दादा कोंडके यांची हिंदीतील भन्नाट मुशाफिरी…
आपल्या चित्रपटातून उभ्या महाराष्ट्राला मनमुराद हसवत मनोरंजनाचा बूस्टर डोस देत दादा कोंडके (Dada Kondke) यांनी १९७१ ते १९९६ या पंचवीस वर्षांच्या कालखंडात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या दरम्यान दादा कोंडके यांनी स्वतः पंधरा मराठी चित्रपट निर्माण केले, तसेच भालजी पेंढारकर यांच्या दोन चित्रपटातून (तांबडी माती आणि गनिमी कावा) त्यांनी भूमिका केल्या, चार हिंदी चित्रपट केले तर दोन गुजराती चित्रपट केले. आपल्या पंचवीस वर्षाच्या चित्रपट कारकीर्दीमध्ये दादा कोंडके (Dada Kondke) यांनी एकूण २५ चित्रपटातून भूमिका साकारल्या. दादा कोंडके (Dada Kondke) यांना पब्लिकची नाडी जबरदस्त कळाली होती. त्यामुळे तथाकथित समीक्षक आणि चित्रपट धुरीणांच्या नाकावर टिच्चून दादा कोंडके आपल्या सिनेमाला यश मिळवत गेले. त्यांच्या सलग रौप्यमहोत्सवी चित्रपटाच्या यशाने त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले अशी लोणकढी थाप त्यांनीच पसरवली. अर्थात गिनीज बुकात नाव नोंदवलं नसलं तरी दादा कोंडके (Dada Kondke) यांच्या चित्रपटांना मिळालेला अफाट यश आजवर कुठल्याही निर्मात्याला मिळालं नाही ही सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आणि स्पष्ट गोष्ट आहे.
दादा कोंडके (Dada Kondke) यांच्यावर अनिता पाध्ये या लेखिकेने एकटा जीव नावाचे पुस्तक लिहिले आहे, त्यात दादांच्या सिनेमाच्या मेकिंगच्या भरपूर गमतीजमती आहेत तसेच ज्येष्ठ पत्रकार इसाक मुजावर यांनी देखील एका सोंगाड्याची बतावणी नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यात देखील दादाच्या इरसालपणाचे अनेक नमुने सांगितले आहेत. दादांवर ती एक पुस्तक अभय परांजपे यांनी देखील लिहिले होते, एकूणच दादा कोंडके हे बहुढंगी, बहुरंगी असे मराठमोळे व्यक्तिमत्व होते हे पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येतं. दादांच्या मराठी चित्रपटांबद्दल आपल्या सर्वांना भरपूर माहिती आहे परंतु दादांनी चार हिंदी आणि दोन गुजराती चित्रपट देखील केले होते याची फारशी माहिती मराठी प्रेक्षकांना नाही. दादा कोंडके (Dada Kondke) यांनी ‘राम राम गंगाराम’ (१९७७) या लोकप्रिय मराठी चित्रपटावरून ‘तेरे मेरे बीच मे’ हा चित्रपट १९८४ साली बनवला.
मुंबईमध्ये दादा कोंडके (Dada Kondke) यांचे मराठी चित्रपट तुफानी यशस्वी होत होते. यांच्या चित्रपटाला गुजराती आणि हिंदी भाषिक देखील गर्दी करत होते. त्यामुळे दादा कोंडके यांनी हिंदी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाचा नायक ते स्वतःच असणार होते. ज्या वेळी नायिकेचा शोध सुरू झाला त्यावेळी पहिल्यांदा ते अप्रोच झाले ड्रीम गर्ल हेमामालिनी कडे! हेमा मालिनी ने चित्रपट चित्रपटात काम करायला होकार दिला पण नायक म्हणून धर्मेंद्र पाहिजे असा हट्ट झाला. त्यामुळे दादांनी तिचा विचार सोडून दिला. त्याकाळी हिंदीत लोकप्रिय असणाऱ्या जयाप्रदा, माधवी यांना देखील दादांनी विचारले त्यांनी देखील नकार दिल्यानंतर शेवटी दादांनी आपला मोर्चा पुन्हा उषा चव्हाणकडे वळवला. उषा चव्हाण हिंदी भाषेमुळे काम करायला कचरत होती. परंतु दादांनी तिची समजूत काढली आणि ती तयार झाली. चित्रपटात अमजद खानची पण एन्ट्री झाली.(मूळ मराठी चित्रपटात ती भूमिका अशोक सराफ यांनी केली होती) अमजद खान यांनी दादांना चांगले कॉपरेट केले. आणि सिनेमा तयार झाला.
