वेगळ्या शब्दात सांगायचं तर, गल्ली चित्रपट मोहम्मद कैफ असेल तर ड्राईव्ह इन थिएटर कैतरिना कैफ आहे.
आजच्या मल्टीप्लेक्स/मोबाईल स्क्रीन/ओटीटी प्लॅटफॉर्म अशा माध्यमातून चित्रपट पाहत असलेल्या पॉपकॉर्न, पिझ्झा पिढीला ‘गल्ली चित्रपट संस्कृती’ बहुदा माहित नसेल, पण विदेशी जाऊन आलेल्याना ‘ड्राईव्ह इन थिएटर कल्चर’ नक्कीच माहित असेल. तसे आपल्या मुंबईतही कला नगर, वांद्रे येथे सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात ड्राईव्ह इन थिएटर सुरु झाले होते. बहुतेक ‘नया दिन नयी रात’ या चित्रपटाने त्याचे उदघाटन झाले होते. या चित्रपटात संजीवकुमार नऊ भूमिकेत आहे आणि जोडीला जया बच्चन. माझे ते कॉलेजचे दिवस होते. गिरगावातील एक तर सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये पहिल्या तीन चार रांगांतील स्टॉलचेच तिकीट काढून ‘जवळून चित्रपट’ पहायचा अथवा श्रीगणेशोत्सव अथवा अन्य कारणास्तव गल्लीबोळातील/चाळीत लागलेल्या सोळा एमएमच्या पडद्यावर टाळ्या शिट्या वाजवत पिक्चर एन्जॉय करीत असलेल्या आम्हा युवकांना हे ‘ड्राईव्ह इन थिएटर’चे भारी कौतुक होते. भाड्याने सायकल चालवायला घेणे इतकाच वाहनाशी संबंध असताना हे आपण आपली गाडी घेऊन जायचे आणि चक्क गाडीतच बसून सिनेमा पहायचा हे स्वप्नरंजनच असावे असे वाटत होते. हे कसे शक्य आहे? हा प्रश्न पडायचा. सिनेमा पहायचा तर हाऊसफुल्ल गर्दीत आणि आजूबाजूच्या पब्लिकसोबत अशा पध्दतीने आम्ही वाढत होतो. मग समजले की, ड्राईव्ह इन थिएटरला आपल्यासारख्या सामान्य पब्लिकसाठीही साध्या सीटसची एका बाजूला व्यवस्था केली आहे आणि सायंकाळी सात आणि रात्री दहा वाजता असे दोन शो आहेत हे समजले. अगदी लोकल ट्रेनमधून दूरवर हा पिक्चर दिसे. पण काही वर्षांनी ते थिएटर बंद झाले. दोन वर्षांपूर्वी ते पुन्हा नवीन स्वरूपात सुरु होणार अशी जोरदार बातमी होती. पण तसे झाले नाही. सध्या देशात फक्त अहमदाबाद आणि चेन्नई येथेच असे थिएटर आहे असे समजते. विदेशात, विशेषतः युरोप, अमेरिकेत हे कल्चर रुजलय.
आता लॉकडाऊनच्या काळात देशभरातील सर्वच स्तरांवरची थिएटर्स बंद ठेवण्यात आली आहेत आणि ती कधी सुरू होणार याचे उत्तर कोणाकडेही नाही. अशा पार्श्वभूमीवर ड्राईव्ह इन थिएटरचा उपयोग होईल असे सुचवले जात आहे. त्यात फिजिकल डिस्टन्सिंग सहज शक्य आहे असाही मुद्दा आहे. पण त्याही पलीकडे जाऊन असे सांगता येईल की आज नवश्रीमंत आणि उच्चभ्रू वर्गात प्रत्येक कुटुंबात एक गाडी नक्कीच आहे (याच वर्गाने मल्टीप्लेक्स जगवलीत) आणि त्यांना ड्राईव्ह इन थिएटरचे महागडे तिकीट दर (त्यात पार्किंग दरही असणार) नक्कीच परवडतील. याच क्लासमधील काही जण आपल्या वाढदिवसानिमित्त अख्खा शो बुक करतील. पण महत्वाचे आहे ते, अशा विशाल थिएटरसाठी लागणारी जागा आता किती प्रमाणात उपलब्ध होईल? एकेकाळच्या गल्ली चित्रपट संस्कृतीचा मॉडर्न अवतार म्हणजे ड्राईव्ह इन थिएटर म्हणायचं काय? गणपती उत्सव आणि इतर उत्सवात गल्ली थिएटरमध्ये मध्यभागी पडदा लागायचा आणि प्रोजेक्शनच्या बाजूला महिला प्रेक्षक तर उलट्या बाजूला पुरुष प्रेक्षक अशी उघडपणे विभागणी असूनही कोणाचीही तक्रार नव्हती. याचे कारण म्हणजे ‘पिक्चर पाहण्याची’ जबरा ओढ. गंमत म्हणजे उलट्या बाजूने चित्रपट पाहताना दिलीपकुमार, राजेश खन्ना डावखुरा दिसला तरी त्यांचा अभिनय उजवा असे. एक तर खाली बसायला ताडपत्री असे. खिशात आजचा पेपर ठेवून कोणत्या गल्लीत चांगला चित्रपट आहे याचा अंदाज घेऊन मग बैठक मारायची अशी त्यावेळची पद्धत. आमच्या गिरगावातील आंबेवाडीत श्रीगणेशोत्सवात एका बाजूला चक्क खुर्ची असे, त्याचे केवढे कौतुक होई. अर्थात, सगळ्याच चाळी आणि गल्लीत तुम्ही गॅलरीत घरची खुर्ची घेऊन बसू शकता. ह्या सर्व गोष्टींमध्ये