किशोरच्या गाण्याचा भावस्पर्शी किस्सा: बडी सुनी सुनी है जिंदगी…
क्रेझ क्रेझ क्रेझ म्हणतात ती कितीही भन्नाट असू शकते…
पश्चिम उपनगरातील एका मल्टीप्लेक्समध्ये “पुष्पा २” (Pushpa 2) पाह्यला गेल्यावर एक भारी दृश्य दिसले. अल्लू अर्जुनच्या कटआउटसह सेल्फी, फोटो वा रिळ काढण्यासाठी चक्क रांग लागली होती. त्यात मी कधी उभा राहिलो हे मलाही समजले नाही. वांद्र्यातील बॅण्ड स्टॅन्ड येथील समुद्र किनाऱालगत एका पंचतारांकित हॉटेलमधील इव्हेन्टसला दिवसभरात कितीही वाजता गेलो वा आलो तरी शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर असेच सेल्फी वा रिळे काही करणारे अनेक पंखे हमखास दिसतात. (फॅनच हो. त्या नावाचा त्याचा चित्रपटही आला व गेलाही. मन्नत बंगल्याबाहेरच्या “फॅन्स”नी तो चित्रपट पाहिला असता तरी हिट झाला असता. त्यांना त्या चित्रपटापेक्षा मन्नत दर्शन सुखावणारे वाटले )
शाहरुख खानपेक्षा आज अल्लू अर्जुनची क्रेझ भारी आहे हे त्याच्या कटआउटसोबतचे फोटो सेशन आणि पिक्चर रंगात आल्यावर त्याच्या डायलॉगबाजीला मिळालेल्या मनसोक्त मनमुराद रिस्पॉन्सवरुन मला वाटते. रिपीट रनला तेच डायलॉग आता अल्लू अर्जुनसोबत पब्लिकही म्हणेल. पिक्चर म्हणाल तर खचाखच मसालेदार मनोरंजक इतकेच. अल्लू अर्जुन वन मॅन शो.
“पुष्पा २” (Pushpa 2) च्या क्रेझमध्ये पहाटेच्या खेळास हाऊसफुल्ल गर्दी यापासून हैदराबादला एक फॅन याच चित्रपटातील एका दृश्यात पुष्पा जसा भडक रंगलाय त्याच रुपात आल्याचा आणि तो अतिशय भारावून जात एका तेलगू चॅनेलला प्रतिक्रिया देत असतानाचा व्हिडिओ सोशल मिडियात पाहिला. तोही फोटो व्हायरल होतोय. अनेक ठिकाणचा पब्लिक हा चित्रपट संपल्यावर भरभरुन बोलतानाच्या बातम्या पाहताना जाणवले हा एक प्रकारचा हिस्टेरियाच आहे.
मूळ तेलगू भाषेतील हा चित्रपट हिंदी आणि दक्षिणेकडील कन्नड, तमिळ, मल्याळम या भाषेत डब करुन रिलीज झाला पण सगळीकडे एकच जबरा क्रेझ दिसली. म्हणजेच आजच्या ग्लोबल युगात भाषेची कुठेही आडकाठी येत नाही. पारंपरिक मसालेदार मनोरंजक चित्रपटात खचाखच मसाला असायला हवा इतकीच अपेक्षा आणि त्यात सध्या साऊथचा चित्रपट एकदम जोरात. इतका की त्याने हिंदी चित्रपटसृष्टीला स्पर्धेत मागे टाकल्याचे दिसतेय. मराठी चित्रपटही असाच मोठा होवू देत. तेवढी आपल्या कन्टेन वा थीममध्ये ताकद निश्चित आहे.
काळ कितीही बदलला, नवीन माध्यमे आली तरी आपल्या देशात क्रिकेट व चित्रपट यांची समाजाच्या सर्वच स्तरावर क्रेझ. खालच्या माणसापर्यंत या गोष्टी पोहचल्या आहेत. त्यात त्याना भरभरुन आनंद मिळतोय. (Pushpa 2)
चाहत्यांची क्रेझ हा अतिशय भन्नाट व अद्भुत प्रकार.
