लहानग्या Hrithik Roshan याने डान्स करून जितेंद्रची छुट्टी करून टाकली

दगडी चाळ २: एक रंजक दंतकथा
सामान्य माणसांना बऱ्याच व्यक्तिमत्त्वांबद्दल कुतूहल असतं. मग कोणी प्रसिद्ध खेळाडू, अभिनेता, राजकीय नेता किंवा कुख्यात गुंड, डॉन, भाई… काहीही म्हणा. पण हा डॉन कोणासाठी ‘देव’ असतो तर कोणासाठी ‘दानव’. ज्याचं त्यानं स्वानुभवावरून ठरवायचं असतं. मुंबईचे एकेकाळचे डॉन किंवा राजकीय व्यक्तिमत्व असलेलं एक नाव म्हणजे ‘अरुण गवळी’. या नावाची आजच्या तारखेलाही स्वतःच्या वलयाची ‘भीती’ किंवा ‘आदरयुक्त भीती’ जनसामान्यात किंवा तथाकथित इतर डॉन मंडळींच्या मनात आहे; हे नाकारता येणार नाही. (Dagadi Chawl 2 Movie Review)
या वलयांकित व्यक्तिमत्वांविषयी किंबहुना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी सर्वसामान्य माणसांना प्रचंड कुतूहल असतं. ही मंडळी कशी आहेत, ही मंडळी कसा विचार करतात याचं कुतूहल नेहमी सामान्य मनाला राहिलेलं असते. हेच हेरून सिनेनिर्माते (अरुण गवळी कुटुंबीयच), दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी काही वर्षांपूर्वी ‘दगडी चाळ’ ही दंतकथा सिनेमा रुपी पडद्यावर आणली. सिनेमाला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळाला.
दोन-तीन वर्षांपूवी या सिनेमांच्या दुसऱ्या पर्वाच देखील काम सुरु झालं. पण, करोना आणि लॉकडाऊनमुळे सिनेमा यायला काहीसा उशीर झाला. हाच तो ‘दगडी चाळ २’ सिनेमा पुन्हा एकदा त्या भायखळा मधील रंजक दगडी चाळची गोष्ट सांगण्यासाठी सिनेमागृहात आता सज्ज आहे. पहिल्या सिनेमांची आणि त्या चाळीच्या नावाची पुण्याई म्हणून प्रेक्षक पुन्हा एकदा या सिनेमाकडे नक्कीच वळेल. तत्पूर्वी ‘सिनेमारुपी’ ही ‘दगडी चाळ २’ कशी आहे? याचा हा केलेला उहापोह.

सिनेमांच्या सुरुवातीला आपण सादर करत असलेल्या सिनेमाची गोष्ट काल्पनिक आहे, असं दिग्दर्शक आधीच स्पष्ट करतो. परंतु, ही गोष्ट गुंफताना मुंबईतली प्रसिद्ध दगडीचाळ तो तिच्या नावासह उभी करतो. अपेक्षेनुसार सिनेमातल्या दगडी चाळीने आणि त्यातल्या डॉनने प्रेक्षकांच्या मनात कुतूहल वाढवण्याचं काम चोख बजावलं आहे. सोबतच आता स्थळ आणि व्यक्तिमत्व दोन्ही प्रत्यक्ष आयुष्यातील आहेत; म्हटल्यावर प्रेक्षक देखील सत्य घटनांशी त्याचा संदर्भ लागल्या वाचून राहणार नाही. आणि कदाचित हे या सिनेमांची ‘सॉफ्ट पॉवर’ नक्कीच असू शकते. कारण, सिनेमा या माध्यमांचा आपली गोष्ट सांगण्यासाठी कसा वापर केला जाऊ शकतो? हे प्रेक्षकांनी काही महिन्यांपूर्वी सिनेमागृहात आणि राज्याच्या राजकारणात उघड डोळ्यांनी पाहिले आहे.