हा सिनेमा दादांना उत्तरेत प्रदर्शित करायचा होता त्यासाठी त्यांना तिथे डिस्ट्रीब्यूटर हवे होते. नाझ बिल्डिंग मधील एका डिस्ट्रीब्यूटरला दादांनी जेव्हा विचारले त्यावेळी तो कमल अमरोहीच्या ‘रजिया सुलतान’ या चित्रपटाचे वितरण करीत होता. दादांचा एकूण अवतार आणि चित्रपट पाहून त्यांना नकार दिला. शेवटी दादांनी स्वतःच हा चित्रपट डिस्ट्रीब्यूट करायचे ठरवले. काही महिन्यानंतर तोच डिस्ट्रीब्यूटर दादांकडे आला आणि डिस्ट्रीब्यूशन साठी तयार झाला. दादांनी त्याचा बदललेला अवतार पाहून विचारलं,” हे कसं घडलं?” तेंव्हा तो म्हणाला ‘रजिया सुलतान’ या सिनेमाच्या अपयशाने माझी अवस्था केली आहे! परंतु दादांनी स्वतः सिनेमा वितरित केला आणि उत्तरेच्या बेल्ट मध्ये त्याला चांगले यश मिळाले. अनिता पाध्ये यांनी लिहिलेल्या ‘एकटा जीव’ या पुस्तकात त्यांनी या सिनेमाच्या दिल्लीतील प्रदर्शनाची एक मनोरंजक एक आठवण सांगितली आहे. तिथे ‘तेरे मेरे बीच मे’ (१९८४) या चित्रपटाच्या पोस्टर्स वर दादा कोंडके (Dada Kondke) आणि उषा चव्हाण यांच्या हातात पिस्तूल दिले होते आणि अमजद खान च्या हातात कोयता दाखवला होता! दादाला फुल पॅन्ट मध्ये दाखवले होते. दादांनी विचारले ,” अरे, हा काय प्रकार ? असा पेहराव आमचा चित्रपटात नाही!” त्यावर तिथला वितरक म्हणाला,” जर असे पोस्टर छापले नाहीत तर कोणीही सिनेमा पाहायला येणार नाही लोकांना थेटर पर्यंत खेचून आणण्यासाठी अशी पोस्टर छापावी लागतात!” दादांनी कपाळाला हात लावला.
यानंतर दादांनी ‘अंधेरी रात मे दिया तेरे हाथ मे’(१९८६) हा चित्रपट निर्माण केला. दादांचे हे टायटल डबल मीनिंग चे होते त्यामुळे या सिनेमाच्या टायटल पासूनच तो सेन्सरच्या चक्रात अडकला. कारण त्यांना हे टायटल खूपच अश्लील वाटत होते. त्यावर दादांनी सफाई देताना दिया या शब्दातील ‘ऱ्हस्व’ आहे आणि त्याचा हिंदीतील अर्थ दिवा होतो असे सांगितले. आणि आपली सुटका करून घेतली! या चित्रपटात अमजद खान आणि मेहमूद या दोन कलाकारांना दादांनी घेतले होते. या चित्रपटात दादांची नायिका उषा चव्हाणच होती. या सिनेमाला देखील चांगले यश मिळाले. यानंतर दादांनी दक्षिणेकडील अभिनेत्री स्वप्ना हिला घेऊन ‘आगे की सोच’(१९८८) या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात सतीश शहा आणि शक्ती कपूर या दोन कलाकारांना घेतले होते. दादा कोंडके (Dada Kondke) यांचा ‘मुका घ्या मुका’ हा चित्रपट लोकप्रिय झाल्यानंतर याच कथानकावर दादांनी हिंदीत चित्रपट निर्माण करायचे ठरवले. या चित्रपटाचे आधीचे नाव होते ‘गुंगा बच्चा सबसे अच्छा’ त्यावर मनमोहन देसाई यांनी दादांना फोन करून ,”तुम्ही बालचित्रपट काढत आहात का?” असे विचारले होते. तेव्हा दादांनी या चित्रपटाचे नाव बदलून ‘खोल दे मेरी जुबान’(१९८९) हे ठेवले यात बंदिनी मिश्रा ही दादा कोंडके यांची नायिका होती.
=======
हे देखील वाचा : मनमोहन देसाई यांनी बदलला कुली सिनेमाचा क्लायमॅक्स
=======
दादा कोंडके (Dada Kondke) यांनी दोन गुजराती चित्रपटात देखील कामे केली. त्यापैकी एक चित्रपट होता ‘चंदू जमादार’ (१९७७) हा सिनेमा दादांच्या पांडू हवालदार चा गुजराती री मेक होता. हा चित्रपट हिंदीतील (नंतर ख्यातनाम दिग्दर्शक झालेले) मेहुल कुमार यांनी दिग्दर्शित केला. तर ‘राम राम गंगाराम’ चा गुजराती री मेक होता ‘राम राम आमथाराम’(१९७९). हा चित्रपट अरुण कर्नाटकी यांनी दिग्दर्शित केला होता. दोन्ही चित्रपटांची निर्मिती दादा कोंडके यांचे मित्र गजानन शिर्के यांनी केली होती. या दोन्ही चित्रपटांमध्ये दादांची नायिका लक्ष्मी छाया होती दोन्ही सिनेमांना रौप्यमहोत्सवी यश मिळाले होते!
दादा कोंडके (Dada Kondke) यांच्या या सिनेमांना नावे ठेवणारी त्या काळात जशी मंडळी होती तशी या काळात देखील आहेत. पण आजच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील विनोदाचा आणि भाषेचा दर्जा पाहता दादांचा विनोद खूप सोवळा होता असेच म्हणावे लागेल! दादांनी पंचवीस वर्ष मराठी सिनेमाला हिंदी सोबत टक्कर देत जिवंत ठेवले हे दादा कोंडके यांचे मोठे उपकारच आहेत!