नवीन चित्रपटांना ‘तिसरा पडदा’ (ऑनलाईन) पर्याय आहे, पण…..
जेव्हा दूरदर्शन आले (मुंबईत २ ऑक्टोबर १९७२ आणि मग इतरत्र) तेव्हा ‘आता सिनेमा थिएटर’ला चित्रपट पाह्यला कोण जाणार हा प्रश्न तितकासा भेडसावला नाही. पण शनिवारी जुने मराठी चित्रपट घरबसल्या पहायला मिळतोय तर ‘महिन्यातून एकदाच थिएटरमध्ये जाऊन मराठी चित्रपट पाहणारा वर्ग दुरावणार नाही ना?’ असा प्रश्न हळूहळू चर्चेत आला. रविवारी जुने हिंदी प्रक्षेपित होत आणि त्यावर नवीन पिढी खुश होती.
एप्रिल १९८२ साली देशात रंगीत दूरदर्शन व व्हिडिओचे आगमन झाले तेव्हा अनेक चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी चोरट्या मार्गाने व्हिडिओवर येऊ लागले आणि आता थिएटरमध्ये जाणार कोण असा प्रश्न निर्माण झाला.
तर २ ऑक्टोबर १९९२ रोजी देशात उपग्रह वाहिनीचे आगमन झाले. मग ‘बघता बघता’ अगणित उपग्रह वाहिन्या आपल्या घरात घुसल्या. माहिती आणि मनोरंजन यांचा स्फोट झाला. चोवीस तास चित्रपट दाखवत काही वाहिन्यांनी हिंदीसह मराठी आणि अनेक प्रादेशिक भाषांतील चित्रपट, इतकेच नव्हे तर विदेशी चित्रपट पाह्यची सोय, संधी आणि सवय लागली. असे भरपूर चित्रपट पाहता पाहता ऑनलाईन चित्रपट पाह्यचीही सोय झाली. आता तर नेटफिक्स, अमॅझाॅन, हाॅटस्टार, झी फाईव्ह असे पर्याय आले. आणि त्यावरही मराठी, हिंदी यासह बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम तर झालेच पण अगदी ओडिया, हरियाणवी, भोजपुरी चित्रपटही उपलब्ध आहेत….
काळ जस जसा पुढे सरकू लागला तस तशा “चित्रपट पाहण्याच्या” नवीन कल्पना येत गेल्या. चित्रपटाच्या इतिहासात फक्त किती दर्जेदार चित्रपट निर्माण झाले की चालले, किती फ्लाॅप्स होताहेत याचे अंकगणित आणि बीजगणितच नाही. तर हाच चित्रपट कस कशा पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याची संस्कृती विकसित झाली हेदेखील ‘दुर्दैवाने दुर्लक्षित राहिलेले मोठे वास्तव’ आहे. यात पुन्हा एकेकाळची गल्ली चित्रपटासाठीची सोळा एमएमची प्रिन्ट आणि कालांतराने चक्क पेनड्राईव्हवर उपलब्ध होऊ लागलेला चित्रपट असे अनेक घटक आहेत…
अशी वाटचाल सुरु असतानाच आज देशात (खरं तर जगभरातच) चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली असताना नवीन चित्रपट ऑनलाईन (तिसरा पडदा असे नवीन नामकरण) चित्रपट प्रदर्शित करण्याची गती वाढायला हवी. मराठी चित्रपट रसिकांना नक्कीच माहित असेल माधुरी दीक्षित निर्मित ‘ १५ ऑगस्ट’ आणि प्रियांका चोप्रा निर्मित ‘फायरब्रॅण्ड’ हे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न करता थेट ऑनलाईनला रिलीज केले. माधुरीने आपल्या ग्लॅमरला साजेसा ‘१५ ऑगस्ट’ या चित्रपटाचा झक्कास प्रीमियर “शो” केला. भरपूर कव्हरेज मिळवले. तर मुळशी पॅटर्न, शाळा इत्यादी अनेक मराठी चित्रपट अगोदर थिएटर रिलीज झाले आणि त्यानंतर ऑनलाईनला आले.