एक वेगळाच फिल येई. त्यात अधिकृत मध्यंतरासह आणखीन दोन अनधिकृत मध्यंतरे असत. याचे कारण रिळ उतरवा आणि चढवा यात वेळ जाई. कधी फिल्म अडके आणि तुटेही, पण ती जुळून पुन्हा सिनेमा सुरु व्हायची वाट पाहिली जाई. मध्येच पाऊस आला की गोंधळ उडाला तरी आडोसा घेत सिनेमा पाहिला जाई. अर्थात, एका बाजूला शेड असे आणि त्या पब्लिकला पावसाचा तितकासा त्रास होत नसे. मी सत्तरच्या दशकात याच गल्ली चित्रपटात मेरा गाव मेरा देश, तिसरी मंझिल, ज्वेल थीफ, राम और श्याम, श्री ४२०, मोलकरीण, तेरे घर के सामने, रोटी, दाम करी काम, वारीस, आझाद असे अगणित मराठी हिंदी चित्रपट पाहिले. एक प्रकारे बॅकलॉग भरुन काढला म्हणा. गल्ली चित्रपटात कधीही ‘फक्त प्रौढांसाठी’ असलेले चित्रपट दाखवले जात नसत. गल्लीच्या तोंडावर आजचा चित्रपट कोणता याचा फलक असे. महत्वाचे म्हणजे, एका गल्लीतील चित्रपट रसिक कुठेही जाऊन चित्रपट पहायचा. सोळा एमएमचा पडदा आहे, मूळचा रंगीत चित्रपट ब्लॅक अॅण्ड व्हाईट आहे (तशीही प्रिन्ट असे), रात्री उशिरापर्यंत पिक्चर चालला याबाबत कसलीही तक्रार न करता पिक्चर (त्या काळातील प्रचलित शब्द) पहायचाय एवढे एकच लक्ष असे. ग्रामीण भागात तर श्रीसत्यनारायणाच्या वार्षिक पुजेला कोणता चित्रपट ठेवायचा यावरुन प्रचंड वाद विवाद होत. तेही बरोबरच होते. वर्षातून एकदाच पिक्चर दाखवायचाय तर तो असा हवा की गावातील माणसे वर्षभर नाव काढतील. यानिमित्ताने चणे, फुटाणे, शेंगदाणा विक्रेते खूप बसत. ते खात खात रात्री उशिरापर्यंत चालणारा पिक्चर एन्जॉय करायचा. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘स्वदेस’ या चित्रपटात असा ग्रामीण भागातील गल्ली चित्रपट (‘यादों की बारात’) पाहायला मिळतो.
कालांतराने व्हिडिओचे आगमन झाले आणि गल्ली चित्रपट संस्कृती मागे मागे पडत गेली आणि भाड्याने व्हीसीआर आणि कॅसेट आणण्याचे युग संचारले. लग्नापासुन बारशापर्यंतच्या कार्यक्रमात एका दिवसात तीन व्हीडीओ कॅसेट, अर्थात तीन चित्रपट बघायचे आणि अशा रीतीने सिनेमा अधिक जवळ आला.
अगदी काही वर्षांपूर्वी ‘फिरता सिनेमा’ अथवा पोर्टेबल सिनेमा हा एक वेगळा प्रकार सुरु झाला. एका बसमध्ये पन्नास साठ खुर्च्यांसह पडदा, प्रोजेक्शन घेत ग्रामीण भागातील जनतेपर्यंत चित्रपट न्यायचा. कोकणात अशा पध्दतीने बरेच नवीन चित्रपट दाखवले गेल्याचे वृत्त आहे. अशा प्रकारची पोर्टेबल थिएटर्सची संख्या वाढवणे शक्य आहे आणि आवश्यकही आहे. यात प्रेक्षकसंख्या तुलनेत कमी असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग शक्य आहे आणि याचे तिकीट दर मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना नक्कीच परवडतील.
फार पूर्वीची आठशे, हजार, बाराशे आसनक्षमतेची सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहे आजच्या काळात चालवणे अवघड झाले आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या दिवसात त्या थिएटर्सची दुरावस्था नेमकी कशी झाली असेल याची कल्पनाही करवत नाही. त्यातील सगळीच लॉकडाऊननंतर सुरु होतील अशी खात्री नाही आणि यात आश्चर्यही नकोच. काही मल्टीप्लेक्समध्ये आसन व्यवस्था बदलण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही वृत्त आहे. या सगळ्यात ड्राईव्ह इन थिएटरचा उपयोग होईल असे सुचवले जात आहे, पण तो प्रकार म्हणजे एकेकाळच्या गल्ली चित्रपटाचे पॉश रुपांतर आहे. गल्ली चित्रपट फुकट एन्जॉय करता येत होते (आयोजक त्याचे पैसे भरत), ड्राईव्ह इन थिएटरला किमान तिनशे गाड्या उभ्या राहतात. म्हणजे हाऊसफुल्ल शो ला सहाशे प्रेक्षकांची निश्चिती.
वेगळ्या शब्दात सांगायचं तर, गल्ली चित्रपट मोहम्मद कैफ असेल (मोकळी ढाकळी फटकेबाजी) तर ड्राईव्ह इन थिएटर कैतरिना कैफ आहे. स्टाईलीश….. पटलं का