Vidya Balan नाही तर ‘या’ अभिनेत्री असत्या ‘परिणीता’मधील लोलिता!

Ramesh Sippy यांचे ‘न आलेले चित्रपट’ ही मोठेच
पडद्यावर आलेल्या चित्रपटांपेक्षा कधी कधी पडद्यावर न आलेले चित्रपट जास्त उत्सुकता वाढवतात.. त्यात ते चित्रपट दिग्दर्शक रमेश सिप्पीचे असतील तर? आज देश विदेशात ‘शोले’ ला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सगळीकडेच विविध दृष्टिकोनातून फोकस टाकला जात असताना तर ही गोष्ट खूपच उल्लेखनीय. बरं, रमेश सिप्पी एकादा छोटा चित्रपट दिग्दर्शित करुन स्वतःला थोडेसे रिलॅक्स करुयात अशा विचाराचा अजिबात नाही. ‘शोले’च्या खणखणीत यशानंतर रमेश सिप्पीनी एकादी हलकी फुलकी प्रेम कथा दिग्दर्शित करावी असे पटकथाकार सलिम जावेद यांनी सुचवल्याची चर्चा हवेत विरली. रमेश सिप्पींनी ‘शान’ पडद्यावर आणण्यात रस घेतला.

रमेश सिप्पी दिग्दर्शित पडद्यावर न आलेले चित्रपट ऐंशीच्या दशकातील आहेत. त्यात एका चित्रपटात श्रीदेवी व माधुरी दीक्षित होते. एव्हाना श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित या दोघींचेही चाहते विचार करीत असतील की, या दोघी एकाच चित्रपटात एकत्र कधी बरे आल्या होत्या? काहींनी लगेचच गुगल केलेही असेल. झटपट माहितीचा हा स्रोत झाला आहे. पण नेमके उत्तर मिळेलच असे नाही. माधुरीच्या करियरच्या तर सुरुवातीला तर नाही ना? यासारखे वगैरे वगैरे प्रश्न मनात नक्कीच आले असतील. आणि ते यायलाच हवेत. तो चित्रपट होता ‘जमीन’ ( १९८७) आणि दिग्दर्शक होता रमेश सिप्पी.

या चित्रपटात विनोद खन्ना हीरो होता. आणि जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या ‘जमीन’चा शानदार पार्टीने मुहूर्त झाला होता. रात्री उशिरापर्यंत ही पार्टी रंगली. मल्होत्रा नावाचा कोणी निर्माता होता. रजनीश आश्रमातून चित्रपटसृष्टीत परतलेल्या विनोद खन्नाचे एव्हाना पुनरागमन मुरत होते. सुदैवाने त्याला बरेच नवीन चित्रपट मिळत होते. श्रीदेवी टॉप फॉर्मात होती. तिला ‘लेडी अमिताभ’ असे कौतुकाने म्हटले जात होते. माधुरी मात्र तोपर्यंत यशासाठी झगडत होती. तिचे सुरुवातीचे चित्रपट फ्लॉप ठरल्याची गोष्ट आज कालबाह्य झाली असली तरी ती वस्तुस्थिती आहे. तिच्यासाठी रमेश सिप्पीचा चित्रपट एक उत्तम पर्वणीच होती.
================================
हे देखील वाचा : Kamalistan Studio च्या खाणाखुणा मिटत चालल्यात…
=================================
‘सागर ‘ (१९८५) नंतरचा चित्रपट म्हणून रमेश सिप्पी आता काय मांडणार याची उत्सुकता होती. मुहूर्तानंतर ‘जमीन ‘चे पहिले शूटिंग सत्र सुरु होणार तोच बातमी आली की, हा चित्रपट ‘जमीनदोस्त’ झाला, अर्थात बंद पडला, डब्यात गेला. असे अनेक लहान मोठे चित्रपट काही ना काही कारणास्तव डब्यात जातच असतात. तसाच हादेखील गेला असला तरी श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित एकत्र येणे राहून गेले ना? पण त्या दोघी वेगळ्या पध्दतीने एकत्र आल्या याची कदाचित तुम्हाला कल्पना नसेल. तो चित्रपट होता, राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘पुकार’ (२०००). या चित्रपटात अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि नम्रता शिरोडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
माधुरीचे प्रभू देवासोबतचे के सरा सरा नृत्य गीत याच चित्रपटातील आहे हे आठवलं असेलच. या चित्रपटात श्रीदेवी पाहुणी कलाकार म्हणून होती का असा प्रश्न एव्हाना तुमच्या मनात आला असेल. तर अजिबात नव्हती. या चित्रपटाचा निर्माता होता, बोनी कपूर. आता बोनी कपूरची बायको श्रीदेवी. म्हणजे ती एक प्रकारे या चित्रपटाची निर्माती नाही का? त्या निमित्ताने त्यांचा एका चित्रपटासाठी का होईना पण संबंध आला. पण त्यापेक्षा त्या एकाद्या चित्रपटात एकत्र आल्या असत्या , एकादे ‘डोला रे डोला ‘सारखे फक्कडबाज नृत्य गीत साकारले असते तर पिक्चर सुपर हिट ठरला असताच आणि दोघींचेही फॅन्स आणि फॉलोअर्स अधिकाधिक आनंदले असते ना? काही राहून गेलेल्या गोष्टी अशाही असतात….

रमेश सिप्पीचा असाच आणखीन एक विशेष उल्लेखनीय चित्रपट मुहूर्तालाच बंद पडला. त्याचे चित्रपटाचे नाव होते, ‘राम की गीता श्याम की सीता’. १९८९ सालची ही गोष्ट. विशेष उल्लेखनीय गोष्ट या चित्रपटात अमिताभ बच्चन व श्रीदेवी या दोघांचीही दुहेरी भूमिका होती. ही गोष्टच मुळी उत्सुकता वाढवणारी. अंधेरीतील नटराज स्टुडिओत या चित्रपटाचा मुहूर्त झाला आणि विशेष म्हणजे, या मुहूर्त दृश्यात अजय वढावकर देखिल होता. आपल्याला अतिशय मोठी संधी लाभल्याने तो विशेष आनंदात होता. पण या चित्रपटाची प्रगती या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या बातम्या येण्याइतपतच राहिली. रमेश सिप्पी यांनीच अमिताभ बच्चनला ॲक्शन हिरोची भूमिका देत ‘आलिशान’ या नावाच्या चित्रपटाची केलेली घोषणा अशीच हवेत विरली. अशा पध्दतीने अनेक चित्रपट घोषणा वा मुहूर्तापासून काही रिळांच्या चित्रीकरणापर्यंत बंद पडत असतातच. चित्रपट निर्मितीतील तीही एक महत्वाची गोष्ट. पण ‘शोले’ वाल्या दिग्दर्शक रमेश सिप्पीचे चित्रपट पडद्यावर येत नाहीत ही गोष्ट रंजक ठरते.