Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Classic Movies :मोठ्या मुक्कामाला राहिलेले पाच हिंदी चित्रपट…
आजच्या कार्पोरेट युगात चित्रपटाचे यश किती कोटींची कमाई केली यात मोजले जाते. कधी कधी त्या उत्पन्नाचा आकडा इतका नि असा मोठा असतो की हा चित्रपट खरंच इतका मोठा होता का असा प्रश्न पडतो तर कधी आपण हाच चित्रपट पाह्यला गेलो तेव्हा जे काही मोजके चित्रपट रसिक होते ते तर एकमेकांपासून फार दूर बसले होते आणि जागा रिकाम्या असल्या तरी ते आता सवयीचे झाले आहे.
चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत अनेक वर्षे तरी रसिकांना चित्रपट आवडला रे आवडला की त्याने त्या काळातील एकपडदा चित्रपटगृहात अर्थात सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये अनेक आठवड्याचा मुक्काम हमखास केला म्हणून समजा. पंचवीस आठवड्याच्या मुक्काम म्हणजे रौप्य महोत्सवी यश, पन्नास आठवड्याचा मुक्काम म्हणजे सुवर्ण महोत्सवी यश, साठ आठवड्याचा मुक्काम म्हणजे हीरक महोत्सवी यश असे समीकरण असे आणि मग याच यशाची रात्री उशिरापर्यंत रंगणारी ओली पार्टी, त्यात स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात येणे. तीच स्मृती चिन्ह अनेक कलाकार आपल्या घरात, निर्माते व दिग्दर्शक आपल्या कार्यालयात व काही थिएटरवाले आपल्या चित्रपटगृहात ठेवत. त्यात एक प्रकारचा आनंद होता.
यशाच्या त्या संस्कृतीमधील चित्रपटगृहात बरेच आठवडे मुक्काम केलेले पाच हिंदी चित्रपट सांगायलाच हवेत. आश्चर्य वाटावे असे ते आकडे आहेत. आज सुपर हिट चित्रपट फार फार तर पाच सहा आठवड्यांचा मुक्काम करतो. याच कारण तो मल्टीप्लेक्स युगात एकाच वेळी अनेक खेळांसाठी प्रदर्शित होतोय. अगदी मुंबईत मिडनाईट मॅटीनी शोदेखिल असतो. म्हणजेच रात्री साडेअकरा वाजताचा खेळ. तो पहाटेला संपल्यावर घरी जाताना दूध आणि ब्रेड बटर घ्यायघे. मस्त ना? पूर्वी आम्हा चित्रपट रसिकांना रात्री नऊ वाजताचा वा साडेनऊ वाजताचा खेळ संपल्यावर बारा वाजल्यानंतर घरी कसे यायचे हा प्रश्न भेडसावत असे. त्याच काळातील हे मोठ्या मुक्कामाला राहिलेले पाच हिंदी चित्रपट.

================================
हे देखील वाचा : Agnipath ते ‘मुनवली’; अमिताभ अलिबागकर झाला…
================================
यश चोप्रा निर्मित, यशराज फिल्म्सचा आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेगे’ ( मुंबईत प्रदर्शित २० ऑक्टोबर १९९५) ने दक्षिण मुंबईतील न्यू एक्सलसियर चित्रपटगृहात दिवसा तीन खेळ याप्रमाणे पन्नास आठवड्याचा खणखणीत मुक्काम केल्यावर हा चित्रपट दक्षिण मध्य मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात मॅटीनी शोला शिफ्ट करण्यात आला आणि आजही तो सुरुच आहे. या निमित्ताने मी मराठा मंदिर चित्रपटगृहाला आवर्जून भेट दिली असता डोअर किपर मला सांगत होता, प्रत्येक खेळाला आजही किमान पंचवीस तीस प्रेक्षक असतातच. ऐकून बरं वाटलं. त्या सगळ्यांनी हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिला असेल आणि तरी ते पुन्हा एकदा चित्रपटगृहात येतात हे विशेष कौतुकास्पद. खरं तर अशाच रिपीट ऑडियन्समुळे चित्रपटाचा चित्रपटगृहातील मुक्काम वाढतो. पुन्हा एकदा पहावा असा आज एक तरी चित्रपट आपापल्या पाह्यला मिळतो का सांगा?

रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ ( १५ ऑगस्ट १९७५) पाच दहा वेळा झालेच पण पन्नास शंभर वेळा पाहणारे फिल्म दीवाने अगणित आहेत. इतकं त्या ‘शोले’ मध्ये पाहण्यासारखे काय आहे असाही एक प्रश्न विचारणारे आहेत. पण ते ऐकण्यासाठी कोणी वेळ घालवला नाही. मुंबईत मिनर्व्हा चित्रपटगृहात ‘शोले’ ने दिवसा तीन खेळ याप्रमाणे ३१ ऑगस्ट १९७८ पर्यंत खणखणीत मुक्काम केल्यावर हा चित्रपट तेथेच मॅटीनी शोला शिफ्ट करण्यात आला आणि आणखी दोन वर्षे चालला, असा एकूण पाच वर्षे या चित्रपटाने मुक्काम केला आणि त्यातून उठवलेला ठसा आजही कायम आहे. ‘शोले’ हा कधीच न संपणारा विषय आहे आणि हेदेखील एक यशच.

