
Bigg Boss Marathi 6 च्या घरात ‘जयभीम’च्या घोषणेने एन्ट्री करणारी जुन्नरची वाघीण Divya Shinde आहे तरी कोण?
मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो असलेल्या Bigg Boss Marathi ने पुन्हा एकदा सहाव्या पर्वासह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नव्या सीजनमध्ये कोणते चेहरे घरात प्रवेश करणार, याची उत्सुकता अनेक दिवसांपासून शिगेला पोहोचली होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून, या पर्वात सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये दिव्या शिंदे (Divya Shinde) या नावाची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. स्टेजवर पाऊल ठेवताच दिव्याने केलेली ‘जयभीम’ची घोषणा केवळ घोषणाच नव्हती, तर ती तिच्या विचारांची आणि ओळखीची ठळक अभिव्यक्ती होती. अभिनेता आणि शोचा होस्ट रितेश देशमुख ( Ritesh Deshmukh ) यांना तसेच संपूर्ण महाराष्ट्राला ‘जयभीम’ म्हणत तिने बिग बॉसच्या मंचावर आपली वेगळी छाप पाडली.(Bigg Boss Marathi 6)

दिव्या शिंदे ही केवळ एक स्पर्धक नाही, तर तीची एक ओळख ही आहे. सोशल मीडियावर ती ‘सरकार’ या नावाने प्रसिद्ध असून, तिची बेधडक मतं, ठाम भूमिका आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे ती लाखो तरुणांची प्रेरणा बनली आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न, सामाजिक अन्याय, शैक्षणिक व्यवस्थेतील त्रुटी यावर ती सातत्याने आवाज उठवत आली आहे.काही दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेज संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये कॉलेजमध्ये डोनेशनद्वारे प्रवेश दिला जातो आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं, असा गंभीर आरोप करण्यात आला होता. या घटनेमुळे विद्यार्थी हक्कांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. या आंदोलनात दिव्या शिंदेने आघाडीची भूमिका घेतली होती. आंबेडकरी चळवळ, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि सामाजिक न्यायासाठीच्या लढ्यांमध्ये तिचा सहभाग नेहमीच ठळक राहिला आहे. केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता, ती प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी होते, हीच तिची ओळख आहे.

दिव्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि युवकविषयक कार्यक्रमांमध्ये भाषणं करत असते. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणं, अन्यायाविरोधात आवाज उठवायला प्रोत्साहित करणं हे तिच्या कामाचं प्रमुख उद्दिष्ट आहे.इन्स्टाग्रामवर तिचे ९ लाखांहून अधिक फॉलोअर्स असून, तिच्या प्रत्येक पोस्टला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. हीच लोकप्रियता आता तिला बिग बॉसच्या घरात घेऊन आली आहे.दिव्या शिंदेच्या ठाम मतांमुळे, सामाजिक जाणीवेने भरलेल्या भाष्यामुळे आणि न घाबरता बोलण्याच्या स्वभावामुळे बिग बॉसच्या घरात नक्कीच वेगळे समीकरणं तयार होतील, अशी चर्चा आहे. मनोरंजनासोबतच सामाजिक मुद्द्यांवरही चर्चा रंगेल, अशी अपेक्षा प्रेक्षक व्यक्त करत आहेत. (Bigg Boss Marathi 6)
==============================
==============================
एकूणच, बिग बॉस मराठी ६ हा सीजन केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता विचारांना चालना देणारा ठरेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दिव्या शिंदेची ही नवी इनिंग तिच्या आयुष्यात आणि मराठी रिअॅलिटी शोच्या इतिहासात नक्कीच लक्षवेधी ठरेल, यात शंका नाही.