Maya Marathi Movie: नात्यांची निःशब्द कहाणी सांगणाऱ्या सिनेमाचे मोशन पोस्टर

Bombay Talkiesच्या उर्वरित खुणाही पडद्याआड चालल्यात
सरत्या वर्षात मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील स्वामी विवेकानंद मार्गावरील फिल्मीस्थान स्टुडिओ बंद होऊन तो पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली तोच महालक्ष्मी रेल्वे स्टेशनजवळचा फेमस स्टुडिओही बंद झाला आणि तोही पाडण्याची प्रक्रिया सुरू झालीदेखिल….. अशा पध्दतीने मुंबईतील कृष्ण धवल अर्थात ब्लँक अॅण्ड व्हाईट चित्रपटाच्या काळापासूनचा एकेक चित्रपट स्टुडिओ काळाच्या पडद्याआड जात आहे.
मुंबईतील असाच एक खूपच जुना चित्रपट स्टूडिओ म्हणजे, मालाड येथील बॉम्बे टॉकिज स्टुडिओ! अवघ्या काही वर्षांपूर्वीच विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित बहुचर्चित वेबसिरिज ‘ज्युबिली ‘ने हा स्टुडिओ चर्चेत आला. कारण या बेवसिरीजचे कथानक याच बॉम्बे टॉकिज स्टुडिओतील घडामोडींसारखे आहे. हा केवळ योगायोग नसावा.

आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीचं त्यामुळे हे बॉम्बे टॉकिज कुठलं, त्याचं महत्व काय, त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील काॅन्ट्रीब्युशन काय याबाबतचे कुतूहल वाढलं आणि त्यांनी सवयीप्रमाणे गुगल सर्च केलं. एका क्लिकवर माहिती मिळेल हो, पण त्याचं महत्त्व अधोरेखित होणार नाही.
खूप मागची पिढी म्हणजे साठी पासष्टीपार चित्रपट रसिक या ‘ज्युबिली’ने जुन्या आठवणीत रमले. या वेबसिरिजमधील पात्र हिमांशु रॉय, देविका राणी, अशोककुमार, दिलीपकुमार यांच्याशी बरीचशी मिळती जुळती आहेत. खरं तर ती अगदी तशीच असावीत असाच पटकथा व संवाद लेखक आणि दिग्दर्शकाचा हेतू अगदीच स्पष्ट असल्याचे जाणवले. त्यापेक्षा थेटच ‘बॉम्बे टॉकिजची गोष्ट’ का दाखवली नाही?
मुंबईतील प्रत्येक चित्रपट स्टूडिओची आपली एक वेगळी ओळख आहे, गोष्ट आहे. त्यातील काही स्टुडिओच्या खाणाखुणा शोधाव्या लागतात, तर काही चित्रपट स्टुडिओची नावे बस स्टॉप्सना दिल्याचे दिसते. तर जुन्या चित्रपट स्टूडिओतील परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओ, गोरेगाव येथील स्वाती स्टुडिओ, वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओ, मानखुर्द येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी हे कार्यरत आहेत. चित्रनगरी पुढील वर्षी पन्नास वर्षे पूर्ण करीत आहे.
आज बॉम्बे टॉकिज हे बसस्टॉपपुरते का असेना पण आहे. मालाडला स्वामी विवेकानंद रोडवर म्हणजेच आजच्या पिढीतील एस. व्ही. रोडवर हा बसस्टॉप आहे. कदाचित काहीना या नावाचे येथे फारच पूर्वी सिंगल स्क्रीन थियेटर असावे असे वाटत असेलही. कारण तीही एकेक करत बंद होत गेलीत. या विभागातील खूप जुन्या रहिवाशांना कधी काळी या नावाचा येथे स्टुडिओ असावा याची केवळ माहिती असावी. मूळ स्टुडिओच्या जागी आलेल्या इंडस्ट्रीयल इमारतीची ओळख ‘बॉम्बे टॉकिज’ अशी आहे. आजच्या पिढीला हे नाव असे माहित आहे.
आपल्याकडे जुन्या काळातील चित्रपटगृहावर फारसा फोकस पडला नाही, तसेच मुंबईतील खूपच जुन्या चित्रपट स्टुडिओवर एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आणि मनोरंजनाचा खजाना असलेली मालिका होऊ शकेल. इन्फर्मेशन आणि एन्टरटेन्मेन्ट यांची जोडणी म्हणजे, इन्फोटेक. जे आजचे विलक्षण चलनी नाणे आहे. तसा बहुस्तरीय मसाला ‘जुन्या काळातील चित्रपट स्टुडिओत’ डोकावताना मिळेल. फिल्म मेकिंगपासून गॉसिप्सपर्यंत बहुत कुछ म्हणजे हे शूटिंगचे स्टुडिओ.

