
कलेक्टर बनण्याची स्वप्न पाहणारे B R Chopra सिनेमाकडे कसे काय वळाले ?
सिनेमाच्या दुनियेत बी आर चोप्रा हे एक शिखर होते. कारण सामाजिक जबाबदारी ओळखून मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांना प्रबोधनाच्या डोस देण्याचं मोलाच काम त्यांनी आपल्या चित्रपट माध्यमातून केलं सामाजिक आशय त्यांच्या चित्रपटात प्रामुख्याने दिसायचा संवाद माध्यमाला त्यांनी जास्त महत्त्व दिलं त्यामुळे त्यांच्या चित्रपटातील कथा पटकथे सोबतच संवाद देखील प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. पन्नासच्या दशकात ‘नया दौर’ या सिनेमातून यांत्रिकी करणाच्या रेट्यात श्रमजीवी वर्गाच्या होणाऱ्या शोषणावर प्रकाश टाकला होता. तर’ एक ही रास्ता’ या चित्रपटात त्यांनी विधवा पुनर्विवाह हा प्रश्न हाताळला होता. स्त्री ही केवळ शोषणाची वस्तू आहे का? हा ज्वलंत सवाल त्यांनी ‘साधना’ (1958) त विचारला होता.
कुमारी मातेच्या प्रश्नावरील धूल का फुल (1959) असो वा समाजात धर्माच्या नावाने फूट पाडणाऱ्या कुटील कारस्थानाविरुद्धचा धर्मपुत्र (1961) हा सिनेमा असो किंवा विवाहबाह्य संबंध संयमीपणे हाताळत निर्माण केलेल्या या सिनेमात लक्ष्मण रेषेचा संदर्भ देत सामाजिक प्रश्नाला वाचा फोडणारा ‘गुमराह’(1963) असो!. बी आर चोप्रा यांच्या समाज प्रबोधनाची ठसठशीत मुद्रा आपल्याला प्रत्येक सिनेमात दिसते. हे बी आर चोप्रा यांचे सिनेमे प्रेक्षकांचे केवळ मनोरंजन करत नव्हते तर समाजातील ज्वलंत प्रश्नांना ते आपल्या या माध्यमातून प्रेक्षकांपुढे आणत होते. मल्टीस्टारर सिनेमाचा मुहूर्तमेढ रोवणारा ‘वक्त’ (1965) सिनेमा तर पुढे अनेक यशस्वी सिनेमाचा रोड मॅप बनला.
सत्तरच्या दशकामध्ये ‘इंसाफ का तराजू’, ‘धुंद’, ‘कर्म’ हे चित्रपट त्यांच्या बदलत्या समाज रचनेला सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्याचा एक स्तुत्य प्रयत्न होता. ऐंशीच्या दशकातील निकाह हा चित्रपट मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथे विरुद्ध आवाज उठवणारा होता. याच दशकात त्यांनी ‘महाभारत’ हे महाकाव्य छोट्या पडद्यावर आणले आणि संपूर्ण भारत वर्षात त्यांचे प्रचंड स्वागत झाले. बी आर फिल्म्स यांनी कायमच एक सशक्त कथानक असलेलं चित्रपट प्रेक्षकांच्या पुढे आणले. पण गंमत म्हणजे इतके महान चित्रपट देणारे बी आर चोप्रा यांना खरंतर लहानपणापासून कलेक्टर व्हायचं होतं. त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू झाले होते.
22 एप्रिल 1914 रोजी जन्मलेले बलदेव राज चोप्रा लहानपणापासूनच अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे होते. त्यांचा जन्म लुधियानाचा. पण वडील लाहोरला गव्हर्नमेंट सर्विसमध्ये होते त्यामुळे त्यांचं सर्व बालपण लाहोरमध्ये गेलं. एम ए इंग्लीश लिटरेचर ही पदवी त्यांनी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. यानंतर त्यांनी आयसीएस (इंडियन सिविल सर्विसेस) चा अभ्यास सुरू केला तो ब्रिटिश काळ होता. प्रचंड मेहनत त्यांनी घेतली होती. त्यांचा एकाच ध्यास होता आय सी एस पास करून कलेक्टर व्हायचे. पण दुर्दैव असं झालं की परीक्षेच्या ऐन वेळेला त्यांना टायफाईडची बाधा झाली.
