महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ ‘अशोक मा.मा.’ च्या निमित्ताने छोटा पडदा
मराठी सिनेसृष्टीवर प्रेम करणारे दिलीप कुमार
खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे.….
सुलोचनादीदींची सविस्तर मुलाखत घेत असताना दिलीपकुमारचा विषय निघाला. दिलीपकुमारसोबत त्यानी एस. एच. रवैल दिग्दर्शित ‘संघर्ष’, मनोजकुमार दिग्दर्शित ‘क्रांती’ अशा काही चित्रपटात भूमिका साकारली. त्यावेळच्या अनुभवाबाबत त्या म्हणाल्या, दिलीपकुमार कधीही सकाळची शिफ्ट ठेवू द्यायचे नाहीत. दुपारी दोन ते रात्री दहा अशा शिफ्टमध्ये काम करण्यास प्राधान्य देत. इतकेच नव्हे तर एकाद्या दिवशी अतिशय महत्त्वाचा प्रसंग चित्रीत होत असेल तर रात्री दोन वाजेपर्यंतही ते शूटिंग करत. याबाबत त्याना एकदा विचारले असता ते म्हणाले.
उद्या फ्रेश होऊन हा प्रसंग मी केला असता तर अगोदर केलेल्या शॉटमध्ये फरक वाटला असता. सिनेमात प्रत्येक दृश्याची वेशभूषेपासून अभिनयापर्यंत कंटीन्यूटी असते. तीच जर सांभाळली गेली नाही तर त्या दृश्याच्या आविष्कारावर परिणाम होतो. तो प्रसंग जर संघर्षमय दृश्याचा असेल तर तो एका वेळीच पूर्ण करावा. दिलीपकुमारचे हे म्हणणं सुलोचनादीदीनी ऐकले तसेच ते कायम स्मरणात ठेवून अंमलातही आणले.
दिलीपकुमार आणि मराठी कलाकार यांच्या नात्याची ही गोष्ट आवर्जून सुरुवातीला सांगावीशी वाटली.
रुपेरी पडद्यावरील अष्टपैलूत्वासह दिलीपकुमारने कायमच आपले सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय भान जपले. आणि अशा वैशिष्ट्यांमुळे दिलीपकुमार अधिकाधिक प्रगल्भ आणि प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले.
हे देखील वाचा: बहुगुणसंपन्न असा हा अभिनयाचा राजा: दिलीप कुमार
दिलीप कुमारचे असेच एक खास वैशिष्ट्य म्हणजे, मराठीशी असलेले विविध स्तरांवरील नाते. आणि त्यातही विशेष म्हणजे, चांगले मराठी बोलणे. नव्वदच्या दशकात सायरा बानूने दूरदर्शनसाठी हिंदी चित्रपट गाण्यांवर एका मालिकेची निर्मिती केली असता दिलीपकुमारच्या वतीने त्यांच्या पाली हिलवरील बंगल्यावर मुंबईतील आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांसाठी एका गेटटुगेदरचे आयोजन करण्यात आले होते.
दिलीपकुमारच्या बंगल्यावर जायचा योग आला यातच आपले नशीब खुलले अशीच आम्हा महाराष्ट्रीय सिनेपत्रकारांची भावना झाली. प्रत्यक्ष बंगल्यातील प्रशस्तपणा, त्यातील दिलीपकुमार आणि सायरा बानू यांच्या भव्य तस्वीरी हे पाहूनच माझे मध्यमवर्गीय मन दबून गेले. विशेष म्हणजे, आम्हा महाराष्ट्रीय सिनेपत्रकारांशी ते आवर्जून मराठीत बोलले. दुसरे विशेष म्हणजे, त्यांची मेहमाननवाझी! आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा कसा अदबीने आणि उत्तम खाद्याने पाहुणचार करायचा हे दिलीपकुमारचे अतिशय खास वैशिष्ट्य (माझ्या या मताशी प्रदीप भिडे नक्कीच सहमत होतील).