ठाण्यातील वलयांकित व्यक्तिमत्वाची गोष्ट सिनेमांच्या मोठ्या पडद्यावर रेखाटना संधीचे साधलेला किंवा योगायोगाने झालेली राज्यातील उलथापालथ महाराष्ट्रातील प्रेक्षक अद्याप विसरलेला नसेल. त्यामुळे सिनेमाची ‘सॉफ्ट पॉवर’ काय करु शकते.. असा विचार ‘दगडी चाळ २’च्या निमित्तानं पुन्हा चर्चिला जाऊ शकतो. (Dagadi Chawl 2 Movie Review)
तसं पाहायला गेलं तर ‘दगडी चाळ २’ काही कोणाचा बायोपिक नाही. त्याचा नायक तर ‘सूर्या’ नामक एक तरुण आहे. सिनेमांच्या कथनाकाच्या पार्श्वभूमीत गोष्टीतला ताण वाढवण्यासाठी, ती अधिक रंजक करण्यासाठी ‘या’ डॉनचा कुशलतेने वापर लेखक दिग्दर्शकाने यावेळीही सिनेमात केला आहे. जो पहिल्या ‘दगडी चाळ’मध्ये देखील दिसला. तीच गोष्ट पुढे आता सिक्वलमध्ये सांगितली जात आहे. पण, ज्यांनी पहिला सिनेमा पाहिलेला नाही. त्यांनी थेट हा दुसरा सिनेमा पाहू शकता. आवश्यक संदर्भ दिग्दर्शकाने या सिनेमात योग्य ठिकाणी पेरले आहेत.
‘दगडी चाळ २’ आपलं मसालेदार मनोरंजन करतो. आता सिनेमात डॉन आहे, गुंडगिरी आहे. म्हणजे त्यात हिंसाचार आहेच; पण तरीही प्रेक्षकाला संपूर्ण कुटुंबासह हा सिनेमा पाहता येईल याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. पण, असं करत असताना कथा लेखक, पटकथाकार यांनी सिनेमांची आवश्यक गती संथ केलीय.

सिनेमाचा पूर्वार्ध काहीसा रटाळ भासतो. पात्रांची ओळख आणि परिस्थिती अधोरेखित करण्यात लेखकाने अधिकच स्क्रिनस्पेस घेतलाय. जो जुन्या प्रेक्षकांना अधिक कंटाळवाणा वाटू शकतो. परिणामी सिनेमांचा टेम्पो पूर्वार्धाच्या सुरुवातीचे काही वीस-तीस मिनिटं आवश्यक प्रभावी उंची पर्यंत पोहोचत नाही. पण, कथानक जसं मध्यावर येऊन ठेपतं; तेव्हा खऱ्या अर्थाने सिनेमाला सुरुवात होते. हीच रंजकता सिनेमांच्या शेवटापर्यंत दिग्दर्शकाने शिताफीने कायम ठेवली आहे. जो या सिनेमाचा प्लस पॉईंट आहे. पूर्वार्धात प्रेक्षकाला पडलेली प्रश्नांची उत्तर सिनेमांच्या उत्तरार्धात योग्य वेळीस मिळत जातात. त्यामुळे असं नक्कीच म्हणावं लागेल की पटकथा लेखकाने सिनेमाचा उत्तरार्ध चोख लिहिला आहे. आणि सिनेमा अपेक्षित उंजीच्या जवळ घेऊन जाण्याचं काम केलं आहे.
सिनेमांची कथा वरवर पाहिल्यास… दगडी चाळ मधील वास्तवास असलेल्या डॅडी (मकरंद देशपांडे) आणि सूर्या (अंकुश चौधरी) यांच्यातील द्वंद आहे. सूर्या आणि सोनल आपल्या लहान मुलासह मुंबई आणि दगडी चाळ सोडून आता अलिबागला आले आहेत. गुंडगिरीच्या विळख्यातून सूर्या आता सोनलच्या सांगण्यावरुन बाहेर पडलाय. दुसरीकडे मुंबईत; दगडी चाळ आणि तेथे असलेले डॅडी आता राजकारणी झाले आहेत. राजकारणातील वैऱ्यामुळे डॅडींना मारण्याचा प्रयत्न त्यांचे राजकीय शत्रू करत आहेत. या सगळ्या गडबडीत डॅडींच्या दोन महत्वाच्या माणसांचा खून होतो.