एक नवीन वाद असा आहे की, ऑनलाईनला नवीन चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तोच चित्रपट मल्टीप्लेक्समध्ये पहायला कोण येणार? प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. त्यावर असा एक मार्ग म्हणजे, छोट्या बजेटचे चित्रपट ऑनलाईन विक्रीतून आपली गुंतवणूक वसूल करु शकतात. (चित्रपट निर्मितीचा खरा आकडा निर्माताच जाणो. चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीचा भाग म्हणून दिले जाणारे आकडे खरंच असतात काय?) मोठ्या चित्रपटांचे निर्माते (सूर्यवंशी, ८३ वगैरे) मल्टीप्लेक्स सुरु व्हायची वाट पाहणार आहेत. असे चित्रपट अर्ध्या अधिक जगात रिलीज होतात त्यामुळे ते नेमके किती काळ वाट पाहणार हा प्रश्नच आहे. दक्षिणेकडील थिएटर संघटनांचा तर नवीन चित्रपटाच्या ऑनलाईन रिलीजला विरोध आहेच.
हा पेच जेव्हा सुटेल तेव्हा सुटेल पण दशकभरानंतर ‘तिसरा पडदा’ हाच चित्रपट निर्मितीचा मुख्य घटक असेल आणि त्याचे सबस्क्रायबर किती, त्याचे मार्केट किती हे पाहूनच चित्रपट निर्मितीचे बजेट ठरवावे लागेल असे दिसतेय.
दूरदर्शनपासून ऑनलाईनपर्यंत प्रवास होताना दोन गोष्टी घडल्या. चित्रपट निर्मात्याना ‘चित्रपटाचे हक्क विकायचे आणखीन पर्याय मिळत गेले’. दूरदर्शन, त्यानंतर व्हिडिओ, पाठोपाठ चॅनल यांच्यावरच्या प्रक्षेपणाची किंमत निर्मात्याला मिळत गेली. ऐंशीच्या दशकात काही चित्रपट खास व्हिडिओसाठीही बनले, पण तो ट्रेण्ड फसला. महेश भट्टने चॅनलसाठी ‘फिर तेरी कहानी याद आई’ निर्माण केला, पण त्याच्या प्रक्षेपणात इतक्या आणि अशा जाहिराती की प्रेक्षकांना कंटाळा आला. म्हणून हाही ट्रेण्ड फसला. तात्पर्य, थिएटरमध्ये रिलीज झालेले आणि अनेकदा तरी लोकप्रिय झालेलेच चित्रपट इतर माध्यमातून पसंत केले जातात. यासाठी किरण शांताराम निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी ही बनवाबनवी’ ( १९८८) आणि विजय कोंडके निर्मित आणि दिग्दर्शित ‘माहेरची साडी’ ( १९९१) या चित्रपटाचे उदाहरण द बेस्ट ठरावे. असंख्य वेळा हे दोन्ही चित्रपट उपग्रह वाहिनीवर दाखवले जाताहेत आणि ते पुन्हा पुन्हा पाहिले जाताहेत.
तात्पर्य, प्रेक्षकांची पसंती ठरलेलेच चित्रपट अन्य कोणत्याही माध्यमात लोकप्रिय असतात. सत्तरच्या दशकातही टीव्हीवर (तेव्हाचा शब्द) एकादा हिट ‘आराधना’च अथवा ‘जगाच्या पाठीवर’ पहायला दूरचित्रवाणी असलेल्या घरात चाळीतील सगळे शेजारी पाजारी जमत.
एकूण काय, मल्टीप्लेक्सवाल्यांचा नवीन चित्रपट अगोदर आमच्याकडे रिलीज करा हा हक्क आणि हट्ट कळत नकळतपणे योग्यच आहे म्हणायचा. चित्रपट ही एकट्याने पहायची कला नाही, आजूबाजूच्या शौकिनांसह एन्जाॅय करावे अशीच ती जादू आहे. ती नशा ‘ऑनलाईन’ मिळणार नाही….
-दिलीप ठाकूर