‘लंबी जुदाई….’ ची गायिका रेश्मा आठवते का?
दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘हिरो’ या चित्रपटाने ऐंशी च्या दशकामध्ये मोठी हलचल निर्माण केली होती. जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री यांचा हा पहिलाच गाजलेला चित्रपट होता. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीताने बहार उडवून दिली होती. या चित्रपटातील एक गाणे ‘लंबी जुदाई चार दिनो का प्यार वो रब्बा बडी लंबी जुदाई” हे पाकिस्तानी गायिका रेश्मा(Reshma) हिने गायले होते. या गायिकेबद्दल फारशी माहिती कुठे वाचायला मिळत नाही. पण खूप इंटरेस्टिंग अशी तिची कहाणी आहे.
१९४७ साली भारतातील राजस्थानमध्ये तिचा जन्म झाला. फाळणीनंतर तिचे कुटुंब पाकिस्तानात स्थलांतरित झाले. रेश्मा (Reshma) कुठलेही संगीताचे औपचारिक शिक्षण न घेता गायला लागली. वयाच्या बाराव्या वर्षापासून तिने लोकसंगीत गायला सुरुवात केली आणि त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवले. तिच्या आवाजात एक नैसर्गिक खुलेपणा होता. साठच्या दशकांमध्ये ‘ओ लाल मेरे’ ही पारंपारिक लोकसंगीतातील रचना पाकिस्तान मध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. तिला ‘मल्लिका ए रेगिस्तान’ असे म्हणत तर काहीजण तिला ‘पठाणी बेगम’ असे देखील प्रेमाने संबोधत.
पाकिस्तानच्या टीव्हीवर देखील तिचे परफॉर्मन्स सुरू झाले. याच काळात तिने भारताचा एक दौरा केला होता. राज कपूर यांच्या घरी तिने एक खाजगी मैफल केली होती. या कार्यक्रमात तिने तिचे गाजलेले ‘अखियानु रहने दे…’ हे गाणे गायले. हे गाणे राजकपूर यांना इतके आवडले की त्यांनी त्यावेळी त्यांच्या फ्लोअर वर असलेल्या आणि जवळपास पूर्ण झालेल्या ‘बॉबी’ या चित्रपटात याच रेशमाच्या गाण्याच्या चालीवर ‘अखियोन को रहने दे अखियों के आसपास दूर से दिल की बुझती रहे प्यास…’ हे गाणे लता मंगेशकर यांच्या स्वरात जाऊन घेतले. खास आर के स्टाईलचे आलाप या गाण्यात होते.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात रेश्मा (Reshma) हिचा आवाज प्रचंड लोकप्रिय होता. विशेषतः लोक संगीतामध्ये तिचा स्वर अगदी टिप्पेला पोहोचायचा. ऐंशी च्या दशकामध्ये एकदा रेश्मा भारतामध्ये आली होती. त्यावेळेला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची देखील तिने भेट घेतली होती. याच काळात सुभाष घई ‘हिरो’ हा चित्रपट बनवत होते. यातील एक गाणे त्यांनी रेश्माकडून (Reshma) गाऊन घ्यायचे ठरवले. तेव्हा रेशमा (Reshma) दिलीप कुमार यांच्या घरी उतरली होती.
सुभाष घईने त्यांच्या शी कॉन्टॅक्ट केला परंतु रेशमाने (Reshma) चित्रपटात गायला प्रथम नकार दिला परंतु नंतर सर्वांनी आग्रह केल्यानंतर आणि दिलीप कुमार आणि सायराबानू यांनी आग्रह केल्यानंतर ती गायला तयार झाली. फक्त तिची एक अट होती,’ हे गाणं मी कुठल्या रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये रेकॉर्ड करणार नाही’. तेव्हा दिलीप कुमार यांच्या घरीच हे गाणे रेकॉर्ड करण्यात आले! गाण्याचे बोल होते ‘लंबी जुदाई’ असे म्हणतात ‘हिरो’ या चित्रपटातील बासरीची ट्यून देखील रेश्मा हिच्याच एका गाण्याच्या इंटल्युड मध्ये होती ती सुभाष घाई यांनी आपल्या चित्रपटात वापरली. हिरो नंतर रेशमाने (Reshma) आणखी दोन-तीन हिंदी सिनेमा गाणी गायली.
हे देखील वाचा : अमिताभ बच्चन -अमजद खान यांच्या मैत्रीची ‘अधुरी
‘हिरो’ चित्रपट सुपर डुपर हिट झाला आणि हे गाणे देखील रेशमाचे (Reshma) सिग्नेचर सॉंग बनले. विरहातील प्रत्येक प्रेमी जनाने कधी ना कधी हे गाणे नक्कीच गुणगुणले असणार. या गाण्यातील रेश्माच्या(Reshma) , स्वरातील दर्द काळजाला भिडतो. रेश्मा (Reshma) हिच्या वैयक्तिक आयुष्याची फारशी माहिती मिळत नाही. परंतु १९८० च्या दशकात तिला घशाचा कॅन्सर झाला अशी बातमी वाचायला मिळते. तशाही अवस्थेत तिने आपले गाणे चालूच ठेवले. पाकिस्तानचा सर्वोच्च तिसऱ्या दर्जाचा ‘सितारा ए इम्तियाज’ नागरी सन्मान तिला प्राप्त झाला. ३ नोव्हेंबर २०१३ मध्ये तिचे निधन झाले. रेश्मा (Reshma) ही गायिका खूपच प्रसिद्ध परान्मुख होती. सार्वजनिक ठिकाणी ती खूप शांत शांत असे. फारशा मुलाखती देणं नाही, फोटो सेशन नाही, फारशी चमकोगिरी नाही! आपण बरं आणि आपलं गाणं बरं असा तिचा एटीट्यूड होता.