डोक्यावर पत्र्याची पेटी, खांद्यावर कपड्यांचं बोचकं, अंगात रंगबिरंगी चौकडीचा शर्ट घातलेला घूमकेतू
डोक्यावर पत्र्याची पेटी, खांद्यावर कपड्यांचं बोचकं, अंगात रंगबिरंगी चौकडीचा शर्ट घातलेला घूमकेतू मुंबईत येतो. त्याला बॉलिवूडमध्ये लेखक म्हणून ओळख बनवायचो आहे. मग हा घूमकेतू कामाला लागतो. आल्याआल्याच शाहरुख खानला भेटायला जातो. आणि मग काय होते. शाहरुख भेटतो का. घूमकेतू खूप मोठा लेखक होतो का. ही गम्मत बघायची असेल तर झी 5 वर 22 मे रोजी प्रदर्शीत झालेला घूमकेतू बघायलाच हवा. नवाजुद्दीन सिद्दीकी यात घूमकेतूच्या प्रमुख भुमिकेत आहे. आणि त्यासोबत कोण आहे, ही स्टारलिस्ट बघितली तरी चित्रपटाबद्दल उत्सुकता वाटेल. खुद्द अमिताभ बच्चन सह इला अरुण, रघुबीर यादव, स्वानंद किरकिरे, रागिनी खन्ना या चित्रपटात आहे. खरतंर काही वर्षापूर्वी हा चित्रपट बनून तयार होता. फक्त प्रदर्शनासाठी मुहूर्त मिळत नव्हता. तो मिळाला तो नेमका ह्या कोरोना लॉकडाऊनच्या काळात. आता हा चित्रपट प्रदर्शित झालाय. एक वेगळा विषय म्हणून हा चित्रपट नक्की बघा. लॉकडाऊनचा ताण जाणवत असेल तर तो जाईल हे नक्की.
घूमकेतूची कथा आहे उत्तर प्रदेशमधील. घूमकेतू तिथे आपले वडील, संतो बुआ आणि पत्नीसह रहातो. पण कामधंदा काही नाही. त्याला लेखक व्हायचेय. त्याचे वडील त्याला कामधंदा कर म्हणून नेहमी टोमणे मारत असतात. हा घूमकेतू आपल्या वडीलांना एलियन म्हणतो. त्याला त्याच्या संतो बुआचा आधार आहे. तिच त्याच्या कथा ऐकत असते. आपल्या या भाच्याला ती मुंबईला पळून जाण्यासाठी मदत करते. गावातून एकाएकी गायब झालेला घूमकेतू मुंबईला येतो. पण इकडे गावात त्याच्या गायब होण्याने शोधाशोध सुरु होते. शेवटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली जाते. आणि त्यात घूमकेतू मुंबईला गेला असल्याची नोंद होते. इकडे हा घूमकेतू मुंबईला एक खोली घेऊन आपलं बि-हाड लावतो. त्याची घर मालकीण एका पोलीस अधिका-याची पत्नी आहे. याच पोलीस अधिका-याकडे घूमकेतू हरवल्याची तक्रार आली आहे आणि त्याला महिन्याभरात शोधण्याची कामगिरीही आली आहे. हा अधिकारी आळशी आणि भ्रष्टाचारी आहे. एक दिवस या घूमकेतूने लिहिलेली कथा चोरीला जाते. या चोरीची तक्रार द्यायला घूमकेतूच पोलीस स्टेशनमध्ये जातो. तिथे असलेल्या अधिका-यालाच घूमकेतूला शोधण्याची कामगिरी सोपवली आहे. एकूण काय भेळीत भेळ. पण ही भेळ चटकदार झाली आहे. ती बघण्यात खरी मजा आहे.
या चित्रपटात इला अरुण ब-याच दिवसांनी दिसली आहे. खरी मजा इला अरुण आणि रघुवीर यादव यांनी आणली आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची नवीन इनिंगही उत्तम आहे. आळशी आणि भ्रष्ट्राचारी अधिकारी त्याने चोख केलाय. याशिवाय रणवीर सिंग, सोनाक्षी सिन्हा, चित्रांगदा सिंग, लॉरेन गॉटलीब, निर्माते निखलि अडवाणीही, विशेष कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत त्यांच्या सोबतीला स्वानंद किरकिरे, रागिनी खन्ना हे कलाकारही आहेत.
चित्रपटात फुलापानांचे, चौकडीचे आणि फॅन्सी डीझाईनचे कपडे घातलेला घूमकेतू त्याच्या नजरेतून मुंबई म्हणजे काय ते सांगतो. मंडळी सध्या या कोरोनाचा सर्वात मोठा फटका मुंबईला बसला आहे. अख्या मुंबईचे जणू हॉस्पिटलमध्ये रुपांतर झाले आहे. अशा मुंबईला बघतांना डोळ्यात अश्रु येतात. अशावेळी हा घूमकेतू थोडा तरी दिलासा देतो. तो मुंबईची जिगर म्हणजे का ते सांगतो. ते ऐकण्यासाठी हा घुमकेतू नक्की बघा.