड का वार; ‘हा’ अभिनेता करणार सूत्रसंचालन
============================
यावेळी बसीरनेही टोला लगावत म्हटलं, “डीएमचं सोड, मला त्याचे अनेक किस्से माहित आहेत.” दरम्यान, या टास्कचे संचालक अवेज आणि नगमा होते. त्यांनी अमाल मलिकने पहिला राउंड उत्तम केला असल्याचं सांगितलं आणि त्याला विजेता घोषित केलं. परिणामी, अमाल या आठवड्यात कॅप्टन झाला आहे.