गणेश टॉकीजची रचना जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सप्रमाणे…
जुन्या पिढीतील आम्हा चित्रपट रसिकांच्या लहानपणीच्या चित्रपटविषयक काही वेगळ्याच आवडीनिवडी किंवा ओढ होती असं म्हणता येईल. धन्य ते बालपण. त्यातला एक फंडा म्हणजे आपल्या कुटुंबासोबत कुठेही जाताना बेस्ट बसमधून जाताना प्रवासामध्ये सतत खिडकीबाहेर लक्ष ठेवायचं आणि त्याच्यातच जर एखादे चित्रपटगृह दिसलं कुतूहल जागे होई हे कोणते चित्रपटगृह ? येथे कोणता सिनेमा लागलाय आणि मग लगेच आपल्या वडिलांना त्याबद्दल प्रश्न करायचो हे कोणते चित्रपटगृह आहे, हा कोणता विभाग आहे ? माझं लहानपण गिरगावातील खोताच्या वाडीतील दहा बाय दहाच्या रुममध्ये चाळीत गेलं आणि तिथून कधी लालबाग किंवा परेलला जाण्यासाठी ६१ अथवा ६६ क्रमांकाची बस पकडली की, ती अनेक चित्रपटगृहात करत करत लालबागला पोहोचायची. (Ganesh Talkies)
सगळ्यात पहिले दिसायचं ते आमच्याच गिरगावातील मॅजेस्टिक, पुढे सेंट्रल, मग रॉक्सी, पुढे ऑपेरा हाऊस, आणखीन पुढे गेल्यावर इंपिरियल, मधूनच आतमधलं नाझ, मग स्वस्तिक, बस पुढे गेल्यानंतर मग पुन्हा उजवीकडे बघितलं तर नाॅव्हेल्टी पुढे जरा गेल्यावर अप्सरा, डाव्या बाजूला मिनर्व्हा त्यानंतर मराठा मंदिर, सात रस्त्याला बस आली की, न्यू शिरीन आणि तिकडून पुढे गेल्यावर आणि लालबागच्या दिशेने निघाली की, चिंचपोकळीचा ब्रिज उतरल्यानंतर उजव्या हाताला गणेश थिएटर अर्थात पुढे गेल्यानंतर मग डाव्या बाजूला भारतमाता श्रीगणेशोत्सवात हमखास कुटुंबासह लालबागचे गणपती पाहायला जाणे होई आणि त्यात जयहिंद, भारतमाता व गणेश थिएटर नजरेत पडे. ती सवय होती आणि आवडही. मला शालेय वयात कायमच ६१ अथवा ६६ क्रमांकाची बस पकडायला खूप आवडायचं. कारण एक प्रकारचे ते “थिएटर पर्यटनच” व्हायचं. ते वय पालकांसोबत चित्रपट पाहण्याचं असल्यामुळे अशा प्रकारची चित्रपटगृह प्रवासामध्ये दिसली की एक प्रकारचा आनंद तर व्हायचाच परंतु कुतूहल जागे व्हायचं की अरे हे चित्रपटगृह कोणते? त्यात लागलेला चित्रपट कोणता आहे? त्यात कलाकार कोण असतील? चित्रपटाबद्दलचे ज्ञान, माहिती वाढवण्याचं त्या वयातलं एक माध्यम म्हणजे अशा पद्धतीने बसमधनं प्रवास करताना बाहेर डोकावून बाहेर नजर ठेवणं आणि त्या प्रवासामध्ये नजरेत पडणाऱ्या चित्रपटगृहाबद्दलची माहिती मिळवत जाणं. (Ganesh Talkies)
आजच्या डिजिटल पिढीला कदाचित हास्यास्पद वाटेल. परंतु पन्नास, साठ, सत्तरच्या दशकामध्ये जन्माला आलेली पिढी शालेय वयात पालकांसोबत कुटुंबियांकडे अथवा फिरायला जाताना त्यांची एक नजर बसच्या बाहेर असायची आणि जे काही दिसायचं ते विश्व म्हणजे एक प्रकारची “जगाची ओळख”असायची. याच प्रवासातील गणेश थिएटर आता जमीनदोस्त करण्यात आले आहे. हे नेमकं कुठे होतं ? तर गिरणगावातील काळाचौकी, गणेश गल्ली, चिंचपोकळी या सगळ्यांना जोडणारा जो सिग्नल आहे विशेषतः लालबागकडून येताना चिंचपोकळीचा ब्रीज चढताना डाव्या बाजूला हे चित्रपटगृह होतं.
