Rashmika Mandanna : लागोपाठ ५०० कोटींचे हिट चित्रपट देणारी ‘नॅशनल

Dada Kondke : “सोंगाड्या” चौपन्न वर्षांचा झाला हो!
“सोंगाड्या“
मराठी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील एक ट्रेण्ड सेटर चित्रपट. कितीही वेळा पहावा कधीही कंटाळा येत नाही की फाॅरवर्ड करावासा वाटत नाही. काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा पडद्यावरचा प्रभाव कायम राहतो, चित्रपट रसिकांच्या किमान तीन चार पिढ्या ओलांडूनही ते काहीना काही कारणास्तव चर्चेत असतात.
दादा कोंडके (Dada Kondke) नावाचे नवीन पर्व सुरु झालेला “सोंगाड्या” हा विनोद, गीत संगीत व नृत्य यांनी छान रंगलेला चित्रपटही अगदी तसाच. पुणे शहरातील भानुविलास चित्रपटगृहात १२ मार्च १९७१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. (ही तारीख दादा कोंडके यांच्या चित्रपटाची वितरण व्यवस्था पाहणारे विजय कोंडके यांनी दिली. कामाक्षी चित्र अशी त्यांची चित्रपट वितरण संस्था होती.)
गबाळा वेष. ढगाळ हाफ पॅन्ट. सदराही मापाचाच असावा का असा प्रश्न. काही तरी हरवल्यासारखी अथवा अचानक काही गवसल्यासारखी नजर. (नजर ही अभिनयातील अतिशय महत्वाची गोष्ट) भाषा अगदी गावरान. दिसायला तसा येरा गबाळा असला तरी मनाने सच्चा, भाबडा, निरागस. म्हणूनच जास्त जवळचा. सांगायचं तर गावाकडचा एक वेडाबागडा, भोळाभाबडा तरुण. मराठी चित्रपटाच्या इतिहासात ग्रामीण भागातील गोष्ट कायमच महत्वाची. तेथील सामाजिक सांस्कृतिक राजकीय जीवन मराठी चित्रपटाच्या पडद्यावर मोठ्याच प्रमाणावर आल्या, येत आहेत. (Untold stories)

अशातच ‘सोंगाड्या’ बघता बघता, त्यावर लिहीता बोलता, सांगता सांगता चक्क चौपन्न वर्षांचा झालीदेखील. तो आठवला तरी हसे फुटते तर मग आणखीन काय हवे? अनेक विनोदी चित्रपटांची तीच तर खासियत आहेत. मा. विनायक अभिनीत दिग्दर्शित “ब्रह्मचारी” (१९३८) पासून सचिन पिळगांवकर अभिनीत व दिग्दर्शित “अशी ही बनवाबनवी” (१९८८) पर्यंत आणि दत्ता माने दिग्दर्शित “वाट चुकलेले नवरे” पासून समीर पाटील दिग्दर्शित पोस्टर “बाॅईज” (२०१३) पर्यंत केवढे तरी. (याची हिंदी रिमेक रंगली नाही. त्यात तृप्ती डिमरीची भूमिका होती हे “ॲनिमल” सुपरहिट झाल्यावर लक्षात आले.)
‘सोंगाड्या‘ म्हटलं की, दादा कोंडके यांच्या उपदव्यापी, धसमुसळ्या रुपडासह तो अख्खा धमाल पिक्चर गीत संगीत नृत्यासह डोळ्यासमोर येतोच. सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एक पडदा चित्रपटगृह ते ओटीटी (व्हाया गल्ली चित्रपट, रिपीट रन) असा या काळात पब्लिकपर्यंत पिक्चर पोहचण्याच्या पध्दतीने बदलता प्रवास करताना रसिकांच्या पिढ्या बदलल्या तरी ‘सोंगाड्या’ची हवा कायम आणि तेच तर महत्वाचे असते. मुद्रित माध्यमापासून डिजिटल मिडियापर्यंत “सोंगाड्या” बद्दल सतत काहीतरी येते आहेच. अनेक भाषेतील अनेक चित्रपट पिक्चर हिट/ सुपर हिट होतात. अनेक पडद्यावर येताच पडतातही. सुपरहिट ‘सोंगाड्या’ची एकूणच ‘स्टोरी’ वेगळीच.

