
अस्वस्थ करणारा चित्रपट ‘दो बिघा जमीन’
हिंदी चित्रपटसृष्टीच्या चौफेरी इतिहासामधील काही क्लासिक चित्रपटांची केवळ आठवण आली तरी देखील त्या चित्रपटाचं एखादं अतिशय बोलकं प्रभावी पोस्टर, त्या चित्रपटाची थीम, त्या चित्रपटाचा सामाजिक आशय आणि त्या चित्रपटाचा दीर्घकालीन समाजावर आणि चित्रपट रसिकांवर उमटलेला ठसा हे सगळं डोळ्यासमोर येतं. अशा महान कलाकृती भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये अनेक निर्माण झाल्या आहेत आणि त्यामुळेच मला असं वाटतं की जगभरातील चित्रपटसृष्टीच्या वाटचालीमध्ये हिंदी चित्रपटातली आपली एक वेगळी ओळख, दबदबा, अस्तित्व निर्माण झाले आहे आणि असाच एक चित्रपट बिमल राॅय प्राॅडक्शनचा बिमल राॅय निर्मित व दिग्दर्शित “दो बिघा जमीन”. (Do Bigha Zamin)
हा चित्रपट मुंबईमध्ये १६ जानेवारी १९५३ या दिवशी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता एकाहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत. इतका मोठा कालखंड होऊन देखील या चित्रपटाचे नाव घेताच संपूर्ण चित्रपट त्याच्या पोस्टरसह डोळ्यासमोर येतो हे दिग्दर्शकाचे सगळ्यात मोठे यश आहे. बिमल राॅय यांनी ‘दो बिघा जमीन'(Do Bigha Zamin),’देवदास’,’परिणिता’, ‘यहुदी’, ‘मधुमती, ‘सुजाता’, ‘परख’ या व इतर चित्रपटातून विविधता आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटातून रसिकांना दिली. या प्रत्येक चित्रपटाचा रसिकांवरचा प्रभाव आजही कायम आहे. ही दिग्दर्शकाची ताकद आहे. रसिकांच्या चार पाच पिढ्या ओलांडूनही या चित्रपटांचा प्रभाव आहे हे उल्लेखनीय आहे. कसदार कलाकृती कायमच ‘आजच्या ‘ असतात. ते कधीच कालबाह्य होत नाहीत. बिमल राॅय यांचे वैशिष्ट्य म्हणजे, ते बंगालमध्ये न्यू थिएटर्मध्ये नीतीन बोस यांच्याकडे असिस्टंट कॅमेरामन म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली.

‘दो बिघा जमीन’ (Do Bigha Zamin) हा चित्रपट इटालियन नववास्तववादी चित्रपटावरुन सुचला असल्याचे मागील पिढीतील चित्रपट अभ्यासकांचे म्हणणे होते. या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला. कान्स येथील सातव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पारितोषिक प्राप्त झाले. या चित्रपटाची गोष्ट ही खरं त्या काळातली जरी असली तरी आजच्या काळातही सामाजिक परिस्थितीवर घणाघात करणारा ठरू शकतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहा वर्षांतच हा चित्रपट आला. आणि अस्वस्थ करणारा आहे. बंगालमधील एका गावातील शेतकऱ्याची कशा पद्धतीने ससेहोलपट होते आणि त्याला दुष्काळाची चटके बसल्यावर तो शंभू महातो ( बलराज साहनी) आयुष्याशी सामना करत कशी जगण्याची धडपड करतो आणि त्यात त्याची कशी परवड होते अशा थीमवरचा हा प्रभावी चित्रपट.