विशेष म्हणजे, दिलीपकुमारला मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, नाटक, चित्रपट याबाबत नेहमीच विशेष प्रेम. मराठी चित्रपटाच्या संदर्भातील काही विशेष आठवणी सांगायलाच हव्यात. पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘एक फूल चार हाफ’ (१९९१) या मराठी चित्रपटाचे निगेटीव्ह कटिंग दिलीपकुमारच्या शुभ हस्ते झाले. चित्रपट माध्यम व्यवसायातील ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. या धमाल चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, सुलभा देशपांडे, भावना, सुधीर जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. किमी काटकर पाहुणी कलाकार आहे. रजनीकांतच्या हस्ते गोरेगावच्या फिल्मीस्तान स्टुडिओत या चित्रपटाचा मुहूर्त झाला.
दिलीपकुमार आणि मराठी फंडा याबाबत आणखीन एक विशेष गोष्ट आहे, राजकमल कलामंदिर (युथ विंग) च्या किरण शांताराम निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी ही बनवाबनवी’ (१९८८) च्या सुवर्ण महोत्सवी इव्हेन्टसला चित्रपती व्ही. शांताराम आणि दिलीपकुमारची विशेष उपस्थिती होती. जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेल मध्ये हा इव्हेन्टसचा अनुभव मी घेतला आहे आणि यानिमित्ताने दिलीपकुमारच्या भेटीचा योग आला. यावेळी ते मराठी चित्रपटसृष्टीचे पाहुणे म्हणून आले होते. यावेळी दिलीपकुमारनी मराठी चित्रपटसृष्टीला मराठीत विशेष शुभेच्छा दिल्या. दिलीपकुमारच्या भेटीने अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे विलक्षण भारावून गेल्याचे दिसले.
एकदा पुणे शहरात काही कामानिमित्त असताना दिलीपकुमारनी अनंत माने दिग्दर्शित ‘एक गाव बारा भानगडी’ (१९६८) हा चित्रपट पाहून ‘हा चित्रपट आपल्याला असे गुंतवून ठेवतो की वेळ कसा जातो तेच समजत नाही’ असे गौरवोद्गार काढले. त्यामुळे जयश्री गडकर विशेष प्रभावी झाल्या. आपल्या ‘अशी मी जयश्री’ या चरित्रात या गोष्टीचा खास उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे तर, जयश्री गडकर यांच्या एका भेटीत त्यांच्याकडून हा अनुभव मी ऐकला तेव्हा या क्षणाच्या आठवणीने त्या फार रोमांचित झाल्याचे जाणवले. त्या काळात मराठी कलाकाराला दिलीपकुमारची मिळणारी शाबासकी विशेष गोष्ट होती.
दिलीपकुमारचे मराठी रंगभूमीवरचे प्रेम कायमच ठळकपणे व्यक्त झाले आहे. खरं तर तो वेगळा विषय आहे. ‘संशयकल्लोळ’, ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘तो मी नव्हेच’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘अश्रूंची झाली फुले’ अशा अनेक नाटकांच्या काही विशेष प्रयोगाना दिलीपकुमारची विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होती आणि अगदी संपूर्ण नाटक अगदी शांतपणे अनुभवणे. मध्यंतराला आवर्जून विंगेत येऊन अथवा स्टेजवरील कार्यक्रमात त्या नाटकातील तसेच अभिनयातील बारकावे सांगत सांगत प्रत्येक कलाकाराचे कौतुक करणे, त्याना शाबासकी देणे हे त्यांचे वैशिष्ट्य. विशेष म्हणजे शक्यतो हे भाषण मराठीत करणे आणि छान कौतुक करताना खास उर्दूतील नेमके शब्द वापरुन आपल्या भाषणाला अधिकाधिक उंचीवर नेत, सर्वानाच मंत्रमुग्ध करणे.