१९५७ साली सुरु झालेल्या चित्रपटगृहाचं हुकमी वैशिष्ट्य एकच, इकडे जवळपास प्रत्येक आठवड्याला एक हिंदी चित्रपट प्रदर्शित होई. ज्या चित्रपटाला अधिक चांगला रिस्पॉन्स असेल तो चित्रपट आणखीन एक दोन आठवडे मुक्काम करे ( ‘बाॅबी’ने असा काही आठवडे येथे मुक्काम केला) अथवा काही वेळेला एखादा गणेशमधून उतरलेला सिनेमा आणखीन काही महिन्यांनी त्याच गणेश चित्रपटगृहात दाखलं होई. त्याला सिनेमाच्या भाषेमध्ये “सेकंड रन” म्हणतात. आता गिरणगावातील चित्रपटगृहांचा प्रवास जर आपण पाहिला तर माझगावचे स्टार, भायखळाचं पॅलेस, भायखळाच्या पुढे आल्यानंतर जय हिंद, मग डाव्या बाजूला वळल्यानंतर गणेश, डिलाईट रोडवर गेलो तर प्रकाश, पुढे गेल्यानंतर दीपक, लालबागच्या दिशेने आलं तर भारतमाता, पुढे धरती ( अगोदरचे सूर्य आणि नंतरचे प्रीमियर), हिंदमाता, चित्रा, शारदा, ब्रॉडवे असा हा चित्रपटगृहांचा मस्तपैकी एक गुच्छ होता. त्या गुच्छातील स्टार, अलिकडेच पॅलेस असे एक एक चित्रपटगृह बंद होत गेली. जयहिंदच्या जागी दोन छोटी छोटी स्क्रीन, मल्टिप्लेक्स कल्चरने आली. भारतमाताचं नूतनीकरण झालेलं आहे. प्रीमियर बंदच आहे. हिंदमाता चौथ्या मजल्यावर गेलं. ते हिंदमाता गोल्ड झालं. चित्रा सिनेमाचं नूतनीकरण करुन ते छान करण्यात आले आहे. मध्यंतरी चित्रा टॉकीजला मी प्रिमियरला ‘रावरंभा’ चित्रपट पाहिला आणि त्याचा एक वेगळा अनुभव घेतला. ब्राॅडवे बंद होऊन जवळपास पन्नास वर्षे होत आली आहेत. डिलाईट रोडचे प्रकाश टॉकीज साधारण पंचवीस वर्षांपूर्वी बंद झालं. दीपक सिनेमा सुरु करण्याचे पुन्हा पुन्हा चांगले सकारात्मक प्रयत्न झाले. त्यात खूप बदलही करण्यात आले. ते चित्रपटगृह जगावं अशी मालकाची आणि चित्रपट रसिकांची इच्छा होती. वरळी प्रभादेवी यांना जोडणारा असा हा नाका होता. दुर्दैवाने ते आता शांत झाले आहेत. तिकडचा शो बंद झाला आहे.(Ganesh Talkies)
गणेश टॉकीजची रचना जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सप्रमाणे होती. मला आठवते कॉलेजमध्ये असताना माझा एक मित्र नंदकिशोर माने हा लालबागच्या मेघवाडीमध्ये राहायचा आणि आमच्या दक्षिण मुंबईतील मेन थेटर ला नवीन चित्रपटाची तिकिट्स पहिले काही आठवडे ॲडव्हान्सला मिळणंसुद्धा मुश्किल असे. ॲडव्हास बुकिंगला कायमच लांबलचक रांग आणि सतत ऍडव्हान्स बुकिंगवर हाऊसफुलचा बोर्ड चार्ट. त्यामुळे मी बऱ्याचदा तरी ६१ किंवा ६६ नंबरची बस पकडून लालबागला जाऊन मी आणि माझा मित्र नंदकिशोर माने आम्ही गणेश थिएटरमध्ये नवीन चित्रपट एन्जाॅय करायचो. तो सकाळी तिकीट ॲडव्हान्सला तिकीट बुक करायचा. गणेशचे मोठं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास