
Chupke Chupke : निखळ मनोरंजन, खुसखुशीत विनोदाचा आस्वाद
बेगम इश्क का मजा ही चुपके चुपके से करने मे है
पती के गुण धीरे धीरे पता चलना चाहिए, उसे प्यार धीरे धीरे बढता है…
ऍक्टर क्या है… डायरेक्टर के हाथ की कठपुतली…
जितना बडा जिस्म है, उतना बडा दिल भी दिया है…
क्लायमॅक्स मे पहुंच कर ड्रामा की छुट्टी मत कराव…
गुलजार (Gulzar) यांच्या खुसखुशीत, चुरचुरीत, मार्मिक, मिश्किल संवादाने अनेक प्रसंग खुलत, रंगत रंगत ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित “चुपके चुपके” (Chupke Chupke) (मुंबईत प्रदर्शित ११ एप्रिल १९७५) निखळ मनोरंजन करतो, या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्ष पूर्ण होत असून आजही त्यातील प्रसंग आठवले तरी पटकन चेहर्यावर हास्य उमटते. (त्याचीच आज गरज आहे) एक स्वच्छ मनोरंजन चित्रपट हे या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य. अशा कलाकृती कधीच कालबाह्य होत नाहीत. ही मोठीच मिळकत.

हिंदी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील १९७५ हे अतिशय महत्वाचे वर्ष. हिंदीत एकाच वेळेस अनेक प्रकारचे चित्रपट पडद्यावर येतात याचे “प्रगती पुस्तक” या वर्षी अधिकाधिक प्रमाणात दिसले. माझे ते शालेय वय होते आणि गिरगावातील खोताची वाडीत राहत असल्याने दक्षिण मुंबईतील त्या काळात सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एक पडदा चित्रपटगृहातून “स्टाॅलचा पब्लिक” बनून हा विविधतेचा प्रभाव व प्रवास अनुभवत होतो.
सामना (पुणे शहरात १० जानेवारी १९७५), मुंबईत दीवार (२४ जानेवारी), आंधी (१४ फेब्रुवारी), प्रेम कहानी (७ मार्च), अमानुष व जमीर (२१ मार्च), ज्युली (१८ एप्रिल), धर्मात्मा व पांडू हवालदार (९ मे या एकाच शुक्रवारी), जय संतोषी मां (३० मे), खुशबू (२० जून), शोले व गरीबी हटावो (१५ ऑगस्ट या एकाच शुक्रवारी), निशांत (५ सप्टेंबर), प्रतिज्ञा (१९ डिसेंबर) वगैरे. आणि त्यात “चुपके चुपके”. (Chupke Chupke) कधीही कोणत्याही दृश्यापासून पहावा, तीच खुमारी. तीच रंगत. असे हलके फुलके मनोरंजन देणारे चित्रपट म्हणजे जणू जवळचे खास मित्रच. पुन्हा पुन्हा असे चित्रपट पहावेत व फ्रेश व्हावे. पन्नास वर्षांपूर्वी मुंबईत न्यू एक्सलसियर चित्रपटगृहात या चित्रपटाने शंभर दिवसांचे यश संपादन केले.

