
Chhabi Movie Trailer: अद्वैत मसूरकर दिग्दर्शित ‘छबी’ चित्रपटातून उघडणार फोटोचं गूढ !
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नवनवीन विषय हाताळणारे चित्रपट सातत्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच मालिकेत लवकरच एक गूढ आणि थरारक अनुभव देणारा ‘छबी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका फोटोग्राफरला आलेला अज्ञात अनुभव, त्यामागचं रहस्य आणि त्याचं खोलवर परिणाम करणं, हे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे.(Chhabi Movie Trailer)

फोटोग्राफी स्पर्धेसाठी एका तरुण फोटोग्राफरला काही फोटो पाठवायचे असतात. यासाठी तो निसर्गरम्य कोकणात जातो आणि तिथं एका मुलीचे फोटो घेतो. मात्र जेव्हा तो फोटो बघतो, तेव्हा त्याला त्या फोटोमध्ये एक मुलगी दिसते, पण प्रत्यक्षात इतर कुणालाच ती दिसत नाही! हा अनुभव त्याला हादरवून टाकतो. हळूहळू त्याला त्या मुलीबाबतचं गूढ जाणवायला लागतं आणि त्याचा शोध सुरू होतो. ती मुलगी कोण आहे? ती प्रत्यक्षात अस्तित्वात आहे की भूतकाळाचा कोणता अंश आहे? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं ‘छबी’ या रहस्यमय चित्रपटातून मिळणार आहेत.

केके फिल्म्स क्रिएशन आणि उप्स डिजिटल एंटरटेन्मेंट प्रस्तुत, छबी या चित्रपटाची निर्मिती जया तलक्षी छेडा यांनी केली आहे. अद्वैत मसूरकर यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. कलाकारांची फळी देखील अतिशय दमदार असून समीर धर्माधिकारी, मकरंद देशपांडे, शुभांगी गोखले, राजन भिसे, संजय कुलकर्णी, लीना पंडित यांसारखे अनुभवी कलाकार असून, नवोदित कलाकारांमध्ये ध्रुव छेडा, सृष्टी बाहेकर, अनघा अतुल, रोहित लाड, ज्ञानेश कदम यांच्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरणार आहेत.(Chhabi Movie Trailer)
===============================
===============================
चित्रपटातील संगीत रोहन-रोहन यांनी दिलं असून, गाणी मंगेश कांगणे व प्रशांत मडपूवार यांनी लिहिली आहेत. अभय जोधपूरकर यांचा स्वर यात प्रेक्षकांच्या मनात घर करेल. सिनेमॅटोग्राफर रोहन मडकईकर यांनी कोकणच्या निसर्ग सौंदर्याला भव्य पद्धतीने टिपले आहे. गूढ कथा, सुंदर छायाचित्रण आणि प्रभावी संगीत यांच्या साहाय्याने ‘छबी‘ एक वेगळा अनुभव देणारा चित्रपट ठरणार आहे. येत्या २५ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, रहस्य-थरार प्रेमींसाठी तो एक न चुकवण्याजोगा सिनेमा ठरेल.