सिंगल स्क्रीन वा मल्टीप्लेक्स, लोकांना थेटर्सकडे खेचून आणणारा बॉक्स ऑफिस किंग – सलमान खान!
१९९२ आणि १९९३ या दोन्ही वर्षात सिनेक्षेत्रात २ आउटसाइडर्सनी एंट्री घेतली आणि आज ते एक सेल्फ मेड सुपरस्टार म्हणून ओळखले जातात, त्यांची नावं म्हणजे शाहरुख खान आणि अक्षय कुमार! पण बरोबर २ ते ३ वर्षांपूर्वी २ स्टारकिड्स नी या क्षेत्रात पदार्पण करून लोकांची मनं जिंकली होती. त्यातलं एक नाव म्हणजे नासिर हुसेन यांचे सुपुत्र आमीर खान आणि दुसरं नाव म्हणजे सुप्रसिद्ध डायलॉग लेखक आणि पटकथा लेखक सलीम खान यांचा मुलगा सलमान खान.
आमीर आणि सलमान दोघेही एका लव्ह स्टोरी मधून चॉकलेट बॉयच्या रूपात इंट्रोड्यूस झाले. लोकांनी दोघांना डोक्यावर घेतलं, हळू हळू अक्षय कुमार यांच्यापासून वेगळा वाटायला लागला आणि साधारण ९० नंतर जवळ जवळ २ दशकं या तीन खान लोकांनी बॉलिवूड वर आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
सध्या कोरोना महामारीमुळे एकाही सुपरस्टारचा सिनेमा थेटर्स पर्यंत पोहोचू शकलेला नाही, आणि पुढचे काही काही महीने तरी हे चित्र काही बदलणार नाही. ज्या भाईजानचे वर्षाला किमान २ सिनेमे यायचे आणि दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायचे अशा सलमान ने या वर्षात एकही सिनेमा रिलीज केला नाही हे पचायला जरा अवघडच आहे की नाही? पण सलमान तरी त्याला काय करणार? स्वतःचे सिनेमे ओटीटी वर विकून सलमान त्यातून छोटा मोठा प्रॉफिट कमावणारा माणूस नाही, “ये बडा जानवर है, इस छोटेसे पिंजरे मे नहीं समायेगा” असंच काहीसं सलमानच्या बाबतीत म्हणायला लागेल.
आणि खरं सांगायचं झालं तर सलमान खान अनुभवायचा तर तो मोठ्या पडद्यावरच! त्यामुळे निदान या वाढदिवशी तरी सलमान त्याच्या नवीन प्रोजेक्टची डेट सांगेल अशी आशा कित्येक भाईजान फॅन्स लावून बसले आहेत!
सलमान हे नाव काढलं की विद्या बालनचा फेमस डायलॉग आठवतो, एंटरटेंमेंट एंटरटेंमेंट एंटरटेंमेंट, आणि सलमान एक एंटरटेनर आहे!
१९८९ साली आलेल्या मैने प्यार कीया ने सलमानला इंडस्ट्री मधले दरवाजे तर खुले केले पण यापुढे सलमान ने जी खिंड लढवली आहे ती केवळ स्वतःच्या जिवावर! सलमानला त्याच्या लिमिटेशन्स माहीत आहेत, त्याला माहीत आहे आपल्याला जास्त सीरियस अभिनय जमत नाहीत, त्यामुळे तो त्या वाट्याला सहसा जात नाही. एखाद दूसरा साजन, लव्ह, बागबान किंवा तेरे नाम सारखा सिनेमा करून तो लोकांना मध्येच सुखद धक्का देत असतो.
पण सलमान म्हंटलं की फार भारी भरकम कथानक वगैरे आपण अपेक्षाच सोडून द्याव्यात, २ ते अडीच तास केवळ धमाल करायची या नजरेतूनच सलमानचे सिनेमे बघायचे! आणखीन एक गोष्ट म्हणजे ९० च्या काळात ज्या पद्धतीने चोप्रा आणि जोहर बॅनरनी शाहरुखला एका साच्यात बसवलं तसाच काहीसा प्रयत्न बडजात्या कंपनीने सलमानवर केला, पण सुदैवाने सलमान त्या साच्यात कधीच फिट झाला नाही. १९९४ ते १९९९ सलमानने खरंच खूप सुंदर सिनेमे दिले. अंदाज अपना अपना, हम आपके है कौन, जुडवा, करण अर्जुन पासून खामोशी, कुछ कुछ होता है, हम दिल दे चुके सनम पर्यंत त्याचे सगळेच सिनेमे आजही लोकं आवडीने बघतात! हम साथ साथ है च्या शूटिंग दरम्यान काळवीट शिकार केस आणि त्यांनंतर सलमानच्या आयुष्यच पूर्ण बदललं. ऐश्वर्या राय सोबत असलेलं अफेअर, विवेक ओबेरॉयला धमकावणं, यामुळे सलमान हळू हळू इंडस्ट्री मधला बॅड बॉय बनत होता!
