‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
रेखाचा पहिला सिनेमा !
अभिनेत्री रेखाचे बॉलीवूडमधील आगमन खूप वादळी ठरले. बाल कलाकार म्हणून ती १९६६ साली (बेबी भानुरेखा या नावाने) ’रंगुला रतनाम’ या तेलगु चित्रपटात चमकली त्यावेळी ती १२ वर्षांची होती.(जन्म १० ऑक्टोबर १९५४). तिचे वडील जेमिनी गणेशन आणि आई पुष्पावल्ली हे दोघेही तमिळ सिनेसृष्टीत कार्यरत होतेच. त्या मुळे ती सिनेमात येणं क्रमप्राप्तच होतं. १९६९ साली कन्नड सुपरस्टार राजकुमार सोबत ती नायिका म्हणून ’ऑपरेशन जॅकपॉट नल्ली सी आय डी ९९९’ या सिनेमातून प्रेक्षकांपुढे आली. याच वर्षी ति्ला एका हिंदी सिनेमा मिळाला.कुलजित पाल दिग्दर्शित ’अंजाना सफर’ या तिच्या पहिल्या सिनेमाचा नायक होता विश्वजित. या चित्रपटात या दोघांचे एक प्रदिर्घ चुंबन दृष्य होते. रेखाचा हा पहिलाच सिनेमा असल्याने हि मोठी ब्रेकींग न्यूज ठरली. त्यांचे हे छायाचित्र आजच्या भाषेत सांगायचे तर इतके व्हायलंट झाले की ते जगप्रसिध्द ’लाईफ’ मॅगझिनच्या मुखपृष्ठावर झळकलं. जाहिरातीच्या दुनियेत ’ एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी’ असं म्हणतात. पण हा स्टंट करण्यात तिचा काहीही सहभाग नसताना निर्मात्यांच्या तिच्या मागे (तिचा एकही सिनेमा न झळकलेला असताना) रांगा लागल्या.
रेखाची त्या काळची देहयष्टी आणि मिडीयात तयार झालेली इमेज बघून तिच्याकडे अभिनेत्री म्हणून न पाहता एक सेलेबल आयटम म्हणूनच पाहिलं जावू लागलं. तिचा हा पहिला सिनेमा पुढे यातील गरमा गरम दृष्यांमुळे सेन्सारच्या कात्रीत अडकला. तोवर तिच्या इतर सिनेमांचे शूट सुरू झाले होते. मोहन सैगल यांनी तिला ’सावन भादो’ या सिनेमात घेतले यात तिचा नायक नवीन निश्चल होता. त्याचाही हा पहिलाच सिनेमा होता. यात तिने साकारलेली व्हीलेज गर्ल तिच्या टंच अदेने खळबळ उडवून गेली. सोनिक ओमी यांनी स्वरबध्द केलेली ’कानोंमे झुमका, चाल में ठुमका कमर पे चॊटी लटके’, ’सुन सुन ओ गुलाबी कली’ वर्मा मालिक यांची गाणी खूप गाजली. १९७० साली आलेल्या या सिनेमातून रेखाचे अधिकृत पदार्पण झाले. पण तिच्या या इमेजने तिला सिरीयसली कधी कुणी घेतलंच नाही.
ऎलान,डबल क्रॉस, एक बेचारा, गोरा और काला या सिनेमात तिला अभिनयाला वावच नव्हता. ऋशिदांच्या ’नमक हराम’ मध्ये ती होती पण सर्व फोकस राजेश-अमिताभ वर होता. सर्व आघाडीच्या अभिनेत्यांसोबत तिचे सिनेमे येत होते पण तिची स्वत:ची अशी ऒळख निर्माण होईल असा सिनेमा यायचा होता. १९७८ साली गुलजार यांचा ’घर’ हा सिनेमा आला आणि तिच्यातील अभिनेत्रीला पहिल्यांदा रसिकांपुढे आणले गेले. तिच्यातील अभिनेत्रीचा खरा शोध आणि कस पुढे ऋशिकेश मुखर्जींच्या ’खूबसूरत’ मध्ये १९८० लागला. या चित्रपटासाठी तिला पहिला फिल्मफेयर पुरस्कार मिळाला. १९८१ सालच्या ’उमराव जान’ या सिनेमाकरीता रेखाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सावन भादो ते उमराव जान हा तिचा दशकभराचा आलेख जबरदस्त होता.
या सार्या गदारोळात तिचा विश्वजित सोबतचा पहिला सिनेमा १९७९ साली तब्बल दहा वर्षांनी प्रदर्शित झाला. सेन्सॉर बोर्डाने अनेक बदल सुचविल्याने तो सिनेमा रखडला आणि ’दो शिकारी’ या नावाने प्रदर्शित झाला आणि आठवड्याभरात थिएटर वरून काढावा लागला.