
निलेश साबळे नाही तर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता करणार ‘Chala Hava Yeu Dya 2’ चे सूत्रसंचालन !
मराठी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या पर्वाबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. विशेषतः सुत्रसंचालक निलेश साबळे यांची अनुपस्थिती ही चर्चेचा केंद्रबिंदू ठरत होती. आणि त्याच्या जाएगी आता कोण? अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. अभिनेता अभिजीत खांडकेकर नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे.(Chala Hava Yeu Dya 2)

अभिजीत खांडकेकरने यापूर्वी अनेक पुरस्कार सोहळे, कथाबाह्य कार्यक्रम आणि रंगतदार सादरीकरणांमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आता तो एका सुपरहिट विनोदी कार्यक्रमाचं सूत्रधार म्हणून रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्याची निवेदनशैली आणि टायमिंग लक्षात घेता, विनोदी कार्यक्रमात त्याची उपस्थिती प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी नवीन देणारी ठरेल. या पर्वाच्या दिग्दर्शनाची सूत्रं यावेळी निलेश साबळेऐवजी प्रियदर्शन जाधव, अमोल पाटील आणि योगेश शिरसाट यांच्या हाती असणार आहेत. लेखक मंडळातही बरीच नावं नव्यानं झळकणार आहेत – प्रियदर्शन जाधव, योगेश शिरसाट यांच्यासोबत अभिषेक गावकर, रोहित कोतेकर, पूर्णानंद वांडेकर आणि अनिश गोरेगांवकर यांचाही सहभाग आहे.

कलाकारांमध्ये श्रेया बुगडे, कुशल बद्रिके आणि भरत गणेशपुरे यांच्यासोबत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे याची एन्ट्री झाली आहे. निलेश साबळे आणि भाऊ कदम हे या टिझरमध्ये दिसले नसल्यामुळे त्यांच्या सहभागाबाबत अद्यापही संभ्रम आहे, पण इतर काही लोकप्रिय चेहरे या पर्वात झळकणार असल्याचं निश्चित झालं आहे. दरम्यान, नव्या पर्वासाठी ऑडिशन्स सुरू असून, काही नवोदित चेहरेही या मंचावर झळकणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना नव्या आणि जुन्याच्या संगमातून एक ताजं हास्यरसिक पर्व पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
=============================
==============================
‘चला हवा येऊ द्या’ने गेली तब्बल १० वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यानंतर थोडक्याच विश्रांतीनंतरत्यांची तीच टीम ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या शोमधून कलर्स वाहिनीवर आला होता. मात्र कमी प्रतिसादामुळे तो शो थांबवण्यात आला. त्यामुळे आता ‘चला हवा येऊ द्या‘च्या पुनरागमनाकडं प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.