राजश्री प्रॉडक्शन निर्मित व सुरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन?’ (९ ऑगस्ट १९९४) रोजी मुंबईत एकमेव चित्रपटगृह लिबर्टीत वाढत्या तिकीट दरात प्रदर्शित झाला. ही तर लग्नाची व्हिडिओ कॅसेट असे म्हटले गेलेल्या या चित्रपटाने आपल्या देशातील लग्न संस्कृती बदलली. त्यातील विधी कायम ठेवले तरी त्यात झगमगाट आणि गीत संगीत आणि नृत्य आणले. लग्न महागडी होत गेली. या चित्रपटाने लिबर्टी चित्रपटगृहात दिवसा तीन खेळ याप्रमाणे तब्बल एकशेदोन आठवड्याचा मुक्काम केला. नव्वदच्या दशकात घराघरात उपग्रह वाहिन्या छान रुळल्या असताना असा दीर्घ मुक्काम करण्यात यश लाभले हे वैशिष्ट्यपूर्ण. चित्रपटाच्या यशापयशात काळाचाही संदर्भ महत्वाचा असतो.
गुलशन रॉय निर्मित आणि वितरीत व यश चोप्रा दिग्दर्शित त्रिमूर्ती फिल्मचा ‘दीवार’ (मुंबईत २४ जानेवारी १९७५) हा चित्रपट उत्तम बंदिस्त पटकथा असलेल्या चित्रपटातील एक आहे. चित्रपट माध्यम व व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा एक भाग म्हणून ‘दीवार’ चित्रपट पहावा. या चित्रपटाने मिनर्व्हा चित्रपटगृहात पंचवीस आठवड्याचा खणखणीत मुक्काम कधी केला हे समजलेच नाही इतका व असा या चित्रपटाच्या यशाचा वेग होता. मिनर्व्हा चित्रपटगृहातून ‘दीवार’ खेतवाडी कुंभारवाडा गिरगाव परिसरातील मोती चित्रपटगृहात दिवसा तीन खेळ याप्रमाणे शिफ्ट करण्यात आला आणि तेथेही चित्रपटाला घसघशीत प्रतिसाद मिळाला.
चित्रपटाचे निर्माते व वितरक गुलशन रॉय हे चित्रपट वितरण व्यवसायातील एकदम दादा माणूस. त्यांची Modern मुव्हीज ही चित्रपट वितरण संस्था होती. त्यांनी मोती चित्रपटगृहात पन्नासाव्या आठवड्यापर्यचा ‘दीवार’ चा प्रवास झाल्यावर ‘दीवार’ दक्षिण मुंबईतील लिबर्टी चित्रपटगृहात मॅटीनी शोला शिफ्ट केला, तरीही चित्रपटाची लोकप्रियता कायम. एकदा लोकप्रिय ठरलेला चित्रपट कायमच लोकप्रिय असतो. ‘दीवार’ ने लिबर्टी चित्रपटगृहात मॅटीनी शोला एकावन्न आठवड्यापासून सुरू केलेला यशस्वी प्रवास १०२ व्या आठवड्यापर्यत कायम होता आणि मग एका शानदार पार्टीत ” दीवार” शंभर आठवड्याच्या स्मृती चिन्हाच्या वितरणाचा सोहळा रंगला. ‘दीवार’ चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण झाली तरी तो आजचा चित्रपट वाटतो.

मनोजकुमारचा आपला एक प्रचंड मोठा चाहतावर्ग होता. ते टॉनिक असते हो कलाकारांसाठी. मनोजकुमार निर्मीत व दिग्दर्शित चित्रपटातून जनसामान्य प्रेक्षकांची देशभक्तीची भावना जागी केली हे मनोजकुमार निर्मित व दिग्दर्शित ‘उपकार’( १९६७) च्या यशाने झालेले शिक्कामोर्तब कायमच चर्चेत राहिले. मनोजकुमारला आस्थेने व प्रेमाने भारतकुमार म्हंटले गेले.चित्रपटाचे यश असे बरेच काही देत असते. मनोजकुमार दिग्दर्शित ‘रोटी कपडा और मकान’ (१९७४) हा ऑपेरा हाऊस चित्रपटगृहात नियमित तीन खेळ याप्रमाणे प्रदर्शित झाला आणि पहिल्याच खेळापासून सुपरहिट ठरला. आता पिक्चर सुपरहिट म्हणजे ज्युबिली नक्कीच. ऑपेरा हाऊस चित्रपटगृहात पन्नास आठवड्याचा खणखणीत मुक्काम झाल्यावर ‘रोटी कपडा और मकान’ नॉव्हेल्टी येथे मॅटीनी शोला शिफ्ट करण्यात आला….
================================
हे देखील वाचा : कल्पक आणि वेगळी दृष्टी असलेला Piyush Pandey!
================================
तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, हा चित्रपट नॉव्हेल्टी चित्रपटगृहात आणखी पन्नास आठवडे म्हणजे शंभराव्या आठवड्यापर्यत होता. एक लोकप्रिय चित्रपट असा दोन वर्षे चित्रपटगृहात मुक्काम करतो ही आज केवळ कल्पना वाटेल. पण चित्रपटाच्या सोनेरी रुपेरी चंदेरी दिवसात ती वस्तुस्थिती होती. आपल्या देशात चित्रपट रसिक आवडलेला चित्रपट असा काही डोक्यात फिट्ट करतात आणि डोक्यावर घेऊन दाद देतात की मग आठवडे मागे सरत राहतात. तसे दिवस आता पुन्हा येणे शक्य नाही आणि तसं यश लाभावे असे चित्रपट तरी पडद्यावर येतात का हाही प्रश्न आहेच म्हणा. आज अनेक चित्रपट आल्याचे समजते पण कधी गेले हे समजत नाही… पूर्वी चित्रपट फ्लॉप ठरला तरी गाजायचा.