दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या आयुष्यावर आधारित टॉप ५ बायोपिक
नुकताच प्रदर्शित झालेला ‘मी वसंतराव’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हा चित्रपट कै. पं. वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. एखाद्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट म्हणजेच ‘बायोपिक’ काढणं हे तसं कठीण काम. कारण त्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य अवघ्या तीन तासांमध्ये बसवताना, त्याच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग, महत्वाच्या व्यक्तिरेखा, एकत्रित बांधून एक कलाकृती म्हणून प्रेक्षकांसमोर आणणं हे लेखक, दिग्दर्शक आणि कलाकरांसाठी एक मोठं आव्हान असतं. (Marathi Biography Movies)
सर्वसामान्यांच्या मनात सेलिब्रेटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रचंड कुतूहल असतं, तसंच त्यांच्या यशाचा प्रवास आणि एकूणच वैयक्तिक आयुष्याची जडणघडण जाणून घ्यायला त्यांचे फॅन्स नेहमीक उत्सुक असतात. याची दुसरी बाजू म्हणजे ‘बायोपिक’ तयार करताना ‘मेकर्स’ना कुठेतरी या अकथित, अव्यक्त अपेक्षांची जाणीव ठेवावी लागते. अगदी पात्र निवडीपासून प्रत्येक गोष्ट ‘परफेक्ट’ जुळवून आणावी लागते. आणि बहुतांश मराठी बायोपिक ‘मेकर्स’नी हे आव्हान यशस्वीरीत्या पेललं आहे. (Marathi Biography Movies)
गेल्या काही वर्षात मराठीमध्ये सातत्याने ‘बायोपिक’ तयार होत आहेत आणि त्याला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसादही मिळतोय. कित्येक महत्त्वाच्या व्यक्तींच्या आयुष्यावर बायोपिक आले आणि ते यशस्वीही झाले. संत, इतिहासातील प्रमुख व्यक्ती, समाजसेवक, राजकारणी, इत्यादींच्या आयुष्यावर बायोपिक येत असताना सिनेक्षेत्रातील व्यक्तींच्या आयुष्यावर आधारित काही महत्वपूर्ण चित्रपटही येऊन गेले आहेत. यापैकी टॉप ५ चित्रपटांबद्दल आपण जाणून घेऊया.
१. अमर भूपाळी
१९५२ साली आलेला ‘अमर -भूपाळी’ हा चित्रपट ज्येष्ठ कवी आणि संगीतकार होनाजी बाळा यांच्या आयुष्यावर आधारित होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी. लावणी हा पारंपारिक नृत्य प्रकार लोकप्रिय करण्याचे श्रेय जातं ते होनाजी बाळ यांना. याव्यतिरिक्त त्यांची अजून एक ओळख म्हणजे ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा’ या उत्कृष्ट रागाची रचना त्यांनी केली होती. या चित्रपटाला IMDB वर ७.८ रेटिंग देण्यात आलं आहे. (Marathi Biography Movies)
२. हरिश्चंद्राची फॅक्टरी
भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचणाऱ्या अवलियाच्या आयुष्यावर आधारित चित्रपट काढण्याचे धाडस केले ते लेखक दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी. खरंतर भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात करणाऱ्या दादासाहेबांच्या आयुष्यावर चित्रपट बनला नव्हता हे चित्रपटसृष्टीचे दुर्दैवच म्हणावं लागेल. परंतु, परेश मोकाशींनी ती कसर भरून काढली. २००९ साली आलेल्या या चित्रपटात दादासाहेबांची भूमिका केली होती, नंदू माधव या अभिनेत्याने. याशिवाय विभावरी देशपांडे, हृषीकेश जोशी, अथर्व कर्वे, श्रीरंग गोडबोले आदी कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले होते. रसिकांनी या चित्रपटाला IMDB वर ८.४ रेटिंग दिलं आहे.
३. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर
२०१८ साली दिवंगत अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा त्यावर्षीचा प्रचंड लोकप्रिय चित्रपट ठरला होता. अभिजित देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटात डॉ. काशिनाथ घाणेकर यांची मुख्य भूमिका केली होती अभिनेता सुबोध भावे यांनी. तर, सोनाली कुलकर्णी, वैदेही परशुरामी, आनंद इंगळे, प्रसाद ओक, नंदिता धुरी, अमृता खानविलकर, मोहन जोशी, प्रदीप वेलणकर आदी दिग्गज कलाकार प्रमुख भूमिकेत होते. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला IMDB वर ८.६ रेटिंग देण्यात आलं आहे. (Marathi Biography Movies)
४. भाई – व्यक्ती की वल्ली
२०१९ साली महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असणाऱ्या पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित ‘भाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांचे पटकथा आणि संवाद लेखन रत्नाकर मतकरी आणि गणेश मतकरी यांनी केले होते, तर दिग्दर्शक होते महेश मांजरेकर. या चित्रपटात ‘पुलं’ची भूमिका केली होती सागर देशमुख या अभिनेत्याने. या व्यतिरिक्त यामध्ये मृण्मयी देशपांडे, सचिन खेडेकर, हृषीकेश जोशी, सुनील बर्वे, सागर कारंडे, वीणा जामकर, इ. कलाकार मुख्य भूमिकेत होते. IMDB वर या चित्रपटाला प्रेक्षकांनी ८. १ रेटिंग दिले आहे. नंतर या चित्रपटाचा दुसरा भागही प्रदर्शित झाला होता आणि त्यालाही चांगला प्रेक्षकवर्ग लाभला होता.
५. बालगंधर्व
मराठीतील दिग्गज कलाकारांच्या आयुष्यावर बनणाऱ्या बायोपिकवरच्या लेखामध्ये ‘बालगंधर्व’ या अजरामर कलाकृतीचं नाव आल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही. २०११ साली आलेल्या ‘बालगंधर्व’ या चित्रपटातून बालगंधर्वांचा जीवनपट उलगडून दाखविण्यात आला होता. रवी जाधव दिग्दर्शित आणि अभिराम भडकमकर लिखित या चित्रपटामध्ये सुबोध भावे यांनी बालगंधर्वांची मुख्य भूमिका केली होती. तर, सिद्धार्थ चांदेकर, राहुल देशपांडे, विभावरी देशपांडे, आनंद अभ्यंकर, अभिजित केळकर, मनोज जोशी, सुहास जोशी, मनोज कोल्हटकर, अथर्व कर्वे, आदी कलाकार प्रमुख भूमिकेत होते. IMDB वर या चित्रपटाला प्रेक्षकांनी ७.५ रेटिंग दिले आहे. (Marathi Biography Movies)