दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
बॉलिवूडमधले बहुचर्चित चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी, तर काही चित्रपटांना अनपेक्षित यश
सन २०२० साली कोरोना नावाच्या अकल्पित संकटामुळे भारतातीलच नाही, तर संपूर्ण जगातील लोकांचं आयुष्य अचानक बदलून गेलं. पण डिसेंबर २०२१ पासून मात्र हळूहळू आयुष्य पूर्वपदावर येऊ लागलं. ओस पडलेले रस्ते पुन्हा गजबजले, शाळा सुरु झाल्या, रेस्टोरंटस, मॉल्स काही नियमांच्या बंधनात का होईना पण सुरु झाले. हळूहळू थिएटर्सही सुरु झाली. पण तोपर्यंत बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. कारण यावर्षी जूनपर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कलेक्शनचे आकडे बघितले, तर लक्षात येईल की, काही अपवाद वगळता प्रेक्षकांनी बॉलिवूडच्या अनेक बहुचर्चित चित्रपटांना नाकारलं आहे. एक नजर बॉलिवूडच्या या बहुचर्चित चित्रपटांच्या कलेक्शनवर (Bollywood movies 2022 collection)
83
हा चित्रपट खरंतर डिसेंबर २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित झाला. त्यामुळे यावर्षी प्रदर्शित झालेला नसला तरीही या यादीमध्ये घेतलं आहे. कबीर खान लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट १९८३ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपवर आधारित आहे. हा वर्ल्ड कप कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकला होता. चित्रपटात रणवीर सिंग कपिल देवच्या मुख्य भूमिकेत तर, जिवा, पंकज त्रिपाठी, ताहिर राज भसीन, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, एमी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा आणि आर. बद्री महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. या चित्रपटाकडून रणवीर सिंगला भरपूर अपेक्षा होत्या पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.
रिलीज: २४ डिसेंबर २०२१
बजेट: रु. २७० कोटी
कलेक्शन: रु. १०९.०२ कोटी
बधाई दो
हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट ‘बधाई हो’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा समलिंगी संबंधांवर आधारित एक विनोदी चित्रपट असून यामध्ये राजकुमार राव, भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
रिलीज: ११ फेब्रुवारी २०२२
बजेट: रु. ३५ कोटी
कलेक्शन: रु. २०.६२ कोटी
गंगुबाई काठियावाडी
यावर्षी प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘गंगुबाई काठियावाडी’. प्रदर्शनाआधीच हा चित्रपट अनेक कारणांनी चर्चेत होता. पण अखेर सगळे अडथळे दूर करून हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात ‘गंगुबाई काठियावाडी’ या वेश्या व्यवसायातील स्त्रीचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट आलियासाठी प्रचंड महत्त्वाचा होता कारण ती यामध्ये मुख्य आणि आव्हानात्मक भूमिकेत होती. आलियासह यामध्ये अजय देवगण, शांतनू माहेश्वरी, हुमा कुरेशी, वरुण कपूर, विजय राज इ. कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. विवादित असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ठीकठाक कमाई केली.
रिलीज: २५ फेब्रुवारी २०२२
बजेट: रु. १०० ते ११० कोटी
कलेक्शन: रु. १२९.१० कोटी
झुंड
हा चित्रपट खरं तर मराठी प्रेक्षकांसाठी खास होता. कारण मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत तर, आकाश ठोसर, रिंकू राजगुरू लक्षवेधी भूमिकेमध्ये आहेत. या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्ष होत्या. परंतु सोशल मीडियावर झालेल्या चर्चा, नागराज मंजुळे यांच्या काही विधानांवरून सोशल मीडियावर झालेला गदारोळ, पावनखिंड या मराठी चित्रपटासोबत झालेली तुलना याचा फटका चित्रपटाला बसला.