उपेंद्रनाथ गांगुली यांच्या “Chhadmabeshi” या बंगाली साहित्यवार आधारित छदूमवेश या बंगाली चित्रपटाची रिमेक म्हणजे “चुपके चुपके” (Chupke Chupke). गुलजार यांचे लेखन व ह्रषिकेश मुखर्जी यांचे दिग्दर्शन ही गोष्टच चित्रपटाचा क्लास स्पष्ट करते. चित्रपटाची निर्मिती ह्रषिकेश मुखर्जी व एन. सी. सिप्पी यांची आहे. त्यांनीच “आनंद” वगैरे अनेक चित्रपट निर्माण केले. “चुपके चुपके”चे छायाचित्रणकार जयवंत पाठारे आहेत. ह्रषिकेश मुखर्जी व जयवंत पाठारे हीदेखील एक दिग्दर्शक व छायाचित्रणकार अशी जमलेली जोडी. त्या काळातील चित्रपटांचे हेदेखील वैशिष्ट्य. (जयवंत पाठारे आमच्या गिरगावातील निकतवरी लेनचे रहिवाशी याचा आम्हाला केवढा अभिमान. )
“चुपके चुपके” (Chupke Chupke) च्या चित्रीकरणाचा खास किस्सा आहे. याचे बरेचसे चित्रीकरण निर्माते एन. सी. सिप्पी यांच्या जुहू येथील बंगल्यात झाले यातही एक विशेष उल्लेखनीय गोष्ट आहेच. याच बंगल्यात आनंद, नमक हराम, चुपके चुपके, सत्ते पे सत्ता या चित्रपटांचे चित्रीकरण झाल्याचा अमिताभ बच्चन यांनी गतवर्षी ब्लाॅग लिहिला. तोच बंगला Amitabh Bachchan नी खरेदी केल्यावर त्याचे नाव मनसा असे ठेवले होते. काही महिन्यांनी ते नाव बदलून जलसा असे ठेवले आणि आता मुंबईत असल्यावर प्रत्येक रविवारी अमिताभ याच बंगल्याबाहेर येत आपल्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्यांना आवर्जून दर्शन देतात. (याच बंगल्यात इन्कार इत्यादीचे चित्रीकरण झाल्याचेही दिग्दर्शक राज एन. सिप्पी यांनी एका भेटीत मला सांगितले.)
=================
हे देखील वाचा : Dada Kondke यांचे हिंदीतील पहिलेच पाऊल ज्युबिली हिट
=================
चुपके चुपके (Chupke Chupke) तुम्ही नक्कीच एन्जाॅय केला असणार. त्यामुळेच प्रोफेसर परिमल त्रिपाठी अर्थात प्यारे मोहन अलाहाबादी (धर्मेंद्र) आणि प्रोफेसर सुकुमार सिन्हा (अमिताभ बच्चन) यांची मजेशीर जुगलबंदी तुम्ही मनसोक्त मनमुराद अनुभवली आहेच. त्यात त्यांच्या पत्नी शर्मिला टागोर (धर्मेंद्रची) व जया बच्चन (अमिताभ) यांची साथ आहेच. याशिवाय ओम प्रकाश, उषा किरण, लीली चक्रवर्ती, असरानी (ह्रषिदांच्या चित्रपटातील तो जणू हुकमी), डेव्हिड, विशाल देसाई, नयना आपटे असे अनेक कलाकार याच रंजकतेत भर घालतात.
ह्रषिदांच्या चित्रपटातील गीत संगीत कायमच उल्लेखनीय. यात आनंद बक्षी यांच्या गीतांना सचिन देव बर्मन यांचे संगीत. चुपके चुपके चल रे (पार्श्वगायिका लता मंगेशकर), सारेगामा (मोहम्मद रफी व किशोरकुमार), बागों मे ये कैसे फूल खिलते है (लता मंगेशकर व मुकेश), अब के सजन (लता मंगेशकर) या गाण्यांचे रुपेरी पडद्यावरील सादरीकरण डोळ्यासमोर येतेच. येथेही दिग्दर्शक दिसतो.

Chupke Chupke या चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु होताना त्यात विनोद मेहरा, रेखा, रितेश कुमार, मौशमी चटर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत असे वृत्त होते. रितेश कुमार म्हणजे संगीतकार व पार्श्वगायक हेमंत कुमार यांचा मुलगा व मौशमी चटर्जीचा पती. पण ही केवळ बातमीच राहिली. धर्मेंद्र, शर्मिला टागोर, अमिताभ, जया यांनी ह्रषिकेश मुखर्जी यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटातून भूमिका साकारण्याचा तोपर्यंत अनुभव घेतला होता. विशेषत: जया बच्चनवर त्यांचा जास्त विश्वास हे सर्वज्ञात. खरं तर, चुपके चुपके पडद्यावर येईपर्यंत धर्मेंद्र ही मॅन (मै तेरा खून पी जाऊंगा) आणि अमिताभ बच्चन ॲन्ग्री यंग मॅन (कौन है वो माय का लाल) अशी इमेज झालेली. त्यांनी प्रासंगिक विनोद व शब्द चातुर्याची गंमत असे रसिकांसमोर आणणे व ते स्वीकारले जाणे हे विशेष उल्लेखनीय.
ह्रषिदांनी आपल्या दिग्दर्शन कारकिर्दीत केवढी तरी विविधता दाखवली आहे आणि त्यात एक विशेष गोष्ट, हलके फुलके मनोरंजन. त्यांच्या दिग्दर्शनातील बावर्ची, सबसे बडा सुख, चुपके चुपके, गोलमाल, खुबसुरत, नरम गरम, रंग बिरंगी, झूठ बोले कौवा कांटे हे चित्रपट त्या वळणाचे. अंधेरी कुर्ला रोडवरील मोहन स्टुडिओ ह्रषिदांचा अगदी खास.
=================
हे देखील वाचा : म्हणून Divya Bharti अस्खलित मराठी बोलायच्या…
=================
सत्तरच्या दशकातील आणखीन एक विशेष,
त्या दशकातील ह्रषिकेश मुखर्जी, गुलजार, बासू चटर्जी अशा दिग्दर्शकांचे अनेक चित्रपट तसेच बी. आर. चोप्रा दिग्दर्शित पती पत्नी और वो, रजत रक्षित दिग्दर्शित दामाद अशा अनेक स्वच्छ मनोरंजक चित्रपटांमुळे “सर्वांसाठी” (युनिव्हर्सल म्हणजे यू) व “फक्त प्रौढांसाठी” (ॲडल्स म्हणजे ए) याबरोबरच दर्जेदार (क्वालिटी म्हणजे क्यू) असेही प्रमाणपत्र देण्यात यावे अशीही बरीच चर्चा झाली. पण ती केवळ चर्चाच राहिली. म्हणून काय चित्रपटाचे महत्व कमी होत नाही.
“चुपके चुपके” (Chupke Chupke) मधीलच एक संवाद सांगायचा तर, जो है वो नही है…और जो नहीं है वो, वो कैसे हो सकता है.