शंभू महातो ( बलराज साहनी) हा आपली पत्नी पारु ( निरुपा राॅय) , मुलगा कन्हैया ( रतनकुमार) आणि वृद्ध बाप गंगू ( नाना पळशीकर) यांच्यासोबत पश्चिम बंगालमधील एका गावात राहत असताना दोन वर्ष पाऊस अजिबात पडत नाही, त्यामुळे दुष्काळाशी सामना करण्याच्या कुटुंबासमोर कोणताही पर्याय नसतो. अशा भयाण परिस्थितीत स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पहिल्या दशकांमध्ये देशातील काही मोठ्या शहरांमध्ये औद्योगिकीकरणाचा विकास हळूहळू होता आणि अशा वेळेला देशातील विविध भागातील खेड्यातील अनेकांना आपण शहरात जाऊन आयुष्य जगावे असे वाटत होते. शहरात गेल्यानंतर आपल्याला काही नोकऱ्या मिळतील, चांगलं उत्पन्न मिळेल आणि ते पैसे आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या गावाला पाठवू असं त्यांचं स्वप्न असे. त्याच सुमारामध्ये गावातील जमीनदार ठाकूर हश्नामसिंह एक जमीन एका औद्योगिक विकासासाठी देतो, त्या जमिनीच्या मधोमधच शंभुची जमीन असते आणि ती जमीन देखील त्या कारखान्याला देणे गरजेचे असते. शंभूचा या गोष्टीसाठी स्पष्ट नकार असतो. अगोदरच दुष्काळ आणि अशातच आपण जमीन दिली तर आपलं काय होईल असा त्याचा प्रश्न असतो. परंतु ठाकूरचा ह्या जमिनीसाठीचा अट्टाहास आणि शंभूचा त्याला तेवढा तीव्रपणे नकार असा एक नवा संघर्ष निर्माण होते.
शंभू साधा सरळ गरीब, एक सरळमार्गी आयुष्य जगणारा असतो. त्याच्या डोक्यावर कर्ज आहे हेसुद्धा त्याच ठाकूरने दिलेले आहे. ते कर्ज फेडणे, जमीन वाचवणं, कर्जाची रक्कम वाढवून केलेली त्याची वसुली आणि त्यासाठी दिलेली तीन महिन्याची मुदत एवढा सगळा डोंगर डोक्यावर घेऊन कशा पद्धतीने शंभू महातो जगणार हा एक मोठा प्रश्नच असतो आणि मग त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी तो कोलकत्त्याला येतो कोलकत्त्याला जाऊन पैसे मिळतील. आपण तेथे काही लहान मोठं काम करु आणि त्याच्यातून आपल्याला जे पैसे मिळतील, त्याच्यातून आपलं कुटुंब जगू शकेल, कर्ज फेडू शकेल अशा अपेक्षाने शंभू महातो कोलकात्यात येतो. कोलकात्यात हमाली करतो, नंतर रिक्षा ओढून माणसांची ने आण करतो, एकदा दुर्दैवाने रिक्षा उडून पडून शंभूच्या तळपायाला भेगा पडतात. शंभूच्या मुलाने कन्हैयालालनेही बूट पॉलिश करुन पैसे मिळवणे आणि त्यातून मिळालेले पैसे गावाला देणे सुरू असते परंतु त्याच्यातूनच पिता आणि पुत्रांमध्ये गैरसमज निर्माण होतो आणि त्यातून शंभू महातोसमोर आणखीन एक नवीन अडचणींचा सामना उभा राहतो. शंभू हा कष्ट आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावर वाटचाल करु पाहतो. परंतु मुलगा मात्र चोरी करून एकदा पन्नास रुपये आणतो त्यावेळेला शंभू त्याला मारतो अशातच शंभूच्या शोधात पारो कलकत्त्यात येते आणि एका मवाल्याच्या तावडीत सापडली असता तिथून पळ काढते नि दुर्दैवाने मोटारखाली येऊन ती बेशुद्ध पडते. योगायोगाने शंभूची व तिची गाठ पडते. पारोवर उपचार सुरू होतात तिचा मुलगा कन्हैया पण तिथे येतो आपण चोरी केल्यामुळेच आपल्या आईला अपघात झाला असे त्याला वाटते. पण या दोघांनी जे पैसे जमवलेले आहेत ते सगळे पैसे पारोच्या उपचारासाठी खर्च होतात आणि हे तिघेही एका वेगळ्या हरवलेल्या मन:स्थितीमध्ये गावी येतात. मुदतीत कर्जफेड न झाल्याने शंभूची जमीन लिलावात काढली जाते अशी या चित्रपटाची थीम आहे. (Do Bigha Zamin)