मेकअप रुमपासून डबिंग थिएटरपर्यंतचा आणि याच स्टुडिओतील लॅण्ड लाईन फोनपासून लहान मोठ्या गार्डनपर्यंत हा रोचक, रंजक, कधी आश्चर्यकारक असाच भन्नाट व भरभरुन प्रवास आहे. उगाच नाही, ‘ज्युबिली’ वेबसिरिज जन्माला आली आणि हिटही झाली. चित्रपट हे दृश्य माध्यम आहे म्हणूनच त्याचा इतिहासही त्याच स्वरुपात जतन करायला हवा (होता.) अजूनही ते शक्य आहे. लेखणीसह कॅमेरा कार्यरत ठेवला तर बरेच काही ‘कव्हर ‘ होईल. डिजिटल युगात त्याची गरज आहे.
बॉम्बे टॉकिज स्टुडिओने अशोककुमार, दिलीपकुमार अशा बुजुर्ग अभिनेत्याना रुपेरी पदार्पणाची संधी दिलीय असे म्हटल्याने या स्टुडिओचे मोठेपण नक्कीच अधोरेखित होते. हिंदी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील ही ‘चलनी नाणी’. अभिनय कसा असतो, कसा करावा याचे धडे यांचे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहून शिकता येईल. हे जणू ‘अभिनय संस्था ‘ आहेत. चित्रपट निर्माते हिमांशू रॉय व त्यांची अभिनेत्री पत्नी देविका राणी यांनी १९३४ साली मालाडला चित्रपट स्टुडिओ व लॅबोरेटरी यांची उभारणी केली. त्या काळात मुंबईची सीमा वांद्रे- सायनपर्यंत होती. ती जुन्या नकाशावरही दिसते. त्या काळानुसार ते योग्यच होते. शहरात खूप शांतता होती. अर्थातच मालाड मुंबईपासून खूपच दूर.
================================
हे देखील वाचा : B Merwan चे सिनेमावाल्याशी नाते…
================================
आपल्या देशातील चित्रपट नुकताच (म्हणजेच १९३२ साली) बोलू लागला होता. तोपर्यंत मूकपटांची निर्मिती होत असे. हळूहळू चित्रपट निर्मिती संस्था व त्यांचे स्टुडिओ यांची वाढ होत होती. ‘जवानी की हवा’हा बॉम्बे टॉकिजचा पहिला चित्रपट होय. पण ‘अछूत कन्या’च्या यशाने बॉम्बे टॉकिजला स्थैर्य व अस्तित्व मिळवून दिले. ते फारच गरजेचे असते. चित्रपटसृष्टीत ‘यश हेच चलनी नाणे’ आहे, यात बरेच काही आले.ते कायमच चालत असते. अशोककुमार व देविका राणी यांच्या त्यात प्रमुख भूमिका होत्या. १९४० साली हिमांशू राॅय यांचे निधन झाल्यावर देविका राणी यांनी सूत्रे हाती घेतली. त्या काळात कितीही मोठा स्टार असला तरी तो ‘स्टुडिओचा कर्मचारी ‘ असे. तो काळच तसा होता. चित्रपट निर्मितीत काही परंपरा होती. कलाकार लहन असो वा मोठा त्याला मासिक पगार असे.
अशोककुमारने अशा पध्दतीने बॉम्बे टॉकिजच्या ‘किस्मत’, ‘बंधन’ इत्यादी चित्रपटातून भूमिका केल्या. ‘किस्मत'(१९४३) चित्रपटाचे विशेष म्हणजे आपल्याकडील चित्रपटात पहिल्यांदाच ‘चोर नायक ‘ पाह्यला मिळाला. चित्रपटाच्या गोष्टी अशा बदलत होत्या. यात अशोककुमारच्या लहानपणीची भूमिका मेहमूदने साकारलीय. या चित्रपटाने कोलकात्यातील मॅजेस्टिक चित्रपटगृहात शंभरपेक्षा जास्त आठवडे मुक्काम केला. हा दीर्घकालीन विक्रम आहे. या यशाचा कायमच संदर्भ दिला जातो.

