मनोरंजन… मीडिया… मनमानी… आणि बरंच काही!
काळ फार गमतीशीर असतो. गेल्या दोन वर्षांपासून आपण लॉकडाऊन अनुभवला. या काळामध्ये बाकी सगळे व्यवसाय बंद असले तरी मनोरंजन क्षेत्राला मोठा बुस्ट मिळाला. म्हणजे, चित्रिकरणं बंद होती हे खरंच आहे. पण ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरच्या चित्रकृतींना मोठी मागणी आली.
तिथल्या वेबसीरीज, तिथले सिनेमे चालले. लोकांनी बघितले. केवळ हिंदीच नव्हे, तर मराठी, इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच असे सर्वभाषिक सिनेमे, वेबसीरीज लोकांनी पाहिल्या. तर अशा पद्धतीच्या मनोरंजनाला वाढीव मागणी असतानाच, सर्वसामान्य लोकांना नव्या नव्या सिनेमांची, मालिकांची, नाटकांची माहीती देणाऱ्या मराठी तथा स्थानिक, प्रादेशिक न्यूज चॅनल्स, पेपर आदी माध्यमांमध्ये मात्र मनोरंजनाची किंमत कमीत कमी होत गेली.
किंमत कमी झाली आणि परिणामी त्याला मिळणारा एअर टाईमही कमी झाला. नाही म्हणायला मोठी घटना घडली, तर ती कव्हर होत होती. पण लॉकडाऊन काळात सिनेमे यायचे बंद झाले तसे रिव्ह्यू्ज येणं बंद झालं. प्रमोशन होणं बंद झालं. मनोरंजनाशी संबंधित जो काही वेळ दररोज चॅनलमध्ये विशिष्ट कार्यक्रमांना दिला जात होता तोही काढून घेतला गेला.
अर्थात याला जबाबदार केवळ लॉकडाऊन नव्हता. या लॉकडाऊनच्या काळात कोरोनाच्या बातम्या होत्याच. शिवाय, त्यातून रंगणारं राजकारणही फसफसून बाहेर येत होतं. कोरोनावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोप-प्रत्यारोपाची राळ उडाली की, त्यामुळे पाहणाऱ्यांचं रंजन होऊ लागलं. साहजिकच सांस्कृतिक वा कलात्मक कार्यक्रम नसले तरी लोकांचं रंजन करता येत होतं. अगदीच कोणी मोठी व्यक्ती निधन पावली किंवा एखाद्या सिनेमाला मोठं पारितोषिक मिळालं, तर त्याची तेवढी दखल घेतली जात होती. पण नेहमी चालणारे कार्यक्रम बंद झाले. पेपरची अवस्थाही फार वेगळी नव्हती.
वर्तमानपत्रातही कधी काळी समीक्षेला किंवा कलाकारांच्या मुलाखतींना चांगलं स्थान दिलं जात होतं. पण तेही जाऊन आता समीक्षा चिटोऱ्या एवढी होत मनोरंजनाच्या पानावर कोपऱ्यात विसावली आहे. याचं कारण आज महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख माध्यमांना एंटरटेन्मेंटसाठी दुसरा पर्याय मिळाला आहे. तो आहे राजकीय व्यक्तींच्या चिखलफेकीचा!
आरोप-प्रत्यारोप, मोर्चे, बड्या नेत्यांना होणाऱ्या अटका.. अटक होण्यापूर्वी चाललेला खेळखंडोबा… हे सगळं माध्यमांना रंजनात्मक वाटू लागलं आहे. पण वास्तविक परिस्थिती उलट आहे. राजकीय चिखलफेक आता नित्याची झाली आहे.