शरीरात प्रचंड ताप, डोळ्यात ग्लानी आणि शरीरात अजिबात ताकत नाही अशा अशक्त अवस्थेत देखील त्यांनी आपला अभ्यास चालू ठेवला आणि घरच्यांना खोटं सांगितलं की मला आता बरं वाटतं आहे मी पेपर देतो.” आणि त्यांनी आयसीएस परीक्षेचा पहिला पेपर त्यांनी दिला. या प्रश्नपत्रिकेत त्यांना 18 प्रश्नांपैकी आठ प्रश्नांची उत्तरे लिहायची होती. बी आर यांनी तीन तासांमध्ये संपूर्ण 18 प्रश्नांची अचूक उत्तर असेल लिहून काढली. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. संध्याकाळी त्यांचा टायफाईड उलटला आणि त्यांना दवाखान्यातच ऍडमिट करावे लागले. या आजारपणामुळे त्यांना आयसीएसचे पुढचे पेपर देता आले नाही. त्यामुळे हाती आलेली संधी निघून गेली.
================================
================================
बी आर चोप्रा यांना खूप दुःख झालं. आजारपणा नंतर बरं वाटल्यानंतर त्यांना काही लोकांनी तुम्ही लंडनला जाऊन पुन्हा एकदा परीक्षा देऊ शकता असे सांगितले. पण बी आर चोप्रा यांनी आता ठरवले होते मी आयसीएस पास होऊन कलेक्टर होऊ शकलो नाही, पण त्याच उंचीच दुसरं काम मी नक्की करेन असा प्रण त्यांनी घेतला. आणि त्या दृष्टीने काम सुरू केले. कॉलेजला असल्यापासूनच त्यांना लिखाणाची खूप आवड होती. देशातील विविध वृत्तपत्रांसाठी ते लिखाण करत होते. त्यांच्या एका नातेवाईकांनी त्यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये नोकरी लावण्याचा प्रयत्न केला. पण त्याच काळात त्यांना लाहोरच्या सिनेब्लिट्ज या नव्याने सुरू होणाऱ्या चित्रपट विषयक मॅगझिनचे संपादक म्हणून ऑफर मिळाली.
खरंतर पत्रकारिता वगैरे त्यांनी काही केलं नव्हतं पण केवळ लिखाण, साहित्य याची आवड असल्यामुळे ते बऱ्याच वर्तमानपत्रासाठी लिखाण करीत असत. विशेषतः चित्रपट या माध्यमावरील त्यांचे लिखाण संपूर्ण देशभर प्रसिद्ध होत असे. यातूनच त्यांना ही ऑफर मिळाली होती. सहा महिन्यातच त्यांनी सिनेब्लिट्ज हे अखंड भारतातील सर्वाधिक खप असणारं नियतकालिक बनवलं. बाबुराव पटेल यांच्या सिनेइंडियाला टक्कर देणारे हे मॅगझिन होते. या मॅगझिनमुळे त्यांचा चित्रपट व्यावसायिकांशी संबंध येऊ लागला.
मुंबईतील अनेक निर्माते त्यांच्या सिनेमाचे प्रीमियर लाहोरला करायला आल्यानंतर आवर्जून बी आर चोप्रा यांना भेटू लागले. मेहबूब सोहराब मोदी यांच्यासोबत त्यांचा चांगला दोस्ताना झाला. आता पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतातून देखील त्यावेळी चांगली चित्रपट निर्मिती होत होती. लाहोर हे सिनेमाचे एक मोठे केंद्र त्याकाळी झाले होते. अशा रीतीने कलेक्टर व्हायचे स्वप्न पाहणारा एक तरुण आधी सिने पत्रकारीतेकडे वळला. फाळणीनंतर बी आर चोप्रा यांना लाहोरची सर्व प्रॉपर्टी सोडून मुंबईत निर्वासितासारखे यावे लागले आणि इथे येऊन त्यांनी सिनेमा हेच आपले कार्यक्षेत्र निवडले!