मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
‘चोली के पीछे क्या है’ च्या रिमिक्सचा फसलेला खेळ
जुन्या गाण्यांचे कव्हर व्हर्जन (म्हणजे नवीन आवाज व अधिक वाद्याने जुने गाणे), रिमिक्स रुपडं (मूळ गाण्याची चाल बदलून, बोल अथवा मुखडा बिघडवून, वाद्यांची हवी तशी भर घालून गाणे.) असे ध्वनिफीतीच्या वाटचालीचे पुढचं पाऊल जुन्या गाण्यांचे नवीन रंगढंगातील रुपेरी पडद्यावरील रुपडं. ही संस्कृतीही एव्हाना रुळलीय, ऐंशी नव्वदच्या दशकातील अनेक हिंदी चित्रपट गीते आधुनिक तंत्रज्ञान व नवीन कलरफुल सादरीकरणाने आजच्या काही हिंदी चित्रपटातून दिसताहेत. पण पाहवत नाहीत हो. नवा तडका, चोली के पीछे क्या है या गाण्याचा.(Khal Nayak)
राजेश ए. कृष्णन दिग्दर्शित ‘क्रू’ ( २०२४) मध्ये मूळ गाण्याची चाल बदलून आणि फॅशनेबल सादरीकरणाने हे गाणे पुन्हा आपल्यासमोर आले आणि नवीन वादाला तोंड फुटले. चित्रपटात हवाई सुंदरीच्या रुपातील करिना कपूरने चेहर्याची आणि कपड्याच्या इस्त्रीची जराही घडी बिघडवून न देता हे गाणे सादर केलेय. पडद्यावर हे गाणे सुरु होताच यापेक्षा मोबाईलवर मूळ गाणे पहावेसे वाटते हे या रिमिक्सचे सर्वात मोठे अपयश. काय गरज होती या दिखाऊ रिमिक्सची असा प्रश्न मनात येणारच.(Khal Nayak)
सुभाष घई निर्मित व दिग्दर्शित ‘खलनायक’ (१९९३) सेटवर गेल्यापासून वादात सापडला. चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस संजय दत्त व माधुरी दीक्षित यांच्यात खास नातेसंबंध विणले गेले या खमंग गाॅसिप्सपासून याची सुरुवात झाली. चित्रपट पूर्ण होत असतानाच संजय दत्तला मुंबईतील बाॅम्बस्फोट प्रकरणात अटक झाली यापर्यंत केवढे वाद विवाद काही विचारुच नका. वादळच निर्माण झाले होते. अशातच या चित्रपटाच्या गाण्यांची ध्वनिफीत प्रकाशित झाली, आनंद बक्षी यांच्या गीतांना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत.
नायक नही खलनायक हू मै गाणे गाजू लागले, अशातच चोली के पीछे क्या है गाण्याचे वादळ निर्माण झाले. ते गाणे ऐकता ऐकता वाढले. अलका याज्ञिक व इला अरुण यांनी गायलेल्या या गाण्याचा मुखडा अश्लील आहे, त्यात डबल मिनिंग आहे अशा आरोपाची जबरदस्त राळ उठली. ते प्रामुख्याने मुद्रित माध्यमाचे दिवस होते आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर अशा गाण्यांवर जोरदार टीका होऊ लागली (याच काळात तेरी पॅन्ट भी सेक्सी वगैरे वाह्यात मुखड्याची गाणी आली नि टीकेला धार आली), देशभरातील काही राजकीय पक्ष तसेच सामाजिक सांस्कृतिक संघटनांनी या गाण्याला तीव्र विरोध दर्शवला.(Khal Nayak)
त्याच दिवसात या गाण्याचे गीतकार आनंद बक्षी यांच्या भेटीचा योग आला असता ते म्हणाले, या गाण्यात अश्लील असे काय आहे ? डबल मिनिंग कुठे आहे ? हे तर राजस्थानी लोकसंगीतावर आधारित चित्रपट गीत आहे. तिकडे लग्न व अन्य सोहळ्यात अशी अनेक गाणी गायली जातात. आता त्यात अश्लीलता आहे असे म्हणण्यापूर्वी मूळ गीतकारांशी संवाद तर साधा…(Khal Nayak)