यानंतर सलमान अडकला तो एका हीट अँड रन केस मध्ये. भारताच्या इतिहासात चाललेली सर्वात मोठी हीट अँड रन केस म्हणजे सलमानची. त्यासाठी काही काळ सलमान जेल मध्ये सुद्धा जाऊन आला. पण २००२ पासून चालू असलेल्या केसवर २०१५ मध्ये पडदा पडला, त्या केस विषयी आणि त्यातल्या फॅक्टस विषयी बरंच काही बोललं लिहिलं गेलं आहे त्यामुळे त्यात न पडलेलंच बरं!
त्यानंतर तब्बल ५ ते ६ वर्षे सलमान सिनेमे करत गेला काही हीट तर काही फ्लॉप पण सलमान खान हे नाव लोकं आता विसरू लागले आहेत अशी एक वेळ सुद्धा आली होती! हेलॉ ब्रदर, मुझसे शादी करोगी, नो एंट्री, पार्टनर सारख्या सिनेमातून सलमान हलके फुलके रोल्स करत होता. पण लकी, गर्व, जान-ए-मन, युवराज सारखे कित्येक सुपरफ्लॉप सिनेमे सुद्धा सलमानच्या नावावर होते. सिनेमात एकटा सलमान असेल तर सिनेमा हमखास फ्लॉप असं एक समीकरणच बनत चाललं होतं!
पण २००९ साली प्रभूदेवा ने सलमानला घेऊन वॉन्टेड केला आणि सलमानचं नशीब पुन्हा चमकलं. प्रभू देवा ने या सिनेमातून सलमानची जुनी अॅक्शन हीरोची इमेज नव्याने तयार केली आणि धासु डायलॉग आणि दमदार अॅक्शन सोबतच तगडी कहाणी असलेला सलमानचा वॉन्टेड अक्षरशः लोकांनी डोक्यावर घेतला. सलमानचे एक अन एक डायलॉग हीट झाले. वॉन्टेड ने सलमानचा हरवलेला “जलवा” परत आणला!
यानंतर सलमानने पुढचा मागचा कसलाही विचार न करता सिनेमे करायला सुरुवात केली, आणि लागोपाठ ४ सिनेमे १०० आणि २०० करोडची कमाई करून सलमान बॉलिवूडचा बॉक्स ऑफिस किंग झाला! दबंग, रेडी, बॉडीगार्ड, एक था टायगर, बजरंगी भाईजान, किक असे लागोपाठ हीट सिनेमे सलमानने दिले. सलमान सिनेमात म्हणजे हमखास २०० करोड कमावणार ही समजूत बहुतेक प्रत्येक प्रोड्यूसरची झाली. आजह सलमान काम करताना जास्त विचार करत नाही, त्याला एखादा सिनेमा करावासा वाटला तो करतो. स्वतःची लिमिट ओळखून तो रोल निवडतो. गेली काही वर्ष त्याच्यासाठी सुद्धा तशी खास गेली नाहीत.
टायगर जिंदा है, ट्यूबलाइट, रेस ३ आणि नुकताच आलेला भारत हे ४ ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर पार आपटले. सलमानचा फॉर्म्युला जुना झालाय असं नाही पण काळ नक्कीच बदलला आहे. पण कितीही झालं तरी जेंव्हा हे कोरोना संकट दूर होईल आणि जेंव्हा केंव्हा सलमानचा सिनेमा थेटर मध्ये लागेल तेंव्हा प्रेक्षकांची गर्दी नक्की होईल कारण आजही स्टॉल असो वा बाल्कनी, सिंगल स्क्रीन असो वा मल्टीप्लेक्स बॉक्स ऑफिसवर लोकांना खेचून आणणारा एकच बॉक्स ऑफिस किंग आहे तो म्हणजे सलमान खान. अशा ह्या अतरंगी दबंग भाईजानला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!