रविंद्रनाथ टागोर यांच्या कथेवरील दरबान……
रविंद्रनाथ टागोर यांच्या छोटे बाबू का वापस आना. या दर्जैदार कथेवर आधारीत असलेला दरबान हा चित्रपट लवकरच झी 5 वर प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक आणि निर्माता बिपीन नाडकर्णी यांच्या या पहिल्याच चित्रपटाचा प्रिमीअर शो 4 डिसेंबर रोजी झी 5 वर होत आहे.
दरबान हा चित्रपट मूळ बंगाली कथेवर आधारीत आहे. रविंद्रनाथ टागोर यांची छोटे बाबू का वापस आना. ही एक अत्यंत ह्दयस्पर्शी कथा आहे. या कथेवर या आधीही चित्रपट बनवण्यात आला आहे. 1918 मध्ये लिहिलेल्या या कथेवर 1960 मध्ये बंगालच्या अग्रदूत ग्रुपतर्फे मूळ कथेच्याच नावानं एक चित्रपट बनवण्यात आला होता. याशिवाय एपिक चॅनेलवरील स्टोरीज बाय रविंद्रनाथ टागोर या मालिकेतही या छोटे बाबू का वापस आना ही कथा दाखवण्यात आली आहे.
आता बिपीन नाडकर्णी पुन्हा या कथेच्या मोहात पडले असून दरबान नावानं ते चित्रपट ओटीटी फ्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आणत आहेत. रविंद्रनाथ टागोर यांच्या कथेवर हा चित्रपट असल्यानं त्याची पटकथा हे चित्रपटाचं पहिलं यश आहे. एक श्रीमंत मुलगा आणि त्याचा सांभाळ करणारा नोकर या दोघांचं नातं यात स्पष्ट करण्यात आलं आहे. एका कोळशाच्या खाणीच्या मालकाचा मुलगा, अनुकूल. अत्यंत श्रीमंत. त्याला सांभाळण्यासाठी असलेला नोकर म्हणजेच रायचरण. हा रायचरण अनुकूलचा लहानपणापासूनचा साथी. या दोघांचे स्वतंत्र असं विश्व आहे. दोघांमध्ये गरीब-श्रीमंत अशी दरी आहे. एक मालक तर दुसरा नोकर. पण तरीही या दोघांचा एकमेकांवर विश्वास असतो. पुढे अनुकूल मोठा होतो. त्याचे लग्न होते. त्याला मुलं होतात. या अनुकूलच्या मुलाची जबाबदारीही रायचरणवर येते. रायचरण या मुलाचाही सांभाळ करू लागतो. अशाचवेळी एक घटना होते, की ज्यामुळे रायचरण आणि अनुकूल यांच्यातील विश्वासाच्या नात्याला सुरुंग लागतो. रायचरणनं आपलं अवघं आयुष्य अनुकूलच्या कुटुंबासाठी दिलेलं असतं. तेच कुटूंब आता रायचरणवर अविश्वास व्यक्त करतं. अशी कुठली घटना होते हे मात्र दरबारमध्ये पहाण्यासारखं आहे.
बिपीन नाडकर्णी दिग्दर्शित दरबारमध्ये शरद केळकर हा अभिनेता अनुकूलच्या भूमिकेत आहे. तर शरीब हाशमी यांनी रायचरणची भूमिका केली आहे. स्लमडॉग मिलेनियर, जब तक है जान यासारख्या चित्रपटांमधून शरीब हाशमी यांच्या अभिनयाचं मान्यवरांनी कौतुक केलं आहे. द फॅमिली मॅन या वेबसिरीजमध्येही त्यांच्या अभिनयाची चर्चा झाली होती. आता दरबारमध्ये मुख्य भूमिका मिळाल्यानं हाशमी यांनी आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय फ्लोरा सैनी अनुकूलच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. रायचरण यांच्या पत्नीची भूमिका रसिका दुग्गलने केली आहे. याव्यतिरिक्त हर्ष छाया, सुनिता सेनगुप्ता यांच्याही भूमिका दरबान मध्ये आहेत. बिपीन नाडकर्णी यांचा दरबान हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. झी 5 वर हा चित्रपट प्रदर्शित होत असल्यानं त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. सध्या ओटीटी फ्लॅटफॉर्म अधिक प्रभावी आहे. या माध्यमातून घरापर्यंत पोहचता येतं. दरबानची कथा ही अत्यंत हद्यस्पर्शी असल्यानं सर्व कुटुंबानी पहाण्यासारखा हा चित्रपट आहे. अशा शब्दात नाडकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरबान यापूर्वी 3 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोविडमुळे या चित्रपटाचे प्रदर्शनही लांबले गेले. आता 4 डिसेंबर रोजी झी 5 वर येणारा दरबान त्याच्या दमदार स्क्रीप्टमुळे नक्कीच पहावा असाच आहे.