एकीकडे असे या गाण्याच्या विरोधात वातावरण तर दुसरीकडे याच गाण्याचे अनेक शहरांत मोठ्या आकाराचे होर्डींग्स लावून जोरदार प्रमोशन सुरु होते. मला आठवतय, जुहूला केवळ या गाण्यातील माधुरी दीक्षित व नीना गुप्ता यांच्या पोझेसचे लावलेले भले मोठे होर्डींग्स लक्षवेधक ठरत होते. ध्वनिफीतीची विक्रमी विक्री होत असल्याच्या बातम्या येत होत्या. हे सगळेच घडत असतानाच पडद्यावर हे गाणे कसे दिसतेय अथवा त्याचे रुपेरी पडद्यावरील सादरीकरण कसे आहे (त्यात काही वाह्यातपणा तर नाही ना हा प्रश्न कायम होताच), सुभाष घई यावर फार काही बोलत नव्हता, त्याचे सगळे लक्ष चित्रपट कधी प्रदर्शित करता येईल याकडे होते. अशा प्रकारच्या वादांच्या वातावरणात आपण शक्यतो गप्प रहावे ही माधुरी दीक्षितची खुबी (व्यावसायिक चालाखी) यावेळीही दिसून येत होती. सुभाष घई ‘खलनायक’च्या काही ट्रायल आयोजित करीत होता पण ‘हे गाणे पडद्यावर कसे रंगलेय’ याची चर्चा होत नव्हती. (Khal Nayak)
‘खलनायक’ चे प्रदर्शन ठरले. मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांना परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओच्या मिनी थिएटरमध्ये या खेळाचे आयोजन ठरले. चित्रपट सुरु होताच सुभाष घईचा नेहमीचा मसाला दिसत होताच, अशातच राऊडी लूकमधील बल्लू ( संजय दत्त) आणि त्याच्या साथीदारांसमोर हे गीत नृत्य सुरु झाले, नृत्य दिग्दर्शिका सरोज खानने या गाण्यात कुठेही वाह्यातपणा येऊ दिला नव्हता. नृत्य हे माधुरी दीक्षितचे खास वैशिष्ट्य. गाण्याच्या स्वरुपानुसार नृत्याचे प्रेझेंटेशन ही तर तिची खास ओळख. एन. चंद्रा दिग्दर्शित ‘तेजाब ‘ ( १९८८) च्या एक दो तीन चार पाच…या धमाकेदार गाण्याचा मेहबूब स्टुडिओतील शूटिंगचा मी एन. चंद्रा यांच्या आमंत्रणावरुन लाईव्ह घेतलेला अनुभव आजही तेवढाच ताजा वाटतोय यात माधुरी दीक्षितच्या गुणवत्तेचे यश आहे…
==========
हे देखील वाचा : बबीता सोबत लग्न करण्यासाठी बांगलादेशमध्ये उपोषण ?
=========
‘खलनायक’ प्रदर्शित झाला (६ ऑगस्ट १९९३) आणि चोली के पीछे क्या है गाण्याचे पडद्यावरील नृत्य व दृश्य सौंदर्य पाहून रसिकांनी मनसोक्त दाद दिली आणि त्याच्या विरोधातील वादळ शमत गेले. चांगले काम हेच टीकाकारांना चोख उत्तर असते हेच खरे. आजही यू ट्यूबवर हे गाणे पाहताना अंगावर रोमांच उभे राहते. अशा गाण्याचे रिमिक्स कसे मनोरंजक असायला हवे ना ? त्यासाठी दिग्दर्शक सुभाष घई हवा, नायिका माधुरी दीक्षित हवी, नृत्य दिग्दर्शिका सरोज खान हवी. असे योग पुन्हा पुन्हा येत नाहीत. तीस वर्षांपूर्वीच ते शक्य होते.
रिमिक्स आले आणि इला अरुणने आपली नाराजी व्यक्त केली. ती जयपूरच्या दौऱ्यावर असतानाच एका जोडप्याने या रिमिक्सची तिला कल्पना दिली. आपण टी सिरीजच्या विरोधात नाही पण रिमिक्स करताना काही तारतम्य बाळगायला हवे तरच मूळ गाण्यासाठीच्या क्रिएटीव्हीची आणि मेहनतीची कदर राहिल असे तिने म्हटलयं…असे आतापर्यंत अनेक गाण्यांबद्दल म्हटले गेले. लता मंगेशकर यांनीही या रिमिक्स कल्चरबद्दल सतत नाराजी व्यक्त केली. पण म्हणून दर्जात काहीच फरक पडत नाही. रिमिक्स ही केवळ हौस मौज झालीय. त्यात मूळ गाण्याचा रंगढंग येणे शक्यच नाही…