सामान्य लोकांना खरंतर याच्याशी काही देणंघेणं पडलेलं नाही. ही सगळी मंडळी घरी गेली की मालिका, वेबसीरीज, चित्रपट यांच्यात रमतायत. कारण, चित्रपट, मालिका, नाटक हीच लोकांच्या मनोरंजनाची मुख्य साधनं आहेत. कारण, ही माध्यमं केवळ रंजन न करता बऱ्याचदा हसत खेळत डोळ्यात अंजन घालतात. कधीमधी खूप आत दडलेल्या दु:खावर फुंकर घालतात. खळखळून हसवतात… कधी रडवतात.. कधी विचार करायला प्रवृत्त करतात. या क्षेत्राचं कामच हे आहे.
आता..
जवळपास दोन वर्षांनी पुन्हा सगळं आलबेल होऊ लागलं आहे. सिनेमे पुन्हा प्रदर्शित होऊ लागले आहेत. नाटकं येऊ लागली आहेत. मालिकांमध्येही नवे प्रयोग होताना दिसतायत. पण त्याचं रिफ्लेक्शन आता माध्यमांमध्ये दिसत नाहीय. अगदीच नाही अशातला भाग नाही. कारण, मोठ्या कलाकारांचे सिनेमे आले की, त्या मोठ्या कलाकारांना बोलावलं जातं आणि १० मिनिटात सगळं उरकलं जातंय.
गेला बाजार ‘नाय वरण भात लोन्चा..’ सारखी एखादी केस आली, तर त्यालाही बातम्यांमध्ये स्थान मिळतं आहे. नागराज मंजुळेसारख्या दिग्दर्शकालाही माध्यमं बोलवताना दिसतायत. कारण, त्यात बच्चन आहे. असं असलं तरी नाटकं, मालिका यांना अजूनही स्थान नाहीय. इथे खरी गोची झाली आहे.
आज परिस्थिती अशी आहे की, एकावेळी पुन्हा आपल्याकडे चार-चार सिनेमे येऊ लागले आहेत. ते चांगले की वाईट हे सिनेमा पाहून लोक ठरवतील किंवा समीक्षकही ते ठरवू शकतात. पब्लिसिटी करायची इच्छा त्यांचीही आहे. लोकांपर्यंत पोचावंसं त्यांनाही वाटतं. मात्र त्यांना आता तितका स्कोप उरलेला नाहीये. परवा एका सिनेमाची टीम पुण्यात आली होती. त्यावेळी त्या टीमशी गप्पा मारताना, त्यांनी ही अगतिकता बोलून दाखवली.
सिनेमा आता प्रदर्शनाला सज्ज झाला आहे. पण त्याआधी आलेला ट्रेलर लॉंच करायला पीआरने चाचपणी केली, तर वृत्तवाहिन्यांच्या रिपोर्टर्सनी तिथे यायला थेट नकार दिला. कारण या वार्ताहरांवर दुसरी जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे सिनेमे येत असूनही मीडियाच येत नसल्याची नवी तक्रार समोर येऊ लागली आहे. त्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आता अनेक सिनेमेकर्स मीडियाला न बोलवता केवळ सोशल मीडियावर भर देऊ लागले आहेत. या सोशल मिडीयावर गोष्टी टाकून बुस्ट केलं की त्याला व्ह्यूअर चांगला मिळतो. त्याचा फायदा पुन्हा मार्केटिंगला होतो आहे.
सिनेमांसारख्या प्रमोशनची गरज टीव्हीला नसते. कारण मालिका घरात घुसून मनोरंजन करत असतात. लोक आपोआप मालिकेतल्या लोकांवर प्रेम करू लागतात. त्यांना आपलं मानू लागतात. टीव्ही चॅनल्स, पेपर किंवा वेबसाईटवर फार कंटेट आला नाही तरी त्यांना काही फरक पडत नाही. उलटपक्षी वेबसाईटवाल्यांनी जरा फार घोळ घालून ठेवला आहे.