आता डॅडींवर देखील वार होणार म्हंटल्यावर मदतीसाठी सूर्याला बोलावणं धाडलं जातं. पण, चाळीपासून दूर गेलेला सूर्या पुन्हा चाळीत येण्यास नकार देतो. याच पार्श्वभूमीत सूर्या देखील त्याच्या जवळची एक व्यक्ती गमावतो. द्वेषाने पडलेला सूर्या मुंबई गाठतो. इकडूनच कथानक रंजक वळण घेते. आता पुढे सूर्या मुंबईत का येतो? का करतो? तो नेमका कोणाला मारण्यासाठी येतो? हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमाला पाहायला हवा. एक साधी सरळ पण अॅक्शनपॅक्ड गोष्ट दिग्दर्शक चंद्रकांत कणसे याने पडद्यावर मांडली आहे.

पहिल्या सिनेमात जे अभिनयाचे षटकार मकरंद देशपांडे यांनी ‘डॅडी’ हे व्यक्तिमत्व साकारताना लगावले होते. त्याची पुनरावृत्ती ‘दगडी चाळ २’मध्ये देखील तितक्याच शिताफीने होते. मकरंद यांनी ‘डॅडी’ची देहबोली, संवादफेक, नजर अफलातून आपल्या अभिनयात उतरवली आहे. यात त्यांचा आजवरचा अनुभव आणि संयम दोन्हीचे दर्शन होते.
अंकुशच्या ‘सूर्या’ने सिनेमात चारचाँद लावले आहेत. ‘हलवा पण डॅशिंग’ सूर्या आपलासा वाटतो. आपल्यातील एक सर्वसामान्य तरुणाला आपण पडद्यावर पाहतोय; असं वाटून जाते. यात स्वतः अभिनेता म्हणून अंकुश आणि दिग्दर्शक म्हणून चंद्रकांतचं देखील श्रेय आहे. त्याचबरोबरीने आपल्या वाट्याला आलेला सिनेमा अभिनेत्री पूजा सावंत हिने खुबीने रेखाटला आहे. तिच्या अभिनयातील आत्मीयता आणि प्रामाणिकपणा तिनं साकारलेल्या प्रत्येक सिन मध्ये दिसतो.
==============
हे ही वाचा: असे सुपरहिट चित्रपट जे आमिरने नाकारायला नको होते…
बॉलिवूडमधले बहुचर्चित चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी, तर काही चित्रपटांना अनपेक्षित यश
सिनेमाचे संवाद, पार्श्वसंगीत उत्तम. पण, यावेळी अमितराजची संगीतमय जादू सिनेमावर कमी पडली आहे. ‘धागा-धागा’ गाणं वगळल्यास इतर गाण्यांमध्ये फारसा जीव जाणवत नाही. तांत्रिक बाबीत देखील सिनेमा ठिकठिका आहे. त्यात फार आता उणिवा काढायला नको. तसा सिनेमारुपी ही दगडी चाळ भक्कम झाली असली आहे. त्यामुळे या चाळीत प्रेक्षकांनी जायला हरकत नाही.
सिनेमा : दगडी चाळ २
निर्माती : संगीता अहिर
दिग्दर्शक : चंद्रकांत कणसे
लेखन : मछिंद्र बुगडे, चंद्रकांत कणसे, संजय जमखंडी
कलाकार : मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी, पूजा सावंत, यतीन कारेकर
छायांकन : वासुदेव राणे
दर्जा : तीन स्टार