मराठी चित्रपटाच्या खणखणीत इतिहासातील सर्वोत्तम दहा यशस्वी चित्रपटात ‘सोंगाड्या‘चा उल्लेख होतोच ही तर केवढी मिळकत आणि या निवडीवर मतभिन्नता होणार नाहीच. याच्या निर्मितीमागची गोष्ट विलक्षण रंजक. प्रत्येक पिक्चरच्या जन्माच्या कळा वेगळ्याच असतात आणि पिक्चर पडद्यावर कसे येईल हेही अनेकदा सांगता येत नाही. ‘विच्छा माझी पुरी करा‘ या वगनाट्यामुळे शाहीर दादा कोंडके (Dada Kondke) हे नाव महाराष्ट्राच्या मोठ्या शहरांपासून खेड्यापाड्यात खालच्या माणसापर्यंत पोहचले होते. तात्कालिक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घटनांवर दादा कोंडके अतिशय मार्मिक, मिश्किल कोटी करीत स्टेजवर धमाल उडवत. त्याचे किस्से झाले. त्यांचा हजरजबाबीपणा विलक्षण होता. तो अंगभूत होता, त्यांच्या मूळ स्वभावाशी सुसंगत होता. ही विनोदी टिप्पणी या वगनाट्याचे आणि दादा कोंडके यांचे खास वैशिष्ट्य होते.
अशातच निर्माता आणि दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी आपल्या ‘तांबडी माती’ (१९६९) या चित्रपटात दादा कोंडके यांना संधी देऊन मराठी चित्रपटाच्या विश्वात आणले. त्यात आशा काळे यांची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटाला व्यावसायिक यश लाभले नाही आणि दुसरं म्हणजे दादा कोंडके (Dada Kondke) यांचा चित्रपट या माध्यम व व्यवसायाकडे अजिबात ओढा नव्हता. ते आपलं माध्यम नाही, कॅमेरा आपल्याला जखडून टाकतो असेच ते मानत. रंगभूमीवर आपण ज्या पध्दतीने मोकळ्या ढाकळ्या पध्दतीने वावरतो, टायमिंग साधतो, लाईव्ह परफाॅर्म देतो. ते कॅमेराच्या चौकटीत जमणे शक्य नाही, आपण जखडून जावू अशी दादा कोंडके यांना भीती वाटत होती.

चित्रपट या चित्रचौकटीची त्यांना ओळख नव्हती. त्यामुळे त्यांनी ‘विच्छा माझी पुरी करा’ मधून मिळत असलेल्या पैशातून गिरणगावात अर्थात मध्य मुंबईतील लालबाग, काळा चौकी, परळ विभागात खाणावळ टाकावी असा एखाद्या मध्यमवर्गीय पारंपरिक मराठी माणसाप्रमाणेच एक विचार भालजी पेंढारकर यांच्यापुढे व्यक्त केला. पण चित्रपट क्षेत्रावर मनस्वी प्रेम असलेल्या भालजींना हे पटणे अजिबात शक्य नव्हतेच. त्यांनी दादा कोंडके (Dada Kondke) यांना सांगितलं, ‘कलेच्या माध्यमातून मिळालेला पैसा कलेच्या क्षेत्रातच गुंतवा’. दादा कोंडके यांना भालजींचा सल्ला नाकारता येणे शक्यच नव्हते. तशी हिम्मत नव्हती असंही म्हणता येईल.
त्यांनी सदिच्छा चित्र ही आपली चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली आणि आपल्याच “विच्छा माझी पुरी करा”मधील सहकारी साहित्यिक वसंत सबनीस यांना चित्रपट लिहायला सांगितले. आता दादा कोंडके (Dada Kondke) ‘नायक’ साकारणार म्हणजे कथेचा बाजही त्यांच्या लवचिक ढसमुसळ्या शैलीला साजेसा हवा होता. वसंत सबनीस यांनी दादांच्या सगळ्या गोष्टींचा, शैलाचा, भाषेचा, उत्फूर्तपणाचा आणि मर्यादांचा विचार केला आणि ‘सोंगाड्या’ची कथा पटकथा संवाद लिहिले. ग्रामीण चित्रपटाची निर्मिती करायची हे अगोदरच ठरले होते. ती मराठीतील परंपरा होता. तसा ‘फोकस’ ठेवूनच सगळ्या गोष्टी घडत गेल्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांच्याकडे सोपवले. त्या सुमारास त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कथेवरून ‘मुरळी मल्हारी रायाची’ हा तमाशापट दिग्दर्शित केला होता. त्यांचा तोच अनुभव उपयोगात येईल अशाच हेतूने त्यांच्याकडे ‘सोंगाड्या’चे दिग्दर्शन सोपवले.
