पुन्हा हाऊसफुल्ल गर्दीत “शोले” एन्जाॅय करताना…
स्थळ : रिगल चित्रपटगृह, कुलाबा
दिनांक : ३१ ऑगस्ट २००४
निमित्त : जी. पी. सिप्पी निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित “शोले”च्या विशेष खेळाचे फिल्म हेरिटेज फांऊन्डेशनच्या वतीने आयोजन.
वेळ : सायंकाळी साडेपाच वाजता.
मी चार वाजताच रिगलवर पोहचतोय तोच मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. थिएटरवर “शोले”चे भव्य दिमाखदार डिझाईन. एका खेळासाठीही ही जय्यत तयारी हे विशेषच. तिकीटासाठी चक्क रांग लागली होती. (मुक्त प्रवेश होता, तरी रांगेत प्रवेश हे योग्य नियोजन) एका क्षणात माझे मन शाळा काॅलेजच्या दिवसांत गेले देखिल. गिरगावात राहत असल्याने मिनर्व्हा थिएटर अगदीच जवळ आणि तेथे “शोले” (Sholay)चा पाच वर्ष मुक्काम असतानाच एक गोष्ट कायम होती. आगाऊ तिकीट विक्रीला कायमच रांग (१५ ऑगस्ट १९७५ ते ३१ ऑगस्ट १९७८ असा दिवसा तीन खेळ आणि मग मॅटीनीला शिफ्ट करीत आणखीन दोन वर्ष, असा पाच वर्ष मिनर्व्हात “शोले”चा मुक्काम) आणि त्या काळातील आम्ही फिल्म दीवाने थिएटरवचे डेकोरेशन आणि तिकीटासाठी रांग पाहण्यास आवर्जून थिएटरवर जात. त्या काळातील हा फंडा आज कदाचित हास्यास्पद वाटेलही…
रिगलच्या रांगेतील पहिल्याच रसिक प्रेक्षकाला सहज विचारले, किती वाजल्यापासून उभा आहेस? त्याने सांगितले, दोन वाजल्यापासून आहे. मी ठाण्यात राहतो. माझे आडनाव पिटकर. ऐकून थक्क झालो. रांगेत नजर टाकतानाच संगीतकार कौशल्य इनामदार भेटले. ते म्हणाले, पुन्हा एकदा “शोले”(Sholay)चा अनुभव घ्यायला आलोय. मुलालाही बरोबर आणलयं. हे ऐकून सुखावलो. त्यांच्या शेजारचा अमहाराष्ट्रयीन मला म्हणाला, आतापर्यंत एकशेदहा वेळा थिएटरमध्ये “शोले” पाहिला. आता पुन्हा एकदा पाहतोय. पुन्हा सुखावलो. हीच रांग सतत वाढत वाढत खूपच दूरवर पोहचली. सगळ्यांच्या चेहर्यावर “शोले” कधी पाहतोय याची प्रचंड उत्सुकता होती. अनेकांनी माझ्याप्रमाणे अनेकदा “शोले” एन्जाॅय केलेला. तर आजच्याही डिजिटल पिढीतील चित्रपट रसिक रांगेत होते.
रिगलच्या लाॅबीत सलिम जावेद यांच्या “ॲन्ग्री यंग मॅन” या माहितीपटाचा मोठाच कटआऊट. रसिकांच्या गर्दीने आत प्रवेश करतानाच आजचा खेळ डोक्यावर घेतला जाणार हे स्पष्ट जाणवले. मागची पुढची मिळेल ती खुर्ची पटकावण्याची धडपड सुरु झाली. काहीजण बाल्कनीत गेले. अशातच सलिम खान व जावेद अख्तर यांचे एकेक करत थेट पडद्यासमोरच्या पहिल्याच रांगेपर्यंत आगमन होताना प्रचंड टाळ्या आणि शिट्ट्या. सर्वांनीच उभे राहून अभिवादन केले. दोघांनी औपचारिक भाषण केले. “थिएटरवरची रांग पाहून पिक्चर सुपर हिट होणार असे मी सलिमजींना म्हणालो” हे जावेद अख्तरचे म्हणणे मला फार आवडले. सलिम खान लगेचच घरी निघाल्याचे तर जावेद अख्तर काही मिनिटांचा चित्रपट पाहून निघाल्याचे मध्यंतरात लाॅबीतील मिडियाकडून समजले. जोया अख्तर मात्र शेवटपर्यंत थांबली.
