दिपिकाची दुसरी इनिंग!
हॉलिवूडपट ‘द इंटर्न’ (The Intern) या चित्रपटावर हिंदीमध्येही चित्रपट येतोय. या चित्रपटाची निर्मिती करतेय अभिनेत्री दिपिका पदुकोण. छपाक या चित्रपटामधून दिपिकानं निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. आता ‘द इंटर्न’ हा तिच्या निर्मितीमध्ये होणारा दुसरा चित्रपट. दोन वर्षापूर्वी दिपिकानं या चित्रपटाची घोषणा केली होती. यात तिच्यासोबत ऋषी कपूर यांची महत्त्वपू्र्ण भूमिका होती. मात्र त्यांच्या निधनानंतर ही भूमिका कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. आता या भूमिकेसाठी बीग बी, अर्थात अमिताभ बच्चन यांनी होकार दिला आहे. त्यामुळे द इंटर्नचे चित्रिकरण लवकरच सुरु होत असल्याची घोषणा दिपिकानं केली आहे.
दिपिकानं (Deepika Padukone) नुकताच द इंटर्नमधील तिचा आणि अमिताभ यांचा लूक जाहीर केला. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि दिपिका यांची केमिस्ट्री २०१५ मध्ये आलेल्या पिकू या चित्रपटातून प्रेक्षकांना चांगलीच भावली. शूजित सरकार दिग्दर्शित पिकूमध्ये अमिताभ आणि दिपिका बंगाली बाप लेकीच्या भूमिकेत होते. आता पुन्हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करता आल्यामुळे दिपिकानं आनंद व्यक्त केला आहे. मूळ हॉलिवूडमधील द इंटर्नचे दिग्दर्शन अमित आर शर्मा करीत आहेत. नैंसी मेअर्स दिग्दर्शित द इंटर्न हा चित्रपटही २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. यात रॉबर्ट डी नीरो आणि एन हैथवे या प्रसिद्ध हॉलिवूड कलाकारांनी काम केलं आहे. जगभरात जवळपास २०० मिलियन डॉलरचा गल्ला या चित्रपटानं गोळा केला होता.
एका सत्तर वर्षाच्या गृहस्थाची कथा यात आहे. पत्नीचे निधन झालेले रॉबर्ट चक्क एका फॅशन हाऊसमध्ये इंटर्न म्हणून काम करायला जातात. एकाकी जीवनाला कंटाळलेले रॉबर्ट या फॅशन हाऊसमध्ये काय धम्माल करतात हे पडद्यावर पहाण्यासारखे आहे. त्यांची बॉस म्हणून हेथवे ही तरुणी असते. या सर्व धामधुमीत रॉबर्ट आणि हेथवे यांच्यात अलगद नातं तयार होतं… अतिशय सुंदर कथा आणि तितकाच चांगला संदेश देणारा चित्रपट म्हणून द इंटर्नचा हॉलिवूडमध्ये उल्लेख केला जातो.
आता हाच चित्रपट हिंदीमध्ये येतोय. त्यात दिपिका सोबत आधी ऋषी कपूर दिसणार होते. पण त्यांच्या निधनानंतर ही भूमिका अमिताभ बच्चन यांच्याकडे आली आहे. पिकूमधील त्यांनी साकारलेल्या भास्कर बॅनर्जी या भूमिकेचे कौतुक झाले होते. त्यामुळेच द इंटर्नमधील रॉबर्टला अमिताभ बच्चन कशाप्रकारे रंगवतात याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. द इंटर्नवर कन्नडमध्येही चित्रपट झाला आहे. हॉट्टेगागी गेनु बट्टेगागी या नावानं हा कन्नडपट २०१८ मध्ये मोठ्या पडद्यावर आला होता. आणि बॉक्सऑफीसवर यशस्वी झाला होता. त्यामुळेच आता हिंदीमध्ये दिपिकाच्या निर्मिती खाली येणारा ‘द इंटर्न’ बॉक्स ऑफीसवर किती यशस्वी होतोय, याची चर्चा आहे.
‘छपाक’ या चित्रपटापासून दिपिकानं आपलं प्रोडक्शन हाऊस चालू केलं. आता द इंटर्न हा या प्रोडक्शन हाऊसचा दुसरा चित्रपट असेल. बॉलिवूडमधील या दुसऱ्या इनिंगमध्ये दिपिका किती यशस्वी होणार हे लवकरच स्पष्ट होईल.