खरंतर टीव्ही आणि वृत्तपत्रावर राजकीय बातम्यांनी कब्जा केला असताना वेबसाईट्स तेजीत होत्या. सर्वात महत्वाची बाब अशी की वेबसाईटवाल्या सगळ्या मंडळींना माहीत असतं की, वेबवर एंटरटेन्मेंट तुफान चालतं. कारण, प्रत्येकाच्या हातात फोन असतो, लॅपटॉप असतो त्यावर सगळीकडे मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्या वाचल्या जातात, पाहिल्या जातात. म्हणूनच त्या त्या वेबसाईटचा प्रमुख मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्या मागत असतो. तशा त्या पुरवल्याही जातात. पण आपल्याकडे व्ह्यूअर खेचायची घाई त्यांना नडली आहे. आकर्षक हेडिंग करण्याचा राक्षसी हट्ट आता या वेबसाईटवाल्यांच्या गळ्यावर बसला आहे.
तुम्ही कोणतीही वेबसाईट उघडा. त्यावर हेडिंग वापरताना ‘हे’, ‘यांनी’, ‘इतके’ असे शब्द कोट करून हेडिंग बनवलेली असतात. अगदीच उदाहरण द्यायचं तर ‘या’ अभिनेत्रीने घेतलेले मानधन ऐकाल तर थक्क व्हाल… असं हेडिंग असतं. बरं बातमी असते एका ओळीची. म्हणजे कंटेंट तेवढाच असतो. पण बातमी लिहिताना तिच्याबद्दल बाकीचा फाफट पसारा त्यात घालून केवळ एक ओळ शेवटी दिली असते.
====
हे ही वाचा: ‘द कश्मीर फाइल्स’चे निर्माते काश्मीर नरसंहाराच्या कहाणीला मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी सज्ज!
====
मग वेबसाईटवाले धन्यता कशात मानतात? तर त्या बातमीला किती व्ह्यू आले आणि त्या बातमीवर वाचक कितीवेळ थांबले यात. पण त्यांच्या एक लक्षात येत नाही की, अशा पाच बातम्या वाचल्या की वाचक तुमच्या साईटवरून कायमचा जातो. कारण, त्याच्या लक्षात आलेलं असतं की हे लोक आपल्याला मूर्ख बनवतायत. मग तो दुसऱ्या साईटवर जातो. तिथेही तोच प्रकार झाला, तर तो तिसऱ्या साईटवर जातो. आणि मग तो वेबसाईटच बघायचं सोडून देतो. इथे आपण एक युजर गमावतो.
गेल्या दोन वर्षांत हे असं झालं आहे. ना धड टीव्ही, ना धड पेपर आणि ना धड वेबसाईट्स.. अशी अवस्था या माध्यमांनी स्वत:ची करून घेतली आहे. त्यामुळे आता सिनेमेकर्स आपआपली चॅनल्स सुरू करू लागली आहेत. त्यावरू आपल्याला हवी तेवढी माहिती दिली जाते.
मुळात माध्यमांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवं की आता कुणाचं काही अडत नाहीये. माध्यम कितीही मोठं असलं तरीही.. आणि नसलं तरीही.. आता कंटेंट कोण देतं त्याच्याकडे लोक जाणार आहेत. तेच तेच प्रश्न.. तेच तेच कव्हरेज.. त्याच बातम्या. .आणि इतकं सगळं करून केलं जाणारं इन्गोरन्स हा आता अंगाशी येणार आहे.
मनोरंजन क्षेत्राने आपला असा वेगळा विचार करायला सुरूवात केली आहे. आता सध्या इतर चालू माध्यमांचंही काही अडणारं नाही. कारण, त्यांना सतत कंटेंट मिळत जाणार आहेच. आज इडी.. उद्या एंटी करप्शन.. परवा आणखी काहीतरी.. शिवाय निवडणुका असणार आहेतच. आता तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनाही भारी जागा मिळू लागली आहे सगळीकडे.
====
हे ही वाचा: ‘मी वसंतराव’ पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला…
====
फार संक्रमण सुरू आहे सध्या. जो चांगला कंटेंट देतो आणि जो चांगला कंटेंट काढण्याचा प्रयत्न करतो तोच टिकणारा आहे. बघा विचार करून.