रिलीज: ४ मार्च २०२२
बजेट: रु. २२ कोटी
कलेक्शन: रु. १५. १६ कोटी
द काश्मीर फाईल्स
काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित या चित्रपटाने कमाल केली. कपिल शर्माने प्रमोशन करण्यास नकार दिल्यावर सोशल मीडियामध्ये हा मुद्दा विशेष चर्चिला गेला. या वादाचा फायदा चित्रपटाला झाला आणि चित्रपटाने छप्पडतोड कमाई केली. पब्लिक काय करू शकतं, हे या चित्रपटाच्या यशाने दाखवून दिलं. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर इ. कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. हा चित्रपट बॉलिवूडमधील यावर्षीचा आत्तापर्यंतचा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. (Bollywood movies 2022 collection)
रिलीज: ११ मार्च २०२२
बजेट: रु. १५ ते २५ कोटी
कलेक्शन: रु. ३३९.४९ कोटी
जर्सी
एका क्रिकेटरच्या आयुष्यावर आधारित असलेला ‘जर्सी’ हा चित्रपट गौतम तिन्ननुरी यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाचं समीक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं, पण प्रेक्षकांनी मात्र या चित्रपटाकडे पाठ फिरवली. या चित्रपटात शाहिद कपूर प्रमुख भूमिकेत तर, मृणाल ठाकूर, पंकज कपूर, इ कलाकार मध्यवर्ती भूमिकेत आहेत.
रिलीज: २२ एप्रिल २०२२
बजेट: रु. ८० कोटी
कलेक्शन: रु.१९.६८ कोटी
जयेशभाई जोरदार
दिव्यांग ठक्कर दिग्दर्शित ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला ते कळलंच नाही. या विनोदी चित्रपटात रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत, तर त्याच्यासोबत शालिनी पांडे, रत्ना पाठक शहा, बोमन इराणी, इ कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. (Bollywood movies 2022 collection)
रिलीज: १३ मे २०२२
बजेट: रु. ८६ कोटी
कलेक्शन: रु.१५.५९ कोटी
धाकड
गाजावाजा करत प्रदर्शित झालेला रजनीश घई दिग्दर्शित कंगना राणावतचा बहुचर्चित धाकड पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. यामध्ये कंगनासह अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता, इ. कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
रिलीज: २० मे २०२२
बजेट: रु. ८५ कोटी
कलेक्शन: रु.२.५८ कोटी
भुलभुलैय्या २
विद्या बालन, अक्षय कुमारच्या सुपरहिट सस्पेन्स थ्रिलर ‘भूलभुलैय्या’ चित्रपटाचा सिक्वल असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत अनीस बज्मी. या चित्रपटात तब्बू, कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाने मात्र बॉलीवूडला दिलासा दिला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. (Bollywood movies 2022 collection)
रिलीज: २० मे २०२२
बजेट: रु. ९० कोटी
कलेक्शन: रु.१८५.९२ कोटी
सम्राट पृथ्वीराज
पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित या बिग बजेट चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट असा कोसळला जणू पाच वर्षांचं सरकार अवघ्या ५ दिवसांत कोसळावं. या चित्रपटात अक्षय कुमार, संजय दत्त, सोनू सूद, मानुषी छिल्लार, इ. कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.
रिलीज: ३ जून २०२२
बजेट: रु. १५० ते ३०० कोटी
कलेक्शन: रु.६८. ०५ कोटी
जुग जुग जियो
निखळ करमणूक करणाऱ्या राज मेहता दिग्दर्शित ‘जुग जुग जियो’ या चित्रपटानेही बॉलीवूडला निराश केलं. चित्रपट ठीकठाक चालला, पण बजेट जास्त असणारा हा चित्रपटही बॉलिवूडसाठी ‘पैसा वसूल’ ठरला नाही. या चित्रपटात अनिल कपूर, वरुण धवल, नीतू कपूर, कियारा अडवाणी, प्राजक्ता कोळी, इ कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. (Bollywood movies 2022 collection)
रिलीज: २४ जून २०२२
बजेट: रु. ११० कोटी
कलेक्शन: रु.८५.०३ कोटी
=======
हे देखील वाचा – चार दिवस सासूचे: या मालिकेचं नाव चक्क ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदविण्यात आलं..
=======
हे होते जूनपर्यंत प्रदर्शित झालेले चित्रपट. जुलै, ऑगस्टमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचं भविष्य लवकरच समजेल. अर्थात समशेरा आणि लाल सिंग चड्ढा चित्रपटाची निराशाजनक सुरुवात बघता चित्र फारसं आशादायी नसणार.
संदर्भ:
बजेट – विकिपीडिया
कलेक्शन: बॉलिवूडहंगामा.कॉम