===============
हे देखील वाचा : Prem Kahani : प्रेम कहानी मे एक लडका होता है एक लडकी होती है
===============
नायिका म्हणून उषा चव्हाणला संधी मिळाली. तिला एका मोठ्या ब्रेकची गरज होती. तोपर्यंत तिने काही चित्रपटात काम केले तरी तिला ओळख मिळत नव्हती. तिला एका सुपरहिट पिक्चरची गरज होती. तशी ती प्रत्येक कलाकाराला असतेच. नृत्यात ती विलक्षण पारंगत होतीच. ‘सोंगाड्या’च्या मित्राच्या भूमिकेत निळू फुले यांची निवड होणे अगदी स्वाभाविक होतेच. दादा कोंडके आणि निळू फुले हे तत्पूर्वी राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात एकत्र होतेच आणि दादा कोंडके यांचा पहिलाच चित्रपट असल्याने निळू फुले यांचा सहभाग अपेक्षित होताच. दादा कोंडके (Dada Kondke) नायक तर निळू फुले त्यांचा मित्र अशा एकमेकांना पूरक भूमिकानी ‘सोंगाड्या’मध्ये एक समतोल राखण्यासाठी तशी पात्र रचना करण्यात आली. निळू फुले यांच्या व्यक्तिरेखेचे स्वतंत्र अस्तित्व राखून दादा कोंडके यांच्या ‘सोंगाड्या’ नायकाला आवश्यक अशी उर्जा, स्कोप द्यायचे अशी मांडणी केली. पण असे असले तरी चित्रपट निर्मितीला पैसा हवा. नुसता उत्साह उपयोगाचा नसतो. (तेच नेमके आजही अनेकांच्या लक्षात येत नाही.)

या चित्रपटाच्या निर्मितीत जस जसे दादा कोंडके आणि त्यांचे युनिट पुढे जाऊ लागले तस तसा वाढता खर्चही लक्षात येत गेला. कागदावरचे आर्थिक गणित शूटिंग करता करता बिघडत जाते. हे सर्वकालीन वास्तव फार विचित्र असते. पुढचे पाऊल तर टाकलेले असते आणि माघार घेता येत नाही. सगळा चित्रपट कोल्हापूरला जयप्रभा स्टुडिओ आणि आजूबाजूच्या परिसरात चित्रीत करायचे ठरवले होतेच. विच्छा माझी पुरी कराच्या प्रयोगांतून मिळणारे पैसे या चित्रपटाच्या निर्मितीसाठी वापरले जाऊ लागले. तोच एक आर्थिक स्रोत होता. ही एक प्रकारची ओढाताण होती. ते अनुभव काही वेगळेच असतात.
असे करत करत ‘सोंगाड्या’ची ६५ हजार रुपयांत निर्मिती झाली. चौपन्न वर्षांपूर्वी ही रक्कम फार मोठी होती. काही हजारात त्या काळात कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट मराठी चित्रपट निर्माण होत. ते हजार खूपच मोठी रक्कम होती. आज मराठी चित्रपट निर्मितीच्या वाढत्या बजेटने किमान आठ दहा कोटींचा आकडा गाठलाय. आजच्या आर्थिक स्थितीनुसार तो योग्य म्हणायचा का?
“सोंगाड्या” पूर्ण तर झाला, पण त्याला वितरकच मिळेना. चित्रपट २४ फेब्रुवारी १९७१ रोजी सेन्सॉर संमत करण्यात आला. त्या काळात मराठी चित्रपटाचा निर्माताच वितरक बनत असे अथवा तोच एक मार्ग होता. तरी दादा कोंडके यांनी त्या काळातील हिंदी चित्रपटसृष्टीतील दादा वितरक गुलशन राॅय यांच्यासाठी या चित्रपटाची ट्रायल ठेवली. हा किस्सा खूपच गाजला. त्यांनी फक्त ३५ हजार रुपयांत वितरण हक्क मागितल्यावर दादा कोंडके (Dada Kondke) यांनी निर्णय घेतला की आपला चित्रपट आपणच रिलीज करु. परिस्थिती माणसाला शिकवते ती ही अशी. चित्रपट माध्यम व व्यवसायात प्रत्येक पावलावर नवीन गोष्टी शिकता येतात.
