मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
मुन्नाभाई MBBS अन बोमन इराणींच्या कास्टिंगचा किस्सा!
मुन्नाभाई MBBS. अशी एक फिल्म जिने घरातल्या शेंबड्या पोरांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना मनसोक्त हसवलं, नाक फुरफुरेपर्यंत रडायला लावलं. या पिक्चरमधील सगळ्याच गोष्टींना लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. मुन्नाभाईचा रॉकिंग पण तेवढाच हळवा अंदाज, सर्किटची बिनधास्त भाईगिरी, जिम्मी शेरगिलचा इमोशनल करणारा अभिनय, ग्रेसी सिंघचा ग्रेस या सगळ्या गोष्टी लोकांच्या मनात कायमच्या घर करून बसल्या. ‘टेन्शन नही लेनेका अपुन है ना’ पासून ‘जादू कि झप्पी’ सगळच हिट झालं.
सगळ्या पिक्चरमध्ये एक माणूस मात्र कुणालाच आवडला नाही. तो म्हणजे कॉलेजचा डीन जे अस्थाना. बायका पोरांना त्याचा भयंकर राग आलेला. केवढ निष्ठुर माणूस आहे, म्हणून त्याला सर्वांनी शिव्या घातल्या. जेव्हा लोकांना त्या पात्राचा राग यायला लागला तिथेच ते पात्र साकारणारा नट जिंकला होता आणि ते कोण होते हे काही वेगळं सांगायची गरज नाही. अर्थातच बोमन इराणी. त्याचं काम जेवढ खतरनाक होतं तेवढाच खतरनाक त्यांच्या कास्टिंगचा किस्सा देखील आहे.
मुन्नाभाई हा राजकुमार हिरानी यांचा पहिला पिक्चर. आपल्या पहिल्या पिक्चरची प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित व्हावी म्हणून त्यांची धडपड सुरु होती. कास्टिंगचं जवळपास काम पूर्ण झालं होतं. परंतु डॉ. अस्थाना यांच्या पात्रासाठी त्यांना मनासारखा कलाकार मिळत नव्हता. बऱ्याच जनांना आजमावण्यात आलं होतं. पण हिरानींना आपल्या मनासारखा अस्थाना अजूनपर्यंत मिळालेला नव्हता. विधू विनोद चोप्रा, जे की मुन्नाभाई MBBS चे प्रोड्यूसर होते, त्यांनी एक दिवस राजकुमार हिरानींना बोमन इराणी यांच्याबद्दल सांगितलं आणि तु त्याचं काम एकदा बघितलं पाहिजेस म्हणून त्यांना आग्रह केला. कोण आहे हा ? बघुयात तरी म्हणून हिरानी ‘आय अम नॉट बाजीराव’ हे नाटक ज्यात बोमन इरानींनी ९१ वर्षांच्या म्हाताऱ्याची भूमिका साकारली होती ते बघायला गेले.
हिरानी पूर्ण नाटकभर फक्त बोमन इराणींनाच न्याहाळत राहिले. इरानींनी ती भूमिका कमाल निभावली होती. अगदी म्हाताऱ्या माणसांसारख चालणं, वागणं अन बोलणही अगदी तसच. एक तरुण आहे म्हाताऱ्याची भूमिका करतोय कुणाला अशी टिप्पणी द्यायला त्यांनी यत्किंचीतदेखील जागा ठेवली नव्हती. हिरानी प्रभावित झाले. त्यांना बोमन इराणीमध्ये अस्थानाची झलक दिसून गेली होती.
आता सगळ्यात मोठी अडचण होती ती वयाची. बोमन इराणी हे खूपच तरुण होते आणि अस्थानाचं पात्र हे साठीच्या जवळपासचं. बोमन यांना आता म्हतारं करण्याची धडपड सुरु झाली. मेकअप आर्टिस्ट वेगवेगळे प्रयोग करून बघत होते. कधी केस पांढरे कर, कधी चेहऱ्यावर सुरकुत्या आणून बघ तर कधी अजून काही. पण राजकुमार हिरानी यांच्या मनासारखा एकही लूक होत नव्हता. काही दिवस हेच चालत राहिलं.
=====
हे देखील वाचा : शाकुंतलमची जादू आणि आरहाचं कौतुक…
=====
एक दिवस राजकुमार हिरानींना बोमनचा फोन आला आणि त्यांनी विचारलं, कुठे आहेस ? एडीट रूममध्ये आहे, हिरानींनी उत्तर दिलं. तुझ्या ऑफिसमध्ये आलोय, एक लूक ट्राय केला आहे. तुला कसा वाटतो ते बघून सांग, बमन यांनी समोरून सांगितलं.
ते ऐकून राजकुमार हिरानी लगबगीने तिकडे जायला निघाले. जाताना त्यांना पायऱ्यांवर एका साठीच्या इसमाने अडवून हेल्लो वगैरे म्हणून बोलण्याचा प्रयत्न केला. राजकुमार हिरानी घाईत होते त्यांनी नंतर बोलूयात म्हणून तिथून काढता पाय घेतला. ते वर ऑफिसमध्ये गेले. तिथे बघतायत तर तिथे बोमन इराणी नव्हते. त्यांनी विचारलं असता त्यांना कळाल की ते तर खालीच त्यांना भेटायला गेले आहेत.
अचानक राजकुमार हिरानी यांना लक्षात आलं, पायऱ्यांवर ज्या म्हाताऱ्याने त्यांना अडवल होतं ते बोमन इराणी होते. ते बमन पूर्णपणे अस्थाना वाटत होते. त्यात बोमन इराणीचा थोडादेखील अंश शिल्लक नव्हता. राजकुमार हिरानी यांना तो लूक इतका आवडला की त्यांनी तोच लूक चित्रपटात वापरायचं ठरवलं आणि आपल्याला दोन्ही बाजूंनी थोडे थोडे केस आणि संपूर्ण डोक्यावर टक्कल असलेले दिल से नही दिमाग से सोचो म्हणत सतत प्रॅक्टिक्यालिटीचे धडे देणारे जे डॉट अस्थाना मिळाले.