याच बॉम्बे टॉकिजने अमिया चक्रवर्ती दिग्दर्शित ‘ज्वार भाटा’ ( १९४४) या चित्रपटाच्या निर्मितीची तयारी केली तेव्हा त्याना नवा नायक हवा होता . ती संधी दिलीपकुमारला मिळाली तरी दरम्यान अनेक गोष्टी घडल्यात. देविका राणी यांनीच युसूफ खानचा दिलीपकुमार केला. यावेळेस वासुदेव आणि जहांगीर अशीही दोन नावे होती. या तीन नावांतून दिलीपकुमार हे नाव निवडले गेले आणि या नावाचा इतिहास/ प्रभाव/ दबदबा आज सगळ्यानाच माहित आहे. दिलीपकुमारच्या निधनानंतरही त्याचे चित्रपट व अभिनय यांचा प्रभाव कायम आहे.
बॉम्बे टॉकिजची असंख्य वैशिष्ट्ये आहेत. तेथील ग्रंथालयात असंख्य पुस्तके होती (चित्रपट स्टुडिओ म्हणजे केवळ शूटिंग शूटिंग नि ग्लॅमर, गॉसिप्स, फिल्मी गप्पा नाही. तेथे बौद्धिक वाढही महत्त्वाची) हा स्टुडिओ वक्तशीरपणासाठीही ओळखला जाई. (कालांतराने याच चित्रपटसृष्टीला कोणत्याच बाबतीत ‘वेळेचे बंधन’ राहिले नाही. एकादा अपवाद अमिताभ बच्चन) एकाद्या कलाकाराचे शूटिंग वा डबिंग नसले तरीही त्याने रोजच्यारोज सकाळी नऊ वाजता यायलाच हवे हा दंडक होता.

स्टार तर हमखास उशीराच यायला हवा अशी जणू गरज असल्याच्या आजच्या काळात हे सगळेच वेगळेच वाटतेय ना? बॉम्बे टॉकिजचे कॅन्टीन रुचकर जेवणासाठी प्रसिद्ध होतेच पण कलाकार, निर्माता-दिग्दर्शक, तंत्रज्ञ व कामगार एकत्र येऊन जेवत. आजच्या प्रत्येक लहान मोठा स्टार कधी लंच ब्रेक होतोय, बाहेरुन मेहंगा खाना मागवतोय आणि आपल्या व्हॅनिटीत जातोय अशा काळात हे सगळेच दुर्मिळ वाटतेय ना? जुन्या काळातील चित्रपट स्टूडिओत त्या काळातील सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्ये दिसतात.
दिलीपकुमारने बॉम्बे टॉकिजच्या ज्वार भाटा (१९४४), प्रतिमा (१९४५) व मिलन (१९४६) अशा आपल्या कारकीर्दीतील पहिल्या तीन चित्रपटात भूमिका केल्या. त्याची कलाकार व व्यक्तिमत्त्व म्हणून येथेच पाळेमुळे रुजत गेली, घट्ट होत गेली. बॉम्बे टॉकिजने ‘स्टार’ घडवले असेच कौतुकाने म्हणायला हवे. बॉम्बे टॉकिजने आणखीनही काही चित्रपटांची निर्मिती केलीय आणि त्यांची आणखीन काही वैशिष्ट्ये आहेत. चित्रपट शूटिंग स्टुडिओ म्हणजे फक्त चार भिंती नव्हतेच. तर ते एक वेगळे ‘लाईव्ह जग आहे. जेथे संवेदनशीलता आणि स्वप्न आहेत. मेहनत आहे आणि अनेक बोलके चेहरे आहेत.
================================
हे देखील वाचा : Multiplex चा रंग काही वेगळाच!
================================
जुन्या काळातील प्रत्येक चित्रपट स्टुडिओची अशी बरीच खासियत आहे. पण त्याची आठवण करुन द्यावी लागतेय. आज आपण बॉम्बे टॉकिज परिसराला भेट दिल्यावर फक्त आणि फक्त जुने काही सांगाडे दिसतात. याचा मी नुकताच अनुभव घेतला. हे सांगाडे जुन्या वैभवाची आठवण देतात. पण असा फ्लॅशबॅक असला तरी आता येथील उर्वरित खुणाही पडद्याआड चालल्यात. कारण त्याभोवती पत्रे लागलेले दिसतात. असे पत्रे लागले म्हणजे ते सर्व जुने अवशेष पाडले जाणार हे निश्चित.
हा स्टुडिओ १९५४ साली बंद झाला आणि आतापर्यंतच्या तब्बल सत्तर वर्षांच्या काळात मूळ खाणाखुणा फारच पुसट होत होत गेल्या. काळ कोणासाठी थांबत नाही. मुंबईची मूळ ओळखही मागे पडत गेली आहे. मुंबईचा विस्तारही फार झाला. त्यात मूळ बॉम्बे टॉकिज ते कितीसे राहणार? चित्रपटाच्या इतिहासात डोकावताना ते सतत समोर येत राहिले. प्रत्यक्षात ते आकुंचन पावत गेले आणि काही भाग तेवढा राहिला. आता तोही काळाच्या पडद्याआड चाललाय. आणि हे सगळे स्वाभाविक आहे. आपणही ते स्वीकारावे. मुंबईतील इंग्रजकालीन ट्राम, घोडागाडी या गोष्टी इतिहासजमा झाल्या. जुन्या चित्रपटात त्यांचे दर्शन घडते तेवढेच. त्याप्रमाणेच अनेक चित्रपट स्टूडिओ जुन्या चित्रपटातील श्रेयनामावलीत आणि काही दृश्यात दिसतील…. बॉम्बे टॉकिजही.