मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
केवळ त्याच्या ४५ मिनिटांचा अभिनय आणि डायलॉगसाठी लोकं दामिनी हा सिनेमा आजही पूर्ण बघतात.
“ये ढाई किलो का हाथ किसीपर पडता है ना तो आदमी उठता नहीं, उठ जाता है!” आपल्या लाडक्या सनी देओलचा हा खास डायलॉग कोणाला माहीत नसेल असा माणूस मिळणं म्हणजे कठीणच! पण तुम्हाला माहीत आहे का हा डायलॉग ज्या सिनेमातला आहे त्या सिनेमात सनी देओल हा मुख्य भूमिकेत नसून एका सहाय्य्यक भूमिकेत होता. असे खूप कमी सिनेमे आणि कमी हिरो आहेत ज्यांच्या सहाय्यक भूमिकेला लोकांनी इतकं डोक्यावर घेतलं! त्यापैकीच एक सनी देओलची दामिनी सिनेमातली गोविंद श्रीवास्तव!
सनी देओलच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याने जे सिनेमे केले ते एका बाजूला आणि त्याने राजकुमार संतोषी यांच्यासोबत केलेले सिनेमे एका बाजूला असं म्हंटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण संतोषी यांच्या सिनेमातला सनी देओल हा खूप वेगळाच असायचा. सामान्य माणसात सुद्धा अफाट ताकद असते हे संतोषी यांनी त्यांच्या सिनेमातून सनी च्या पात्राच्या माध्यमातून अगदी ठसठशीतपणे लोकांसमोर मांडलं! आणि हीच खरी जादू होती संतोषी आणि सनी या जोडीची. मग तो घायल असो, घातक असो किंवा दामिनी. या ३ सिनेमात लोकांसमोर आलेला सनी हा आजही कित्येकांना हवाहवासा वाटतो, आजही खुद्द सनी सुद्धा त्याच्या घायल नावाचा वापर करून पुन्हा नवीन साच्यात पदार्पण करतो तिथेच कळून चुकतं कि संतोषी यांनी उभी केलेली लेगसी काय कमालीची आहे ते!
हे हि वाचा : मुन्नाभाईचा सर्किट
घायल, घातक तर लोकांनी डोक्यावर घेतलेच, पण १९९३ साली आलेल्या राजकुमार संतोषी यांच्या दामिनी ने सगळेच रेकॉर्ड ब्रेक केले. आजही टेलिव्हिजन हा सिनेमा कधीही लागो आणि कुठूनही तो पाहायला सुरुवात केली तरी कंटाळा येणार नाही. प्रॉपर बॉलिवूडचा माल मसाला ठासून भरलेला असताना सुद्धा हा सिनेमा आजही प्रेक्षकांना खिळवून ठेवतो ते केवळ त्यातल्या लिखाणामुळे आणि अडीच तासाच्या सिनेमात केवळ ४५ मिनिटांचा रोल करणाऱ्या गोविंद श्रीवास्तव मुळे. होय दामिनी मध्ये मुख्य भूमिकेत मीनाक्षी शीषाद्री, ऋषी कपूर, परेश रावल, कुलभूषण खरबंदा, टिनू आनंद, रोहिणी हट्टंगडी, अमरीश पुरी अशी फौज असताना सुद्धा १ तास ४० मिनिटं होऊन गेल्यानंतर येणाऱ्या गोविंदने जी धमाल आणलीये ती आजही बघताना मजा येते!
खरंतर दामिनी हा सिनेमा सनी देओल येईपर्यंत तसा रटाळच वाटतो, पण जशी सनीच्या गोविंदची एंट्री होते तिथून लोकांमध्ये एक वेगळाच जोश संचारतो. अन्याय, गुन्हेगारी प्रवृत्ती, कपट या सगळ्या जंजाळातून दामिनीला वाचवायला जेंव्हा गोविंद येतो तेंव्हा तो ऋषी कपूरपेक्षा सर्वात मोठा हिरोच भासतो. दामिनीला वेडं ठरवून तिला तुरुंगात डांबण्याचे इमले मनात बांधणाऱ्या इंद्रजित चड्ढा (अमरीश पुरी) यांना जेंव्हा समजतं कि गोविंद दामिनीची केस घेऊन पुन्हा आपल्यासमोर कोर्टात उभा राहणार आहे तेंव्हा चड्ढा गोविंदला भेटायला जातो त्या सिन मधला सनीचा आवेश त्याची एनर्जी पाहून आजही हा सिनेमा टीव्हीवर सुद्धा बघताना तुम्ही स्वतःला टाळ्या किंवा शिट्ट्या मारण्यापासून रोखू शकत नाही!
चड्ढाचा माणूस जेंव्हा सुरा काढतो तेंव्हा थंड डोळ्यांनी “ऐसे खिलौने बाजार में बोहोत बिकते है, लेकिन इसे खेलने के लिए जो जिगरा चाहिए न वो किसी बाजार में नहीं बिकता, मर्द उसे लेकर पैदा होता है” या भाषेत समजावणाऱ्या गोविंदचे शब्द ऐकून तो सुरा पुन्हा आहे त्या ठिकाणी जाताना बघितल्यावर हे नक्की जाणवत कि सध्याच्या रिमेकच्या दुनियेत हे असे ढासू डायलॉग लिहिणारे फार कमी राहिले आहेत! हा सिन असो किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतला आजवरचा अजरामर सिन असो “तारीख पे तारीख” अशा कित्येक सीन्स मधून सनी ने त्याची एक वेगळीच जादू लोकांवर केली आणि दामिनी आजही लोकं केवळ सनी साठी आणि त्याच्या त्या डायलॉग साठी बघतात. त्याचा तो शेवटचा मोनोलॉग ऐकताना आजही आपल्या मुठी आपसूक आवळल्या जातात, आणि त्याची ती तळमळ पाहून आजही आपल्या नसानसांत एक वेगळंच रोमांच संचारतं!
अशा ह्या अडीच तासाच्या सिनेमात केवळ ४० ते ४५ मिनिटांचा रोल करून त्या रोल साठी आजही तो सिनेमा लोकांना पूर्ण बघायला भाग पडणाऱ्या सनी देओल पुढे आणि कित्येक अजरामर कथा डायलॉग लिहून ती पात्र लोकांच्या मनात खोलवर रुजवणाऱ्या राजकुमार संतोषी पुढे नतमस्तक व्हायलाच पाहिजे!