हजार बाराशेची क्षमता असणाऱ्या चित्रपटामध्ये स्टॉल, अप्पर स्टार आणि बाल्कनी अशी रचना होती आणि ज्या वेळेला ते हाऊसफुल असेल तर त्या वेळेला पारंपारिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपट एन्जॉय करायला भारी धमाल यायची. अगदी चित्रपटाच्या सेन्सॉर सर्टिफिकेटवर चित्रपट अठरा अथवा वीस रिळे असेल तर टाळ्या आणि शिट्ट्यांनी चित्रपटगृह दणाणून जायचं. मग हिरोच्या एन्ट्रीला टाळ्या शिट्ट्या. गाण्याला टाळ्या शिट्ट्या. मध्यंतरमध्ये बाहेर आल्यानंतर दहा पैशाचा वडापाव अरे काय तो माहौल होता, काय तो अनुभव होता, काय ते थ्रील होतं, “ते खरे सिनेमाचे दिवस होते” आणि गणेश थिएटर हे गिरणगावात म्हणजे अतिशय मध्यमवर्गीय वस्तीमध्ये असल्यामुळे “चित्रपट म्हणजे एक प्रकारची स्वप्न नगरी” किंवा रुपेरी पडद्यावर आपण आपली स्वप्न पहावी अशा प्रकारची मानसिकता असलेला दृष्टिकोन असलेला असा सकारात्मक भावनांनी चित्रपट पाहणारा वर्ग.
आता गणेश थिएटरमधील (Ganesh Talkies) काही चित्रपट सांगायचे तर, जुन्या चित्रपटाच्या जाहिरातीची “पेपर कटिंग” माझ्या संग्रहात असल्यामुळे त्यातून मला काही गणेश थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या काही जुन्या चित्रपटांची नावे मी त्याच्यातून नोंदवू शकलो. ते चित्रपट आहेत, मै चुप रहूंगी, आई मिलन की बेला, कारवा, मेरी जंग, अजनबी, खुदा कसम, दर्द, सेवक, बॉबी, जुदाई, आज की ताजा खबर, कानून क्या करेगा, सावन भादों, यार मेरा, यतिम, सैतान, मन तेरा तन मेरा, बाझी, नैना, रोटी इत्यादी इत्यादी किती प्रकारचे चित्रपट या गणेश थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आणि त्यांनी रसिकांना आनंद दिला याची गणतीच नाही. अनेक चित्रपट आठवडा दोन आठवड्यासाठी प्रदर्शित झाले. मला मधुर भांडारकर दिग्दर्शित “चांदणी बार” हा चित्रपट गणेश थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हाचा एका लेखिकेचा लेख आठवतो. ती लेखिका “चांदनी बार” पाह्यला आपल्या मैत्रिणीसोबत गणेश थिएटरमध्ये गेली. त्यांनी सिनेमा एन्जॉय केला आणि गणेश थिएटरमधील तो सगळा माहौल एन्जॉय केला आणि त्यावर लेखही लिहिला. हे जे चित्रपट एन्जॉय करण्याचं जे कल्चर आहे ते गणेश थिएटरसारख्या चित्रपटगृहांनी पुरेपूर रुजवलं, जगवलं. ती एक भन्नाट परंपरा होती. आशावादी, स्वप्नाळू अशा चित्रपट रसिकांना मानसिक भावनिक आनंद आणि आधार देणारी अशी ती ‘ न संपणारी गोष्ट होती.” साधारण पंधरा सतरा वर्षांपूर्वी हे गणेश थिएटर चित्रपट दुर्दैवाने बंद झाले. मुंबईतील अनेक जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स एक एक करत