दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
गणेशोत्सवाच्या रंगात रंगली मनोरंजनसृष्टी – ‘या’ चित्रपटांत दिसले होते गणेशोत्सवाचे रंग
यावर्षी तब्बल दोन वर्षांनंतर सर्वत्र सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतोय (Ganeshotsav 2022). गणरायाच्या कृपेनं कोरोनाचं सावट दूर होऊन हळूहळू सर्व काही पूर्वपदावर आलं आहे. त्यामुळे यावर्षी सणाचा आनंद द्विगुणित झाला आहे. सर्वांच्या आवडत्या सणाचा मोह मनोरंजन क्षेत्राला पडला नसता, तर नवल होतं. गणेशोत्सवानिमित्त जवळपास सर्वच चॅनेल्सवर विविध कार्यक्रम तर असतातच, पण विशेष म्हणजे काही चित्रपटांमध्येही गणेशोत्सवाचा जल्लोष दाखवण्यात आला आहे. अशाच काही चित्रपटांबद्दल –
१. मोरया (मराठी)
मोरया या चित्रपटाचं कथानकच मुळी गणेशोत्सव मंडळांभोवती फिरतं. यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची कार्यपद्धती, दोन मंडळांमधली भांडणं, पैशांचा गैरवापर याचबरोबर धूर्त राजकारणी याचा राजकारणासाठी कसा वापर करून घेतात या साऱ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या साऱ्यांमध्ये लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा मूळ उद्देश बाजूला राहतोय याची जाणीवच कित्येक मंडळांना नाही, हा मुद्दाही अधोरेखित करण्यात आला आहे.
अवधूत गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर, स्पृहा जोशी, परी तेलंग, दिलीप प्रभावळकर, जनार्दन परब, गणेश यादव, इ कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये हा चित्रपट आवर्जून बघा. (Ganeshotsav 2022)
२. अग्निपथ (हिंदी)
जुन्या आणि नवीन दोन्ही चित्रपटांमध्ये गणेशोत्सव दाखवण्यात आला आहे. अर्थात हा चित्रपट जरी गणपती बाप्पा अथवा गणेशोत्सवर आधारित नसला तरी गणेशोत्सवामधली गाणी सुंदर जमून आली आहेत. जुन्या अग्निपथमधील ‘गणपती अपने गाव चले.. ‘ हे गाणं तेव्हा प्रचंड लोकप्रिय झालं होतं, तर नवीन अग्निपथमधील ‘देवा श्रीगणेशा.. ’ या गाण्यावर बाप्पाच्या मिरवणुकीत तरुणाई थिरकली होती.यावर्षीही हे गाणं खास असणार (Ganeshotsav 2022).
मुकुल आनंद दिग्दर्शित जुन्या अग्निपथ चित्रपटात अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, डॅनी, नीलम कोठारी, अर्चना पुरणसिंग, आलोकनाथ आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. तर या चित्रपटाचा रिमेक दिग्दर्शित केला होता करण मल्होत्रा यांनी. आणि यामध्ये हृतिक रोशन, प्रियांका चोप्रा, संजय दत्त, कतरीना कैफ, ऋषी कपूर आदी कलाकार मुख्य भूमिकेत होते.
३. ए बी सी डी -Any Body can dance (हिंदी)
कोणत्याही शुभकार्याची सुरवात गणपतीच्या आशीर्वादाने केली जाते. ए बी सी डी (Any Body can dance) भारतामधील पहिली ‘डान्स फिल्म’ समजली जाते. त्यामुळे या पहिल्या वहिल्या डान्स फिल्ममध्ये गणपती बाप्पावर गाणं नसतं तर विशेष होत. या चित्रपटामधलं ‘गणपती बाप्पा मोरया…’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं. या गाण्यामधलं नृत्य बघण्यासारखं आहे.
रेमो डिसूझा दिग्दर्शित या चित्रपटात रेमो डिसूझा, प्रभुदेवा, के के मेनन, गणेश आचार्य, लॉरेन गॉटलीब, पुनीत पाठक, धर्मेश, वृषाली चव्हाण, सरोज खान, इ कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
४. वक्रतुंड महाकाय (मराठी)
हा चित्रपट बाप्पाच्या उत्सवाबद्दल नाहीये, पण बाप्पाशी संबंधित आहे. एका मंदिरात बॉम्बस्फोट घडवण्याच्या उद्देशाने बॉम्ब असलेले सॉफ्ट-टॉय ठेवले जाते. परंतु हा प्रयत्न फसतो. पुढे आस्तिक -नास्तिक, विश्वास, भीती, श्रद्धा अशा अनेक भावनांचे चित्रण यामध्ये करण्यात आलं आहे.
पुनर्वसु नाईक दिग्दर्शित हा चित्रपट गणेशोत्सवादरम्यान प्रदर्शित झाला होता, या चित्रपटामध्ये नमन जैन, उषा नाडकर्णी, प्रार्थना बेहेरे, विजय मौर्या, जयंत सावरकर, शशांक शेंडे, ऋषी देशपांडे, इ. कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
================
हे ही वाचा: अमिताभ बच्चन यांनी मला ठार मारण्याच्या प्रयत्न केला; परवीन बाबी यांनी केला होता गौप्यस्फोट..
सहकुटुंब बघता येतील अशा टॉप ५ वेबसीरिज
==============
५. लोकमान्य – एक युगपुरुष (मराठी)
हा चित्रपट लोकमान्य टिळकांच्या आयुष्यावर आधारित आहे. या यादीमध्ये या चित्रपटाचं नाव लिहिण्याचं कारण म्हणजे लोकमान्य टिळकांनीच सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरवात केली. यामागचा त्यांचा विचार काय होता ते अगदी आपल्या सर्वाना शाळेत असतानाच शिकवण्यात आलं आहे. परंतु सध्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप बघता मूळ उद्देश काय आहे, हे नव्याने समजून घ्यायची गरज आहे. आणि ही गरज हा चित्रपट पूर्ण करतो. कारण लोकमान्यांचं बायोपिक असल्यामुळे यामध्ये याबद्दल सविस्तरपणे दाखवण्यात आलं आहे.
ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, श्वेता महाडीक, समीर विध्वंस, प्रिया बापट, आनंद म्हसकर, आशिष म्हात्रे आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.