‘संशयकल्लोळ’ च्या वेळी दिलीपकुमारने आपल्या पाठीवरून कौतुकाचा फिरवलेला हात अशोक सराफच्या आजही लक्षात आहे. त्या क्षणाची नुसती आठवणही त्याला शहारून जाते. म्हणूनच त्याला मी अधूनमधून करुन देत असतो. नव्वदच्या दशकात दिलीपकुमारने काही मराठी कलाकारांसोबत ‘ओ बाबा जान’ या नावाच्या हिंदी चित्रपटात भूमिका साकारायचीही तयारी झाली होती. सतिश आळेकर त्या चित्रपटात भूमिका साकारणार होते. दिलीपकुमारने त्यासाठी त्या मराठी कलाकारांची मुंबई उपनगरातील एका तारांकित हॉटेल मध्ये राहण्याचीही व्यवस्था केली होती. तो चित्रपट प्रत्यक्षात सेटवर न जाताच बंद पडला. पण पुणे शहरात या एकूणच गोष्टीची खूपच चर्चा रंगली. विशेषतः एकदा सायरा बानूने या सर्व मंडळींसाठी एकदा केलेल्या टेस्टी खिचडीची चर्चा पुणे शहरात बरेच दिवस रंगली. हा चित्रपट दुर्दैवाने सेटवर न जाताच डब्यात गेला.
दिलीपकुमारचा मराठी फंडा इतक्यावरच थांबत नाही. वसंत कानेटकर लिखित ‘अश्रूंची झाली फुले’ याच नाटकाच्या मध्यवर्ती कथासूत्रावर आधारित यश चोप्रा दिग्दर्शित ‘मशाल’ (१९८४) या चित्रपटात दिलीपकुमारची भूमिका आहे. मूळ थीम कायम ठेवून अन्य संदर्भ बदलले आहेत इतकेच. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलीपकुमार आणि निळू फुले एकत्र भूमिका साकारण्याचा योग आला.
तर उमेश मेहरा दिग्दर्शित ‘किला’ (१९९८) या चित्रपटात दिलीपकुमारची दुहेरी भूमिका आहे, एक नायिका रेखा आहे. तर दुसरा दिलीपकुमार स्मिता जयकरचा नायक आहे. स्मिता जयकरने हा चित्रपट साईन करताच मी ‘या सोनेरी संधी’ बाबत स्मिता जयकरची खास मुलाखत घेतली. विशेष म्हणजे, गोरेगावच्या चित्रनगरीतील कोर्ट दृश्याच्या शूटिंगच्या वेळी स्मिता जयकरमुळे मला प्रत्यक्षात सेटवर हजर राहण्याची संधी मिळाली. अभिनयाचे विद्यापीठ दिलीपकुमारला प्रत्यक्षात अभिनय करताना अनुभवायला मिळणे ही तर कमालीची सोनेरी चंदेरी संधी मिळाली. संपूर्ण सेटवर दिलीपकुमारचे अस्तित्व जाणवत होते. एका बाजूला रेखा, पलिकडे स्मिता जयकर आणि आजूबाजूला अनेक ज्युनिअर आर्टिस्ट अशात सगळ्या नजरा अर्थात दिलीपकुमारवर!
दिग्दर्शक उमेश मेहराकडून संपूर्ण दृश्य समजून घेऊन मग कॅमेरा नेमका कुठे आहे, त्याची मुव्हमेंट कशी आहे, असे सगळे छोटे छोटे तपशील जाणून घेत दिलीपकुमारने बरीच रिहर्सल करुन मग टेक करते है असे म्हणताच संपूर्ण सेटवर शांतता पसरली. अर्थात, एका टेकवर दिलीपकुमारचे समाधान होणे शक्यच नव्हते. त्यामुळे एकेक टेक वाढत वाढत गेला. अशा महान कलाकारासोबत भूमिका साकारण्याची संधी स्मिता जयकरला मिळाली.
दिलीपकुमारचा मराठी फंडा असा विविध स्तरांवरचा आहे. दिलीपकुमारच्या मोठेपणाला साजेसा असाच हा खास फंडा आहे.