शंभूच्या भूमिकेसाठीचा बलराज साहनी यांचा अभिनय अतिशय प्रभावी ठरला. या चेहर्यावर मेहनत, धडपड, वेदना आहेत. हे सगळं त्यांच्या एक्सप्रेशनवर दिसतं. अभिनयाचे एक सर्वोत्तम उदाहरण म्हणून या भूमिकेकडे पाहता येईल. शूटिंगच्या वेळेस रिक्षा ओढणाऱ्या बलराज साहनीला खरोखरच रिक्षावाला समजून कोणी त्यांच्या हातावर ‘दुअन्नी’ ठेवल्याचा किस्सा सांगितला जातो. हे या अभिनय आणि अभिनेत्यांचे यश आहे. आणखीन एक विशेष, या गरीब शेतकरी कुटुंबाच्या अंगावर शोभतील असे जुने, वापरलेले कपडे आवर्जून चोरबाजारातून आणले आणि ते मातीत मळवले. निरुपा राॅयला ते कपडे खरवडून धुवायला लावले. एकाद्या चित्रपटावर इतपत खोलवर मेहनत घेतली गेली.
==========
हे देखील वाचा : आशा भोसले यांच्या टाॅप टेन पैकी ‘या’ गाण्याची पन्नाशी
==========
विशेष म्हणजे या चित्रपटाला फिल्म फेअरचं सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. चित्रपटाची गोष्ट आणि संगीत सलील चौधरी यांचे आहे आणि शैलेंद्रची गाणी आहेत. चित्रपटांत मीनाकुमारीवर “आ जा रे निंदिया तू आ ” हे अंगाई गीत आहे. मला आठवतंय दशकात शनिवारी संध्याकाळी मराठी आणि रविवारी संध्याकाळी हिंदी चित्रपट प्रक्षेपित होत असे आणि त्या वेळेला काही प्रयोगशीलताही होत असे आणि “एक महिना एक दिग्दर्शक” असं १९७६ साली झालं. एका महिन्यामध्ये बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘नया दौर ‘, ‘गुमराह’ वगैरे चित्रपट चित्रपट एका महिन्यामध्ये बिमल रॉय दिग्दर्शित मधुमती, परख, देवदास व दो बिघा जमीन हे चित्रपट प्रक्षेपित करण्यात आले. त्या वेळेला हा चित्रपट मी दूरदर्शनवर पाहिला आणि चित्रपटाची कथा पाहता त्याला कृष्णधवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट स्वरूप हेच योग्य ठरते. अर्थात त्या काळात ब्लॅक अँड व्हाईटमध्ये चित्रपट निर्माण होत. या चित्रपटातील वेदना, आशावाद, संघर्ष, धडपड हे सगळेच कृष्ण धवल स्वरुपात जास्त प्रभावी ठरते. म्हणूनच मला अनेकदा वाटते, मूळ ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपातील चित्रपट तांत्रिक सोपस्काराने रंगीत करु नका. त्यातील आशयाचा आत्मा गुदमरण्याची शक्यता असते. ‘विषयाचा रंग महत्वाचा असतो’, तो या चित्रपटात आहे.
आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सगळ्यात मोठा सामाजिक प्रश्न आहे परंतु त्याची मांडणी अशा भेदक पद्धतीने किंवा प्रभावी पद्धतीने लिहिणारा पटकथा लेखक आणि तो साकारणारा दिग्दर्शक यांची गरज आहे. मूळ प्रश्नाच्या खोलात जाऊन त्याच्याबद्दलचे तपशील मिळवून असा चित्रपट मांडताना प्रेक्षकांना विश्वासात घेणे आणि अशा पद्धतीचा सामाजिक गोष्टीवरचा चित्रपटासाठी एखाद्या कलाकाराने तशी तेवढ्याच पद्धतीची मेहनत घेणं हे गरजेचे आहे.” दो बिघा जमीन ” ला तब्बल एकाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानेचा हा फोकस.