….पडद्यावर “शोले” (Sholay)चे डिझाईन होतेच आणि ते “पिक्चर एन्जाॅय करण्याच्या मूडला” पूरक वातावरण निर्माण करीत असतानाच सेन्सॉर प्रमाणपत्र पडद्यावर येताच अतिशय उत्फूर्तपणे टाळ्या शिट्ट्या आरडाओरडा वगैरे आणि मग पिक्चर संपेपर्यंत असाच जल्लोष, असाच भारी रिस्पॉन्स. कितने आदमी थे, तेरा क्या होगा कालीया, जो डर गया समझो मर गया….बहुत याराना लगता है अशा प्रत्येक डायलॉगवर धमाल रिस्पॉन्स. किचाट म्हणा ना. एकजण पडद्यासमोर येवून नाचला. “शोले” पुन्हा पुन्हा पाहतानाही तीच उर्जा, तोच रिस्पॉन्स असे का हा खरं तर “हिंदी चित्रपट यशाच्या अभ्यासाचा विषय” आहे.
आपल्या देशात हिंदी चित्रपट पाहणे म्हणजे जणू सेलिब्रेशन असते. डोक्यावर कसलाही तात्विकतेचा भार न घेता, डोक्याला शाॅट न देता पडद्यावरच्या गोष्टीत, संवादात हरखून हरवून जाणे एवढेच पब्लिकला माहित्येय. अनेकदा तर पडद्यावर डायलॉग येण्यापूर्वीच काही फिल्म दीवाने डायलॉग बोलत हा अनुभव मिनर्व्हातही येई आणि ती गोष्ट आजही कायम आहे.
“शोले”चे गारुड कायम आहे हे अनुभवलं. हा चित्रपट फार ग्रेट कलाकृती आहे की नाही हे माहित नाही. पण हा पिक्चर या देशाची लोककथा आहे. त्याच उत्साहात पब्लिक थिएटरबाहेर पडले.
“जमाना दीवाना” (१९९५)च्या निमित्ताने खार पश्चिमेकडील सिप्पी फिल्मच्या कार्यालयात दिग्दर्शक रमेश सिप्पी यांची लोकसत्ताच्या रंगतरंग पुरवणीसाठी मी मुलाखत घेताना “शोले” वरच माझे प्रश्न झाले आणि “जमाना दीवाना” चक्क विसरुन गेलो.
“शोले”(Sholay) सोबतचा माझा यशस्वी प्रवास हा शालेय वयातील “चित्रपट प्रेक्षक” यापासून ते आज मुद्रित माध्यम, वृत्त वाहिन्या आणि डिजिटल मिडिया असा तीनही माध्यमातून मी वावरतोय असा आहे. खूपच मोठा व वळणावळणाचा आहे. यात “शोले” कायमच नजरेत आहे. मिनर्व्हात “शोले”च्या मध्यंतरला बाहेर येऊन (त्या काळात तशी सोय होती) रस्त्यावरचा दहा पैशाचा वडापाव घेतला, यावेळी पाण्याची बाटली वीस रुपये असल्याचे समजताच मी पुन्हा खुर्चीवर जाऊन बसलो. मी मिडियात आहे, मला सॅण्डविच अथवा पाॅपकाॅर्न फुकट मिळेल का असे विचारणे योग्य वाटले नाही.
===========
हे देखील वाचा : एकेक करत सिंगल स्क्रीन थिएटर्स “पडद्याआड”… आता माहिमचे पॅराडाईज
===========
“शोले” (Sholay) एक चित्रपट रसिक म्हणून एन्जाॅय करणे मला जास्त आनंददायक. तर समिक्षक म्हणून “शोले”त मला अनेक दोष आढळतील. मग मी आम जनतेसोबत तो एन्जाॅय कसा करणार? “मी जनसामान्य प्रेक्षकांचा प्रतिनिधी” म्हणून चित्रपट एन्जाॅय करताना त्यातच मिसळून जायला हवे. मी कोणी वेगळा आहे अशी भावना नसावी. “शोले”चा पन्नासाव्या वर्षांत पदार्पण करणारा प्रवास हेच सांगतो.
….आणखीन एकदाच काय अनेकदा मी “शोले” (Sholay) एन्जाॅय करु शकतो. आपल्या देशात चित्रपट अशाच रिपीट रन म्हणजेच पुन्हा पुन्हा चित्रपट पहावासा वाटतो वा वाटला या वृत्तीनेही जगवला आहे. आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षक संस्कृती भन्नाट आहे. मसालेदार मनोरंजक चित्रपट ते फारच गंभीरपणे एन्जाॅय करतात…