=============
हे देखील वाचा : Mumbai theatres : पूर्वी महिला प्रेक्षकांसाठी स्वतंत्र रांग असे….
=============
त्या काळात मराठी चित्रपट निर्माता आपल्या चित्रपटाच्या जेमतेम चारच प्रिन्ट काढू शकत होता आणि तीच रिळे तो एका शहरातून इतरत्र प्रदर्शित करायचा. त्यातून त्या काही महिन्यांनंतर ग्रामीण भागात पोहचत. तेथे टूरिंग टाॅकीज, तंबू थिएटर असा प्रवास सुरु राही. त्यात वावगं काही नव्हतेच. तीच तर पध्दत होती. दादा कोंडके (Dada Kondke) यांनी कामाक्षी चित्र ही आपली चित्रपट वितरण संस्था स्थापन केली आणि पुणे शहरात भानुविलास चित्रपटगृहात १२ मार्च रोजी तर काही आठवड्यांनी मुंबईत २८ मे १९७१ रोजी कोहिनूर टाॅकीज येथे ‘सोंगाड्या’ रिलीज केला.
‘सोंगाड्या’ दादा कोंडके (Dada Kondke) यांचे हाफपॅन्टमधील भोळे भाबडे रुप, त्यांचा अतिशय साधेपणा, आपल्या आयेशी अर्थात आईशी असलेले विलक्षण जिव्हाळ्याचे नाते, नायिका उषा चव्हाणसोबत पडद्यावर उडवलेली धमाल आणि लोकप्रिय गीत संगीत व नृत्य यामुळे हा चित्रपट अक्षरशः धुंवाधार सुपर हिट झाला. प्रत्येक शो हाऊसफुल्ल गर्दीत दणक्यात रंगू लागला. अशातच मुंबईत दोन आठवडे कधी सरले हे समजलेच नाही आणि पूर्वकरारानुसार दादरच्या कोहिनूर टाॅकीजच्या मालकाने हा चित्रपट उतरवून ११ जून रोजी विजय आनंद दिग्दर्शित नवकेतन फिल्मचा ‘तेरे मेरे सपने‘ रिलीज करायचे ठरवले.

हे पाहून दादा कोंडके (Dada Kondke) निराश होऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री बंगल्यावर गेले. मराठी चित्रपटावर अन्याय होतो आहे बाळासाहेबांना सहन होणे शक्यच नव्हते. त्यांनी तडक आदेश दिला, कोहिनूर टाॅकीजवर ‘तेरे मेरे सपने’ रिलीज होता कामा नये, ‘सोंगाड्या’च कायम राहिल. शिवसैनिकांनी कोहिनूर टाॅकीजला जबरदस्त गराडा घालून जोरदार आंदोलन केले आणि ‘तेरे मेरे सपने’ची सगळी पोस्टर, होर्डिंग्स फाडली आणि ‘सोंगाड्या’चे प्रदर्शन पुढे कायम ठेवण्यास भाग पाडलं. ही बातमी त्या काळातील मराठी वृत्तपत्रांतून पहिल्याच पानावर प्रसिद्ध झाली आणि आजही या गोष्टीची चर्चा होते. सोंगाड्याचा विषय निघताच हा किस्सा हुकमी झाला आहे. भानुविलास चित्रपटगृहात बत्तीस आठवडे तर मुंबईत कोहिनूर टाॅकीजमध्ये ‘सोंगाड्या’ने तब्बल पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला आणि दादा कोंडके पर्व सुरू झाले ते जणू कायमचेच. हे कोहिनूर टाॅकीज म्हणजे आजचे नक्षत्र थिएटर होय.
‘सोंगाड्या’चे कथासूत्र छोटेसेच आहे. पण विनोदाचे टायमिंग, काही भावपूर्ण प्रसंग यांच्या जोडीला गीत संगीत व नृत्य यांची रेलचेल यावर चित्रपट धमाल उडवत मनोरंजन करतो. या चित्रपटाला तमाशाची पाश्वभूमी असली तरी त्याचा बाज वेगळा होता. तोपर्यंतच्या तमाशापटापेक्षा हे वेगळेपण ठरले आणि नेमके तेच प्रेक्षकांना आवडले. कथेच्या केन्द्रस्थानी तमाशातील सोंगाड्या होता. सुरुवातीला त्याची खूपच थट्टा, टवाळी केली जाते पण आपले वागणे आणि गीत नृत्य कला या गुणांनी तो नायिका आणि तो तमाशाचा फड असे दोघांनाही जिंकतो. अतिशय भाबडा, निरागस, मनाने सच्चा, नीतीची आणि न्यायाची उपजतच जाण असलेला असा हा ग्रामीण नायक होता. दादा कोंडके यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि स्वानुभवाची बरीचशी जोड यात होती. त्यामुळे ते जास्तच खुलले. जोडीला सतत साथ देणारा मित्र होताच. तो निळू फुले यांनी रंगवला.