बंद होत गेली त्यामध्ये या गणेश चित्रपटगृहाचाही नंबर लागला. त्यानंतर मी कधीही ह्या लालबाग विभागामध्ये गेलो की गणेश थिएटरवर अगदी लहानपणीच्या सवयीनुसार सहज नजर पडायची कधी तिथे मला आंब्याच्या पाट्या दिसत म्हणजे तो तिथे आंब्याचा व्यवसाय चालायचा तर कधी मला वाटतं श्रीगणेशोत्सवाच्या तयारीत तिकडे आजूबाजूला गणपती सुद्धा ठेवलेले असत. म्हणजे त्या वास्तूचा उपयोग अशाच चांगल्या सकारात्मक गोष्टीसाठी झाल्याचे दिसून येते. आणि आता ही “सिनेमाचा पडदा केव्हा शांत झालेली इमारत अर्थात ती वास्तू पाडली गेली आहे”. एका माहितीनुसार त्याजागी येणाऱ्या भव्य इमारतींमध्ये पुन्हा एकदा चित्रपटगृहाला स्थान मिळणार आहे. तसे झालं तर ते चांगलंच आहे. गिरणगावातील मध्यमवर्गीय मराठी माणसाला एक खूप आनंद देणार अशी ती गोष्ट ठरेल.
===========
हे देखील वाचा : यामुळे शांताराम बापूंनी वसंतराव यांना मिठी मारली
===========
चित्रपटाचा इतिहास हा चित्रपटगृहाच्या माध्यमातून चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे चित्रपटगृहांच्या आठवणी हा एक वेगळा असा विषय आहे. त्यात कधी ब्लॅक अँड व्हाईट तर कधी रंगीत फ्लॅशबॅक आहे, आनंद आहे आणि त्याचबरोबर माहितीचा भरभरुन साठादेखील आहे. एखादं चित्रपटगृह पाडलं जातं म्हणजे ती नुसती इमारत पाडली जाते असं नव्हे तर त्यामध्ये पाहिलेल्या चित्रपटांबरोबरची अनेकांची स्वप्ने, आशा किंवा एखाद्या चित्रपटाकडून काही एखादी गोष्ट शिकलो असून प्रभावित झालेलं असू तर अशा गोष्टीसुद्धा त्या चित्रपटगृहांशी निगडित असतात. लालबाग, परळ ,काळाचौकी, सात रस्ता या विभागामधील अनेक पिढ्यांच्या चित्रपट रसिकांच्यासुद्धा या गणेश थिएटरबद्दलच्या अनेक आठवणी असतील. आज इमारत पाडली गेल्यानंतर तेही आठवणीत नक्कीच गेले असतील. त्यांना नक्कीच दुःख झालं असेल. (Ganesh Talkies)
आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षकांची संस्कृती ही चित्रपटगृहावर देखील प्रेम करणारी अशीच आहे. “पडद्यावरचं जग” त्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातं आणि असे चित्रपटगृह मोठ्या शहरातील असो, निमशहरी भागातील असो, तालुका पातळीवर गावातील असो किंवा खेड्यातील असो एखादं चित्रपटगृह बंद होतं आणि मग पाडलंही जातं ही सच्चा चित्रपट रसिकांच्या मनाला वेदना देणारी अशीच गोष्ट आहे. गणेश थिएटर कायम लक्षातच राहील आणि त्या विभागातून मी जेव्हा जेव्हा जात राहीन त्या त्या वेळेला त्या गणेश थिएटरकडे माझी नजर नक्कीच जाईल. विशेषतः श्रीगणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये तर या गणेश थिएटरची तर नेहमीच आठवण येत राहिली.