ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
चांदोबातील गोड गोष्टींची आठवण
‘ह.म.बने तु.म.बने’ मालिका
सोनी मराठीवरील ‘ह.म.बने तु.म.बने’ मालिका कशी वाटते मंडळी…मला तर ही मालिका बघतांना लहानपणी वाचलेल्या चांदोबा या गोष्टीच्या पुस्तकाची आठवण होते. एक छोटीशी गोष्ट…मग ती कुटुंबात फुलवायची…रुसवे, फुगवे, हट्ट, राग, भांडण, लाड सर्व या गोष्टीत होतात. गोष्टीच्या शेवटी एक संदेश असतो…मॉरल…गोष्टीचं सार…बस्स…फार लांबड नाही…याचा त्याचा द्वेष नाही…नसती लफडी नाहीत की भांडणं नाहीत…ही मालिक म्हणूनच पसंतीस पडत आहे..
सोनी मराठीवर सुरु झालेल्या ‘ह.म.बने तु.म.बने’ या कौटुंबिक मालिकेच्या या वेगळ्या धाटणीनं सर्वांना आपलंस केलं आहे. अगदी तुमच्या आमच्या जीवनातल्या गोष्टी…आता बघा ना, आपण रोज कुठे घरात कायम सजून धजून बसलेलो असतो…मोठ मोठे दागिने घालतो…नाही ना…साधेच असतोच…एखादा सण असेल तर ठिक आहे…हेच सूत्र या मालिकेमध्ये पकडले आहे. घरात तीन महिला…एकत्र गुण्यागोविंदाने नांदणा-या…दोन सूना..हिचं तिचं न करता…सख्या बहिणींसारख्या एकमेकींना जपणा-या…आणि त्यांची सासू…सूनांना तिचा खंबिर पाठिंबा. माझ्या सूना जे करतील ते बरोबर असेल, अशी तिची भूमिका. त्यातील मोठी सून अर्थात राणी गुणाजी नोकरी करणारी. अगदी आयटी कंपनीमध्ये कामाला दाखवली आहे.
त्यामुळे ती घरापासून दूर रहाते. तिच्या अनुपस्थित धाकटी सून म्हणजे आदिती सारंगधर तिच्या नव याची, मुलांची काळजी घेते…कुठलीही कटकट न करता. आपली मोठी जाऊ म्हणजे तिला बहिणीसारखी आहे. त्यामुळे तिच्या अनुपस्थितीत ती सासूचे कान भरण्याचा प्रयत्न करीत नाही…बरं ही धाकटी जाऊ सुद्धा डॅशिंग आहे. त्यांच्या सोसायटीचा कारभार ती बघते. आणि या दोघींच्या सासूंची काय बात…उज्ज्वला जोग यांनी हा आजीचा रोल परफेक्ट केला आहे. सुनांच्या कौतुकात त्यांचा दिवस जातो. बरं त्या स्वतः बसून रहात नाहीत..की ऑर्डर सोडत नाहीत…तर त्याही घरकामात सुनांना मदत करतात…विशेष म्हणजे त्यांची प्रायव्हसीही जपतात….यात सचिन देशपांडे आणि अजिंक्य जोशी हे दोघे मकरंद आणि मल्हार या मुलांच्या भूमिकेत आहेत. तर त्यांचे वडील अर्थात आबा म्हणून प्रदीप वेलंकर हे भूमिका साकारत आहेत. या बाप मुलांचं नात आपल्या सर्वांच्या घरात असतं तसंच आहे. दोन भाऊ, त्यांच्या खोड्यांनी त्रस्त झालेले बाबा….अगदी त्या मुलांची मुलं झाली तरी हे बाबा मुलांच्या खोड्यांनी त्रस्त आहेत. मग त्यांच्यात होणारी छोटे छोटे वाद…त्यातून मिळणारा संदेश… एकूण काय मोठ मोठ्या मालिका बघून कंटाळा आला असेल तर ‘ह.म.बने तु.म.बने’ उत्तम पर्याय आहे. मालिका बघतोय असं वाटतच नाही…आपल्या घरातच हे चालू आहे, एवढं सहज सोप्प…अगदी कलाकारांचे पोशाखही भारदस्त वगैरे नाहीत. जे तुम्ही आम्ही रोज घालतो तसेच कपडे…त्यामुळे ही मालिका अधिक आपलीशी वाटते…या सर्वांत भारी असतो तो या गोष्टीमधला संदेश…एकत्र कुटूंबाची गरज आहे हे मान्य…पण एकत्र कुटूंब ठेवण्यासाठी त्या कुटूंबातील सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. ते फक्त कुटूंबातील मोठ्या व्यक्तींचं काम नाही…तर त्यातील प्रत्येक सदस्याची ती मानसिकता हवी असते. आणि हेच या मालिकेतून समजते…
सई बने
फोटो आणि माहिती सौजन्य- सोनी मराठी, गुगल (Google)