=============
हे देखील वाचा : khauff : “खौफ”ची पंचवीशी
=============
तसे पाहिले तर जवळपास हा रंगभूमीवरील एक प्रकारचा तमाशाच सिनेमाच्या पडद्यावर साकारला आहे. माध्यमात फरक होता. विनोदाचे टायमिंग विशेषतः हजरजबाबीपणा या चित्रपटाची गंमत ठरला. ग्रामीण जीवनातील निरागसता आणि त्यातून होणारी सहजसुंदर तितकीच निरागस विनोद निर्मिती हे ‘सोंगाड्या’च्या यशाचे वैशिष्ट्य ठरले आणि मग दादा कोंडके (Dada Kondke) यांनी तीच आपल्या गोष्टीची आणि चित्रपटाची चौकट सांभाळत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. तीन चार चित्रपटांतच ते द्वर्थी संवादात/ विनोदात रमले.
या चित्रपटात रत्नमाला यांनी दादा कोंडके (Dada Kondke) यांच्या आयेची भूमिका साकारली आणि मग त्यांचे हे नाते अनेक चित्रपटांत कायम राहिले. गणपत पाटील, गुलाब मोकाशी, संपत निकम, वसंत खेडेकर, भालचंद्र कुलकर्णी, दामोदर गायकवाड, मधु भोसले, शांता तांबे इत्यादीच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण अरविंद लाड यांचे तर संकलन एन. एस. वैद्य यांचे आहे. ‘सोंगाड्या’ची सगळीच गाणी खेड्यापाड्यात दूरवर प्रचंड लोकप्रिय झाली, सर्व सणात, लग्न सोहळ्यात लाऊडस्पीकर सतत लागत. त्याचा लोकसंगीताचा असलेला बाज झ्याक होता.
दादा कोंडके (Dada Kondke) मूळात कलापथकात घडल्याने जनसामान्यांना कशा पद्धतीची गाणी आवडतील याची त्यांना चांगली कल्पना होती आणि ते या चित्रपटाच्या गीत संगीताच्या पथ्यावर पडले. या चित्रपटाची गीते वसंत सबनीस, जगदीश खेबूडकर आणि खुद्द दादा कोंडके यांची आहेत तर त्यांना राम कदम यांचे संगीत आहे. त्यांनी प्रत्येक गाण्यात लोकसंगीताचा ठेका उत्तम पकडलाय. रात अशी बहरात राजसा, नको गडे ना रुसू, राया चला घोड्यावरती बसू, माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गं उभी, बिब घ्या बिब शिकेकाई, नाही कधी का तुम्हाला म्हटलं, राया मला पावसात नेऊ नका, असा मी काय केला गुन्हा गेला सोडूनी मजला कान्हा आणि काय ग सखू बोला दाजिबा या गाण्यांचा समावेश आहे.
यातील मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गं उभी आणि काय ग सखू बोला दाजिबा ही गाणी तर अधिकच लोकप्रिय ठरली आणि ती गाणी पाहण्यासाठी अनेक प्रेक्षकांनी पुन्हा पुन्हा थिएटरमध्ये जाणे पसंत केले. लोकप्रिय गाणी पिक्चरचा थिएटरमधला मुक्काम वाढवत आणि पब्लिकच्या टाळ्या शिट्ट्यांनी हीच गाणी एन्जाॅय केली जात. रेडिओ असो वा ऑर्केस्ट्रा सोंगाड्याच्या गाण्यांची चलती. गाण्याच्या पुस्तिकांचाही विलक्षण खप. किंमत फक्त एक आणा.
राज्य चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा आणि दिग्दर्शनाचा तिसरा क्रमांक मिळाला. या यशोगाथेला चक्क चौपन्न वर्ष झाली. मळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी… रावजी हात नका लावू पाहिल कुणी तरी