के. असिफ दिग्दर्शित ‘मुगल ए आझम‘ (१९६०) च्या पहिल्या आठवड्यातील आगाऊ तिकीट विक्रीसाठी मराठा मंदिर चित्रपटगृहावर पहाटेपासूनच प्रचंड मोठी रांग लागली आणि सकाळी नऊ वाजता तिकीट खिडकी उघडताना झालेल्या लठ्ठालठ्ठी वा झटापटीत एका प्रेक्षकाने चक्क चाकूने दुसर्यावर वार केल्याची गोष्ट कायमच सांगितली जाते. नवीन चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शोलाच पाहण्यासाठीच्या अति उत्साहात वा झपाटलेपणात हे घडलं. पूर्वी अनेक वर्ष थिएटरवर जावूनच सिनेमाचे तिकीट काढावे लागे. त्यात रांगेत उभे राहणे आलेच.
“शोले” च्या दिवसात मिनर्व्हा चित्रपटगृहावर जावे तर आगाऊ तिकीट विक्रीसाठी हमखास रांग लागल्याचे दिसे. पर्यायच नव्हता. जर असेल तर ब्लॅकवाल्याकडून चढ्या दरात तिकीट घेणे हाच होता. ते घ्यायचे पण चित्रपट पाहूनच घरी जायचे ही काहींची गरज होती, तर अनेकांची क्रेझ होती. ब्लॅक मार्केटमध्ये का होईना पण चित्रपट पाहूनच जायचं यातही शोलेचाच विक्रम. हादेखील नोंदला जावा. (Pushpa 2)
म्हटलं ना, आपल्या देशात चित्रपट माध्यम व व्यवसाय अफाट लोकप्रिय. राजेश खन्नाच्या सुपर स्टार झंझावाताच्या काळात आमच्या गिरगावात चक्क डिट्टो चार राजेश खन्ना होते. स्वतःची मूळ ओळख विसरुन त्यांनी चेहर्यापासून केसापर्यंत हुबेहुब असे स्वतःला राजेश खन्ना करुन घेतले होते. त्यांच्याकडेही चक्क पाहिलं जाई. ओरिजिनल राजेश खन्ना प्रत्यक्षात दिसणे अवघड निदान ड्युप्लीकेट तरी पाहू यात ही भावना. देशभरात असे किती डिट्टो राजेश खन्ना होते याचा शोध घ्यायला हवा होता. अंधेरी पश्चिमेकडील दोन नकली राजेश खन्नात ‘असली’ कोण यावरुन वाद झाला हा प्लाॅट लघुपटाला छान आहे.
===============
हे देखील वाचा : फक्त दोन हजार रुपयाचे तिकीटही हाऊसफुल्ल
===============
देव आनंदचेही असेच अनेक फॅन. देव आनंदच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबईत वरळीतील नेहरु सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यास माझे लक्ष अशाच अनेक देव आनंद फॅन्सकडे गेले. त्यांनी पाहण्यापासून चालण्यापर्यंत स्वतःमध्ये पुरेपूर देव आनंद सामावून घेतला होता. कलाकारांवर असे निस्सीम प्रेम ही एक वेगळीच बाजू. सगळ्याच कलाकारांचे असे अनेक प्रकारचे फॅन आहेत. ती त्या कलाकारांची सर्वात मोठीच मिळकत. पण तरीही या चाहत्यांनी संयम राखावा. (Pushpa 2)
मध्यंतरी उषा नाडकर्णी मला सांगत होत्या. कुटुंबातील एका लग्नात गेल्या असत्या. त्या जेवत असतानाच काही चाहते त्यांच्या खूपच जवळ जाऊन सेल्फीसाठी नको तितका आटापिटा करत होते. उषा नाडकर्णीना ते अगदीच असह्य झाले….
अशी क्रेझ नसावी ही या वेडाची दुसरी बाजू. त्यावर कधी तरी फोकस.